Friday, February 24, 2017

अक्षरनंदन...



पुलंनी म्हंटलंय की ’अस्सल पुणेकर व्हायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा जाज्वल्यं अभिमान असला पाहिजे!" (यातला गंमतीचा भाग सोडला तर) असा विचार करता माझ्यापुरतं तरी मी असं म्हणेन की " मला, मी या शाळेची अक्षरनंदनची विद्यार्थिनी असल्याचा जाज्वल्य अभिमान आहे."
       अक्षरनंदनमधला काळ सुंदर होताच पण त्या संचितासह बाहेर पडल्यावरही अनेक सुखद आठवणी जमा होत गेल्या हे विशेष. एकदा आम्ही कर्नाटकातील ’कूर्ग’ या ठिकाणी गेलो होतो. तिथे आम्ही ज्यांच्याकडे राहिलो त्या काका-काकूंशी आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. बोलण्याच्या ओघात विषय ’कन्नड’ भाषेकडे वळला. अचानक मला शाळेत शिकलेलं ’इदेशनन्नदू’ गाणं आठवलं आणि मी ( शक्य तितक्या सुरेल आवाजात ) ते म्हणूनही दाखवलं. मी एका संपूर्णपणे वेगळ्या भाषेतलं गाणं, योग्य शब्दोच्चारांसह कसं काय म्हंटलं याचंच त्यांना अप्रूप वाटत राहिलं. त्या एका गाण्यामुळे आमच्यात वेगळेच बंध तयार झाले. तेव्हा इतकं सुंदर वाटलं मला...काहीसं भरुनही आलं, शाळेच्या आठवणींनी. सुरुवातीला ( कधीकधी शेवटपर्यंत ) अगम्य वाटणारे शब्द कधी ताल/लयीच्या ओढीने, क्वचित कधी धाकानेही पाठ करून म्हणणारा वर्ग आठवला. सहज म्हणून शिकलेली ही वेगवेगळ्या भाषांतली गाणी प्रत्येक मुलाला परक्यांशी जोडणारी पुंजी आहेत हा विचारच किती गोड आहे!
   शाळेने वेळोवेळी आमच्याही नकळत कितीतरी गोष्टी, विचार, मूल्यं आमच्यात रुजवली आहेत. सहजपणे आम्हाला भवतालाशी, निसर्गाशी जोडलं आहे. पराकोटीची समानता असावी याबद्द्दल आग्रह धरणं शिकवलं आहे. आपण कोणी वेगळे नाही, आपली नाळ या समाजाशी, भाषेशी, संस्कृतीशी जोडलेली आहे हे भान दिलं आहे. मस्त अनवाणी फिरणं, फारसा विचार न करता पटकन मांडी घालून खाली बसणं हा मोकळेपणाही मला शाळेनीच दिला आहे. पाणी/कागद जपून वापरणं, टाकाऊतून टिकाऊ असं काही तयार करणं, गोष्ट सर्वांगाने समजून घेणं, राजकीय दबाव/ धर्मांधतेच्या लाटा येत असताना ठामपणे आपल्या जागी उभं राहून प्रत्येक घटनेला शास्त्रकाट्याची कसोटी लावणं हे सगळं मी शाळेतच शिकत गेले.
    शाळेतून बाहेर पडल्यापासून सतत लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे काहीही समोर आलं तरी मन बंद होत नाही. अगदी प्रतिक्षिप्त क्रिया असावी इतक्या लगेच मनात त्याचा सूर्य तयार होतो. मग हे करून पाहू, ह्या पर्यायावर विचार करू, ही शक्यता पडताळून पाहू असं सुरु होतं. एक ठराविक मार्ग बंद झाला तरी खटपट करणं, गर्भगळीत न होता विचार करत रहाणं हे सहज जमतं. यात खटपट करत रहाण्याची मानसिकता दिल्याबद्दल शाळेचं कौतुक आहेच, पण बंद झालेला मार्ग आमच्यासाठी कधीच ’ठराविक’ नव्हता याचंही श्रेय शाळेलाच आहे. म्हणूनच कॉलेजमधे शिक्षक ’गाईड वापरू नका’ म्हणाले की ’यात सांगायचंय काय?!’ असं वाटून जातं आणि ’मनाने विचार करून उत्तर द्या’ असं म्हटलं की वैताग येण्यापेक्षा ’तेच बरं’ असा विचार डोक्यात येतो. शाळा किती भारी आहे हे अशावेळी नव्याने उलगडत जाते.
      मला कायम असं वाटतं की आम्ही सगळे उत्तम शिक्षक होऊ शकतो, कारण ज्ञानसंरचनावादी, अनुभवाधारित, विद्यार्थीकेंद्रित सकस शिक्षण कसं असतं हे आम्ही बारा वर्ष पाहिलं आहे. आपलं वय, पत, परिस्थिती काहीही असो, आपलं म्हणणं मांडण्याचा आपल्याला अधिकार असतो, आपलं मत हे ऐकलं गेलंच पाहिजे ह्याचा आग्रह धरायला शाळेने शिकवलं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आमचं म्हणणं प्रत्येकवेळी अत्यंत आदराने ऐकून घेतलं.
