Saturday, April 23, 2011

एक जिवलग मित्र....... " हॅरी " नावाचा!

मला तो दिवस चांगलाच आठवतो, आम्ही औरंगाबादला होतो. त्यादिवशी मोठीआई ( माझ्या आईच्या आईला मी मोठीआई म्हणते. ) ने पुरणपोळी केली होती, म्हणून माझी स्वारी खुशीत होती.
मी पुरणपोळी खात खात टि.व्ही. पहात होते. मी तेव्हा ४-५ वर्षांची असल्याने मला नॉडी पहायला खूप आवडायचे. "नॉडी" चा एक एपिसोड संपला आणि जाहिराति सुरू झाल्या, तेव्हा मी यापूर्वी कधीच न पाहिलेली एक जाहिरात सुरू झाली, तिच्यात एक मुलगा वरून पडत असलेली पाकिटे गोळा करत होता. आणि एक गलेलठ्ठ माणूस त्याला जोरजोरात ओरडत होता! मला त्या प्रसंगाची क्षणभर मजा वाटली आणि पुन्हा नॉडी सुरू होई पर्यंत मी ते विसरूनही गेले होते. पण नॉडी संपल्यावर त्या जाहिरातीच्या शेवटी जी अगम्य अक्षरे आली होती तीच पुन्हा चमकली आणि एक लांबलचक अंगरखा घातलेला, पांढरी शुभ्र दाढी असलेला माणूस अंधारातून चालत येऊ लागला. एखाद्या ४-५ वर्षांच्या मुलाला घाबरायला हे दृष्य पुरेसे होते. मला तर तेव्हा अश्या भयकथा मुळीच आवडत नसत त्यामुळे मी पटकन चॅनेल बदलले, पण आई तोपर्यंत बाहेर आली होती आणि तिने ते दृष्य पाहिले होते, त्यामुळे तिने पुन्हा सिनेमा लावायला सांगितले आणि म्हणाली की " तुला आवडेल असाच आहे हा!" मला पटलं आणि मी सिनेमा पहायला सुरूवात केली. खरच मस्त होता तो! शेवटी शेवटी तर आईच मला सांगत होती की घाबरली असशील तर बंद करूया पण मी ऐकायला तयार नव्हते, मला तो सिनेमा शेवटपर्यंत बघायचा होता! मला प्रथमदर्शनीच प्रभावीत करणार्‍या त्या चित्रपटाचं नाव होतं.... हॅरी पॉटर...! हिच हॅरीची आणि माझी पहिली भेट!
त्यानंतर काही दिवसांनी पुण्याला आलो. तरीही मी "हॅरी" ला विसरले नव्हते, पण कायम त्याचाच विचार करायचे असे नाही. खरे तर मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण तरीही मी खूपच प्रभावीत झालेली होते हे नक्की! एक दिवस माझ्या नावाने एक कुरियर आलं, त्याच्या आत चक्क हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाची सी.डी. होती! मग काय त्या सी.डी. ची पारायणे सुरू झाली! मी ती इतक्यावेळा पाहिली की मला त्यातले संवादही तोंडपाठ झाले होते! त्यानंतर हॅरी पॉटरचा दुसरा भाग निघाला तेव्हा त्याचीही सी.डी. बाबाने आणून दिली! पण ती इंग्रजी असल्याने मी आईला जवळ बसून घ्यायचे आणि सी.डी पहायचे मग एखादा संवाद झाला की अर्थ विचारायचे. हॅरी पॉटरच्या दोन सी.डी पेक्षा काही मिळेल अशी माझी कल्पनाही नसताना....
एकदिवस आम्ही क्रॉसवर्ड मधे गेलो होतो तेव्हा बाबाला हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाचं मराठी पुस्तक दिसलं, त्याने मला विचारलं " घेऊया? " मी अगदी आनंदाने हो! असे सांगितले आणि हॅरी पॉटरचे पहिले पुस्तक माझ्या घरी आले! तेव्हा मला धड वाचताही येत नसल्याने कुणीतरी मला पुस्तक वाचून दाखवायचे, पण बाबा पुस्तक वाचून दाखवताना अनुवादावर इतकी टिका करायचा की जेमतेम एक प्रकरण वाचून होई! त्यामुळे आम्ही जेमतेम तीन प्रकरणे वाचली की कुठे होतो हे विसरून जायचो त्यामुळे त्या पुस्तकाचा शेवट मला कधीच ऐकता आला नाही. असं रटाळ वाचन चालू असल्याने मी कंटाळलेच होते त्यामुळे ते पुस्तक कुठेतरी हरवलं आणि मी ते शोधण्यासाठी फार कष्ट केले नाहीत .ते मला पुन्हा सापडलं तेव्हा मला अडखळत का होईना वाचता येत होतं. मी ठरवलं की आपण आता शेवटचं वाचूया! म्हणून अगदी शेवटचं प्रकरण उघडलं आणि वाचायला सुरूवात केली. सिनेमातल्यापेक्षा जास्त सविस्तर होतं हे! त्यातला मला एक संवाद फारच आवडला होता तो म्हणजे....

