Saturday, October 30, 2010

स्पर्श

स्पर्श म्हणजे काय असतं ? माझ्यामते ती एक हवीहवीशी आठवण असते; आपल्यापासून कोणी दूर गेलं की येणारी.
परतीच्या गाडीत बसलं कीच कशी आजीच्या मऊ हातांच्या स्पर्शाची आठवण होते ? बाहेरगावी गेलं की कशी आपल्या पांघरुणाची आठवण येते ? कधीकधी या स्पर्शामुळे त्या अनोळखी व्यक्तीचं/वस्तूचंही आपल्याशी खूप जुनं नातं आहे असं वाटतं. खूप गोष्टींना आपण स्पर्श करतो, करुन पाहतो; त्यावेळी लक्षात येत नाही, कधीकधी आठवतही नाही. पण कधीतरी त्या स्पर्शामुळेच आपल्याला त्या व्यक्‍तीची, निसर्गाची खूप प्रकर्षाने आठवण येते. कारण ? स्पर्श माणसं जोडण्याचं काम करतो ! आपण एखाद्या व्यक्‍तीशी पटकन दोस्ती करतो, याला कारणही कधीकधी स्पर्शच असतो ! एखाद्या व्यक्तीची पिशवी आपल्याला आपल्या मैत्रिणीसारखीच वाटली, तिचा स्पर्श तसाच जाणवला तर आपण पटकन काय म्हणतो ? "तुमच्यासारखीच पिशवी माझ्या मैत्रिणीकडे आहे बरं का!" समोरची व्यक्तीही खुलते आणि संभाषणाला / गप्पांना सुरुवात होते.
आपल्या आप्तांच्या, जिवलगांच्या स्पर्शात मायेची उब जाणवते, प्रेम जाणवतं. माझ्या मोठीआईचा (माझ्या आईची आई) हात खरखरीतच पण तिने पाठीवरुन फिरवलेला हाताचा स्पर्शही उबदार, मऊसूत वाटतो, भातासारखा ! काही स्पर्श लोभावणारे असतात. पुस्तकांचा स्पर्श आणि त्यांचा वास यांनी मला वेड लागायची पाळी येते. काही स्पर्श अदृश्य असतात, पण तेच जवळचे वाटतात !
अमुक अमुक गोष्ट मनाला जाऊन स्पर्श करते असं आपण म्हणतो ते का उगाच ? असे अनेक स्पर्श आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतात. त्यावेळी त्यांची किंमत समजत नसली तरी नंतर समजते, आणि मग आपण पुन्हा भूतकाळात जातो; आठवणींच्या पलिकडे........... !

-- मुक्‍ता


(सहावी सहामाही परीक्षेत मराठीच्या उत्तरपत्रिकेत केलेले स्फुटलेखन)