      ना.शा.संगती सारखा एक वेगळा तास, पाठ्यपुस्तकाखेरीज प्रचंड अवांतर अभ्यासक्रम ( फक्त आणि संपूर्ण पाठ्यपुस्तक मी बहुतेक थेट १०वीत शिकले), पूरक पुस्तिकांमधून शिकलेला इतिहास, "’आप’नी दिल्लीत बहुमत मिळवण्यासाठी कॉंग्रेसकडे जावं की पुन्हा मतदान व्हावं?" अशा राजकारणावरच्या खडाजंगी चर्चा, ’मुलग्यांनी [’मुलगे’ हे अनेकवचनही अक्षरनंदनची खासियत ;) ] केस वाढवले तर त्यांनीही हेअरबॅंड लावयचा का?’ सारख्या लहान मोठ्या नियमांच्या निर्मितीतला सक्रिय सहभाग, भातशेती, खरी कमाई, वर्षोत्सव, अत्यंत सूत्रबद्ध आणि सकस संमेलने, दुकानजत्रा, कार्यशाळा, गौरीताईंचा तास, नाट्यवाचन, अभ्यास शिबिरे, त्रिपुरी पौर्णिमा हे सगळंच अविस्मरणीय आहे. शाळेने खरंच आमचे खूप लाड केले हे आत्ता लक्षात येतंय.
     आम्ही ४थी/५वीत असताना एकदा शा.शि. चा तास सुरु असतानाच अचानक पाऊस पडायला लागला. आत जाण्याऐवजी आम्ही बाहेरच पावसात भिजू लागलो. त्यानंतरच्या वाचनालयाच्या तासालाही कोणी गेलं नाही....अख्खा वर्ग बाहेर- पावसात! थोड्यावेळाने ताई आम्हाला शोधत आल्या, एकूण रागरंग पहाता त्यांनी अजून २/३ तायांना टॉवेल घेऊन बोलावलं. तायांनी आमचं डोकं वगैरे पुसून आम्हाला चौकात बसवलं आणि कसलीशी गोष्टही वाचून दाखवली. ’पुन्हा असं तास बुडवून भिजत बसायचं नाही’ हे सांगितलंच पण त्यापलिकडे जाऊन आम्हा छोट्या मुलांचा पावसात भिजण्यातला आनंद त्यांनी खूप सुंदरपणे समजून घेतला. प्रत्येक टप्प्यावर आपलेपणाने समजून घेणारी शाळा मिळण्याइतकं छान दुसरं काय असेल?
    १०वी आणि त्याचबरोबर शाळाही संपत आली तेव्हा मी सैरभैर झाले होते. ’काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं’ ह्या वाक्यातला फोलपणा पहिल्यांदाच धडधडीतपणे जाणवू लागला होता. मी जे सोडणार होते त्याहून वरचढ काही असणं शक्य तरी होतं का? त्या सगळ्या मानसिक अवस्थेतच शाळा संपली. कॉलेज सुरु झालं आणि माझ्या लक्षात आलं की खरं तर मी अक्षरनंदन सोडलीच नाहिये. माझ्या वागण्यात, बोलण्यात, प्रतिक्रियांत, विचारात अक्षरनंदन आहेच. बाहेर इतर मोठ-मोठ्या शाळांमधल्या मुलांसारखी सपोर्ट सिस्टिम आपल्या शाळेतल्या मुलांना मिळत नाही. कॉलेजमधे पुढच्या वर्गात, मागच्या वर्गात आपण ओळखतो अशी, शाळेतली २०-२५ मुलं आहेत हे माझ्याबाबतीत शक्यच नव्हतं. तरीही ’अक्षरनंदनची विद्यार्थिनी’ हीच ओळख मला खूप मदत करून गेली. "तू कोणत्या शाळेत होतीस?" हा मला विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. याचं उत्तर देणं मला सगळ्यात जास्त आवडतं, ती ओळख अभिमानास्पद वाटते, ते जणू एक qualification आहे असं वाटतं. :)

    शाळेबद्दल लिहीताना, बोलताना ’चिमुकल्या पंखांना बळ दिलं’ इ. वाक्यं खूपदा वापरली जातात. मात्र अक्षरनंदनच्या बाबतीत त्या रूपकाची थोडीशी पुनर्मांडणी करण्याची गरज वाटते मला. मला उडण्याचं बळ शाळेने दिलं असं मी नाही म्हणणार. सुशिक्षित पालक, पुण्यासारख्या शहरातल्या वास्तव्यामुळे आणि निसर्गतः ते बळ मला मिळालं असतंच. ’अक्षरनंदन’ने त्याहून महत्त्वाचं असं काहीतरी केलं. ’अक्षरनंदन’ने माझ्यापुढील आकाशाच्या कक्षा रूंदावल्या. ’अक्षरनंदन’ने माझं आभाळ मोठं केलं.....