" हॅरी म्हणाला " पण सर, क्विरल मला स्पर्श का करू शकला नाही ?"
डम्बलडोरनी एक दिर्घ उसासा सोडला आणि ते म्हणाले-
" तुला वाचवण्यासाठी तुझ्या आईने आपले प्राण गमावले. जर एक कोणती गोष्ट व्होल्डेमॉर्टला कधीही कळली नसेल तर ती म्हणजे प्रेम, माया! त्याला हे कधीच कळलं नाही की जसं तुझ्या आईचं तुझ्यावर होतं तसं अत्यंत सशक्त प्रेम आपली काही आठवण ठेवून जातं. तो एखादा व्रण नसतो. दृश्य खूणही नसते.. असं उत्कट प्रेम असणं, जरी ते करणारी व्यक्ती नसली तरी, आपल्याला नेहमी काही संरक्षण देत असतं. ते तर तुझ्या रोमारोमात भिनलय. क्विरल, ज्यात व्देष अगदी खच्चून भरला होता, हाव होती, महत्वाकांक्षाही होती, व्होल्डेमॉर्टबरोबर आपला आत्मा त्यानं एक केला होता, याच कारणामुळे तो तुला स्पर्श करू शकत नव्हता. असं काही चांगलं ज्यात आहे अश्यांना स्पर्श करणंही त्याला वेदनात्मक होतं."

त्यामुळे मी उलट-सुलट करत सगळं पुस्तक वाचलं. आणि मग मी लहर येई तेव्हा ते काढून वाचायचे. मी दुसरीत गेले त्यावेळी उन्हाळयात हॅरी पॉटरचा दुसरा मराठी भाग आणला. आणि मग हे दोन्ही भाग मी इतक्यावेळा वाचायचे की शेवटी बाबाने ते आठवड्याभरासाठी लपवून ठेवले होते! मग काही महिन्यांनी हॅरी पॉटरच्या ३ र्‍या, ४ थ्या व पाचव्या भागाच्याही सीडी मिळाल्या. त्यांचीही पारायणे झाली.
याच काळात कधीतरी नीरजाचा वाढदिवस होता, तेव्हा मी ठरवले की हॅरी पॉटरचा पहिला भाग तिला लिहून द्यायचा! पण एवढी २९० पाने लिहून काढणे काही मजा नव्हती म्हणून आणि जर सगळं पुस्तक लिहून काढलं तर नीरजा वाचायचा कंटाळा करेल म्हणून मी कथा संक्षिप्त करून लिहीली. तरीही संदर्भ न गाळता एवढी करामत करणं अर्थातच कठीण होतं पण तरिही दिवस रात्र खपून मी ते पुस्तक तयार केलं होतं!
मी तिसरीत जाईपर्यंत संपूर्ण हॅरीमय झाले होते. त्याच भरात आम्ही रिक्षात हॅरी पॉटरची पात्रे ठरवून घेऊन त्यांचे प्रसंग बसवू लागलो. आम्ही चॉपस्टीक्स वापरून एकमेकांना मंत्र/ शाप देउ लागलो! एकमेकांना प्रश्न विचारू लागलो आणि चक्क वर्तमानपत्रही काढू लागलो! मी तयार केलेला दै. जादूगारचा एक अंक अजूनही माझ्याकडे आहे. आम्ही हॅरी पॉटरच्या विविध पात्रांची नक्कल करतो हे मात्र आम्ही गुपितच ठेवले होते. त्यानुसार आम्ही आम्हाला टोपण नावे सुध्दा दिली होती! उदा. हिंदूस्तान पेट्रोलियम ( hp म्हणजेच हॅरी पॉटर ), मांजर ( हर्माईनीने वेगळाच केस आणल्याने ती "मांजर" होते ना! =२ र्‍या भागात ), डोनाल्ड डक ( रॉनल्ड विज्ली ), टोपीवाल्या बाई ( मॅक‍गोनागल ), घुबड ( हेडवीग) इ.!

तिसरीत आल्यावर एक दिवस कुणीतरी म्हणाले की हॅरी पॉटरचा तिसरा मराठी भाग आला आहे! झालं! त्यादिवशी मी आणि आई इथून पाथफांडरला गेलो, आणि पुस्तक घेऊन आलो! पाचवीत कल्याणी म्हणाली की चौथा भाग आला आहे, त्यामुळे आम्ही सेनापती बापट रोडवर जाऊन चौथा भाग घेऊन आलो. हा चौथा भाग खूप मोठा आहे , ६७२ पानांचा! यावेळी मी एक गंमत केली हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं ( दोन दिवस लागले, अभ्यास धरून! ) त्यानंतर पुन्हा पहिल्या प्रकरणापासून सुरूवात केली! असं सलग वाचन १० वेळा केलं आणि मग असं कळलं की पहिल्यांदा वाचतो तेव्हा गोष्ट कळते. दुसर्‍यांदा वाचताना प्रखरपणे कळते, तिसर्‍यांदा वाचताना हलकी फुलकी वाक्य लक्षात येतात, चौथ्यांदा वाचताना घडलेल्या प्रत्येक घटनेचा अर्थ लावता येतो,पाचव्यांदा वाचताना वाक्य लक्षात रहातात, सहाव्यांदा वाचताना विविध प्रसंगांच्या वेळी व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रिया समजून घेता येतात आणि नंतर वाचताना आपणही त्या पात्रांसोबत तिथे उतरतो आणि मंत्रमुग्ध होऊन जातो!
आता माझ्याकडे इंग्रजी हॅरी पॉटरसुध्दा आहेत त्याची कथा....
मी हॅरीच्या पहिल्या आणि दुसर्‍या भागाची पारायणे करत असताना आई म्हणाली की पुस्तकातली वाक्य तर तुला तोंडपाठ आहेतच, मग इंग्रजी पुस्तकं वाचून पहा! झालं! त्यादिवसापासून मी रोज आईला पुस्तकाबद्द्ल विचारायचे, शेवटी एक दिवस भर पावसात बाहेर पडून आम्ही पहिला भाग आणला! तो मी झपाटल्यासारखा वाचून संपवला. मग दुसरा, तोही संपला! तिसरा भाग जवळच्या दुकानात मिळालाच नाही म्हणून पॉप्यूलर पर्यंत जाउन आणला, हे पहिले तीनही भाग मी मराठीतून वाचले होते पण चौथा भाग घेतला तेव्हा काहीच नीट समजेना म्हणून मी ते पुस्तक ठेवून दिलं.
चौथीचं वर्ष हे माझ्यासाठी फारच छान गेलं कारण या एका वर्षात मला तीन इंग्रजी हॅरी पॉटर मिळाले! पाचवीत ४ था भाग मराठीतून आला त्यामुळे इंग्रजीसुध्दा वाचला, आणि मग एक तासभर रडून ५ वा भाग मिळवला! तो घेताना आईच्या रागिट चेहर्‍याकडे पहात बाबा म्हणाला होता " खेळण्यांसाठी नाही; पुस्तकांसाठी हट्ट करतीये हे किती चांगलं आहे! " यानंतरचे भाग मिळवण्यात माझं काहीच कर्तृत्व नाही कारण पुढचे दोन्ही भाग बाबाने स्वतःसाठी घेतले होते.

माझ्यामते हॅरी मुळे मी वाचू लागले. म्हणजे आधी वाचायचे नाही असं नाही कारण १ ला भाग मिळायच्या आधी मला वाचताच यायचं नाही! पण माझ्या वाचनाची सुरूवात हॅरीने केली. आणि मग मी फक्त त्याचाच ध्यास घेतला. अगदी १२ जून २०१० पर्यंत मी वाट पाहिली की मला कदाचित पत्र येईल, पण नाही आलं! [ अर्थात जर माझ्याबरोबर आदित्य ( आठवले ) ला बोलावलं असतं तरच मी गेले असते कारण मला खूप छान इंग्रजी बोलता येत नाही. ] सगळे म्हणतात की तूच सगळ्यांना हॅरीचा नाद लावला आहेस! मला हे त्यांचं बोलणं ऐकायला छान वाटत असलं तरी
सत्य हेच आहे की ती हॅरीची गुणवत्ता आहे! मी तर फक्त त्याची बाकिच्यांशी ओळख करून दिली आहे!
कधी कधी असं वाटतं की हा आपला मित्र आपल्याला दुरावत तर नाहिये ना? सहावीत आल्यावर प्रथमच मी वेगवेगळी मराठी पुस्तके वाचू लागले, त्यांची पारायणे करू लागले आणि कधी कधी चक्क हॅरीला बाजुला सारून इतर पुस्तके घेउ लागले. पहिल्यांदाच हॅरीबद्द्ल पडणारी स्वप्ने कमी झाली...

तसं म्हणायचच असेल तर हॅरी म्हणजे माझी ओळख आहे. कित्येक जण मला त्याच्या संबंधी प्रश्न विचारतात, गोष्ट सांगायला सांगतात... पण ही माझी ओळखच पुसली जातीये असं वाटतयं... परवा मुल्यमापनाच्या वेळी ताईंनी विचारलं " सध्या काय वाचतीयेस? " तर मी चक्क " काही नवीन नाही " असं म्हणाले. नंतर आठवलं आपण हॅरी पॉटर आणि अग्निचषक पुन्हा वाचत आहोत! तेव्हा मनाला चटका बसला, वाटलं कित्येक दिवस मित्र म्हणू उराशी बाळगलेल्या या पुस्तकाला आपण विसरलो कसे?
काल पुन्हा सगळे भाग वाचले, जीवात जीव आल्यासारखं वाटलं! तेव्हाच ठरवलं एकदा पक्की केलेली मैत्री सोडायची नाही, अगदी आयुष्यभर! क्षणासाठीच मी या माझ्या मित्राला विसरले होते, पण आता कायम लक्षात ठेवीन!
आज, जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी, हा लेख.... हॅरीसाठी!
कदाचित हा लेख नीट लिहीला गेलाही नसेल पण हे सगळं माझ्या मनातलं आहे, जसं आठवेल तसं उतरवत गेलेलं, कदाचित बालिशपणासारखं....
पण माझ्यासाठी खूप महत्वाचं, कारण या लेखाच्या निमित्तानी मला हॅरीला सांगायचय, तू खरा असशील अथवा नसशीलही, माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये,
कदाचित मी इतर पुस्तके वाचत असल्याने तू कधीतरी दुखावलासुध्दा गेला असशील, पण मी तुला मुळीच विसरलेली नाही, कारण तूच मला लढायला शिकवलं आहेस, कणखर बनवलेलं आहेस,

तूच माझा जीवाभावाचा मित्र आहेस!


- मुक्ता

13 comments:

  1. मुक्ता,
    मस्तच गं!
    तू इतर पुस्तके वाचत असल्यामुळे हॅरी का दुखावला जावा?
    तू खूप पुस्तके आणि माणसे वाचून पुन्हा हॅरी वाचशील तेव्हा हॅरी तुला जास्त कळेल.
    पुस्तकांची कशी गंमत असते ना? त्यात लिहिलेलं तसंच असतं पण दरवेळी आपल्याला नवीन काही गवसत जातं.
    तू असं काय काय मनापासून लिहितेस ना? ते वाचायला मला खूप आवडतं.

    ReplyDelete
  2. खूप आवडलं

    पुस्तक वाचताना कितव्यांदा वाचलं की काय पोचतं हे तर मस्तच.

    ReplyDelete
  3. प्रिय मुक्ता,
    तू मी हे वाचावे म्हणून बर्‍याचदा प्रयत्न केलेस पण मी दाद लागू दिली नाही.आता मात्र तू इतके सुंदर लिहिलेस की वाचून मलाही त्या पुस्तकांच्या मोहात पडायला हवं असं प्रकर्षाने वाटतंय.

    ReplyDelete
  4. क्या बात है, मुक्ता! तू तुझे विचार किती सुंदर रितीने मांडू शकतेस गं! मनापासून लिहीलेले मनाला लगेच भिडले. ’हरी पुत्तर’ ची मराठी मालिका तू आमच्यासमोर आणशील ही खात्री आहे. (हा पुस्तक न वाचण्याचा आळशीपणा पण बोलतोय!)तुम्ही ज्या नकला करायचा त्याची झलक एकदा आम्हाला दाखवा की.

    - सचिन

    ReplyDelete
  5. हे सगळं माझ्या मनातलं आहे, जसं आठवेल तसं उतरवत गेलेलं, कदाचित बालिशपणासारखं....मुक्ता हा तुझा बालिशपणा असाच शेवटपर्यंत जप.आणि पुस्तकांचं म्हणशील तर कीतीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी आपण त्यातून नवीन काही तरी मिळवतो.

    ReplyDelete
  6. प्रिय मुक्ता,खूप सुंदर लिहिलेस.तुझ्या भावना,वाचन वेड नेमकेपणाने शब्दात पकडलेस.हेरी बद्दल वाचायला पण मज्जा आली कारण तो माझा ही लाडका आहे.पुस्तके आपल्याला अनेक गोष्टी नकळत देत असतात आणि आपले जगणे बदलत असतात.वाचन वेड्या लोकांनाच हे कळेल.तू नवीन पुस्तके वाचते आहेस,म्हणजे जुनी पुस्तके विसरशील असे अजिबात समजू नको.जसे हेरीचे सर त्याला सांगतात की प्रेम तुमच्या जवळ नसेल तरी ते तुमच्या सोबत असते..पुस्तकांची सोबत पण अशीच न विसरता येणारी...

    ReplyDelete
  7. मुक्ता, अप्रतिम! (बाकी फोनवर सांगितले आहेच. पण प्रतिक्रिया नोंदणी सक्तीची असल्याने इथे पुन्हा)

    ReplyDelete
  8. My dear Mukta,
    Simply wonderful. I have not read HP but read out a few pages to Ishan and Reva when their mother was away for a few days.I thought of them, their excitement, keen interest while reading your article. I haven't read Hk but I read Marathi translation of her (author) lecture delivered at Harvard University where she was a student 21 years ago. Then I read the article in English and realized how much of the original is lost even in a good translation.Then after a few weeks I heard the lecture on UTube and what a treat that was! I could see her while delivering the lecture, her gestures, intonation and pauses suddenly made the words come alive and the audience response added flavour to it.
    My marathi typing is slow and since you read HP in English I wrote in English.

    तुझे लेखन बालसुलभ आहे बालिश नाही.

    तुझ्या,
    विद्याताई

    ReplyDelete
  9. priya Mukta;

    Mazyakade Marathi software nahi; tari pan; mala Marathimadhunach lihayache ahe. Apan sare Aksharnandanwale. Mag Marathitunach sanwad pahije. Ho ki Nahi?

    Mi Harry Potter pahilyanda wachala to Hastlikhit swarupamadhe. Ani tyachi lekhika hoti; Mukta Bam. Mala toparyant J.K. Rollings he nav mahit nhavate. Tyamyle Harry Potterchi olakh Mukta navachya lekhikene karun dili ase mhanayala harakat nahi. Mazi mulagi Rutuja hi pan Harry Potterchi Fan hoti ani ahe. Fan mhanaje agadi Mottha Exhust Fan. Pawanchakki pexa suddha motha. Ani gammat sangato; mala tiche Harry Potter Prem samajayche nahi. Ulat Rag yayacha. Mala wate; "Jadoochi Talwar" "Gupta khajina" " Bhootanchya Goshti" ashya goshtinsarakhich "Harry Potter" chi gosht. Agadi nirarthak. Mi ase mhanlyawar Rutuja khup bhandayachi. Aaj mala tyche karan samazale. Harry Potter ka awadato te samazale. Ani te sarwa tu chhan sangitale ahes. Tenva asech lihit raha ---- Wingadium Leviosa.

    Neerajacha Mama.

    ReplyDelete
  10. हे जरा अतिच होतंय बरं का मुक्ता!
    पण तुझी लेखनशैली मला आवडली.

    ReplyDelete
  11. प्रिया मुक्ता,
    आयुष्यात आपण कधीतरी एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो..आणि मग तीच गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग होवून जाते. माझ्या लहानपणी भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणे, शेरलॉक होमेस च्या अनुवादित कथा, जूल व्हर्न च्या अनुवादित कथा माझ्या लहानपणाचा विरंगुळा आणि अविभाज्य भाग झाले...आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात पुस्तके फार मोलाची भूमिका बजावतात. (वेळात वेळ काढून ही पुस्तके पण नक्की वाच असे मी तुला सुचवेन.)
    HP तुझ्या बालपणीचा हिरो असेलच...पण तुझ्या प्रगल्भ मनाला आता तू अजून खाद्य पुरवायला हवेस. म्हणजे ..आपण दहावी पास होतो आणि कॉलेजमध्ये जातो...पण कधी शाळा विसरत नाही...कारण तिने आपल्याल मोठे केलेले असते. अशीच वाचा आणि लिहित राहा. माझ्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा !
    रश्मी काकू

    ReplyDelete
  12. खूपच छान !!

    विजय इनामदार

    ReplyDelete