Monday, January 25, 2010

बोगनवेलाची गोष्ट

एक होता खलाशी. त्याचे नाव होते बोगनवाइल. तो हाउसबर्ग शहरात आपली बायको लिला हिच्यासोबत रहात असे. त्याने खलाशी धंदयातून पुष्कळ संपत्ती मिळवली होती. एक दिवस तो पुन्हा सफरीला निघाला. बोटीने किनारा सोडला व ती संथपणे दक्षिणेकडे जाउ लागली. बोगनवाइल डेकवर उभा राहून समुद्र पहात होता. सूर्योदयाचा तो सुंदर देखावा होता. बोगनवाइल त्याच्या जुन्या सफरींबद्दल विचार करत होता. एकदा तो मगरीशी झुंजला होता तर एकदा एका कासवाने त्याचा हात चावला होता, एकदा समुद्रात पडता-पडता वाचला होता तर एकदा प्रचंड आजारी पडला होता. आज मात्र तो खूप खूष होता कारण तो पुन्हा त्याच्या मित्राजवळ होता त्याच्या सागराजवळ! बोगनवाइलचे डोळे तर पाणावले.
पण दैवाचे डोहाळे काय होते?


एक काळा ढग सूर्यासमोर आला. सर्वत्र अंधार पसरला. फक्त बोटीवरील दिव्यांचा काय तो प्रकाश होता. बोगनवाइल ओरडला, ’वादळ, वादळ येतंय’. बोटीला हादरे बसू लागले, प्रवासी ओरडू लागले. सुदैवाने बोट सहीसलामत होती. पण एव्हाना ती निम्म्याहून अधिक ओली झाली होती. एक भली मोठ्ठी लाट आली व तिने एका झटक्यात सर्व दिवे मालवले. कुणालाच काहीच कळेना. सुमारे दीड-दोन तासांनी बोटा अचानक थांबली. बोगनवाइल आणि त्याचे सहकारी जरा दबकत डेकपाशी गेले. लिओनार्दो, बेसिल यांनी कुठुनतरी विजेर्‍या मिळवुन प्रकाशाची सोय केली. तरी आपण कुठल्यातरी जमिनीवर येऊन थांबलो आहोत एवढीच माहिती मिळाली. थोड्याच वेळात ढग दूर सरकला आणि सूर्याचा प्रकाश पडला. प्रवाश्यांमधे उत्साह पसरला. बोगनवाइल, लिओनार्दो, बेसिल, हेन्‍री आणि काही प्रवासी बोटीवरून उतरले. ते साधारण पंधरा मिनिटे चालले आणि अचानक थबकले. त्या जागी अनेक फुले होती. काही गुलाबी तर काही पांढरी. पण ती फुले जरा वेगळीच होती. ती एखाद्या कागदासारखी दिसत होती. त्या कागदाच्या आत रातराणीसारखी फुले होती. बोगनवाइलला ती फुले फार आवडली. त्याने दोन रोपे उचलली व एका कुंडीत लावली. ती कुंडी घेउन ते जहाजावर पोचले. ते येईपर्यंत प्रवाशांनी व इतरांनी जहाजाची डागडुजी केली होती. सर्व इंग्लंडला निघाले.

लंडनला पोचल्यावर बोगनवाइल स्वतः राणीच्या दरबारात गेला व त्याने ती रोपे राणीला दिली. तिने ही फुले कधी पाहिली नव्हती. आता या निनावी सुंदर फुलांना काय नाव दयावे असा प्रश्न राणीला पडला. यावर सात दिवस चर्चा झाली व शेवटी बोगनवाइलच्या सन्मानार्थ त्या झाडाला बोगनवेल नाव देण्यात आले. राणी बोगनवाइलवर फार खूष झाली. तिने त्याला प्रमुख खलाशी म्हणून नियुक्त केलं व नौदल त्याच्या ताब्यात दिलं. बोगनवाइलने २० वर्षे काम केलं व पुढे तो निवृत्त होऊन आपली दोन मुलं, लिलासोबत हाउसबर्ग येथे राहू लागला.

Saturday, January 16, 2010

श्रुतलेखन असंच करतात ना?

आज वर्गात ताई २४ ताशी घडयाळाबद्दल बोलत होत्या. नंतर आम्हाला त्यांनी श्रुतलेखन घातलं आणि यातून ताईंनापण लिहायचा कंटाळा येतो हे सुरुवातीलाच समजले. ताई श्रुतलेखन बघत-बघत माझ्यापर्यंत आल्या, मी त्यांना वही दिली. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिले आणि ३ सेकंदानंतर मी वर्गाबाहेर होते.

मी तर सगळं व्यवस्थित लिहिलं होतं!
तुम्हीच बघा!


२४ ताशी घडयाळ
काही ठिकाणी कंस रेल्वे ऑब्लिक विमान वेळ कंस पूर्ण बारा-बारा, बारा-बारा दोनदा लिहा. तासांच्या ऐवजी चोवीस नीहार गप्प बस ताशी दिवस मानला जातो पूर्णविराम आता खालच्या ओळीवर लिहा रात्रीचा एक ते दुपारचे बारा एरवी प्रमाणे किंवा नेहमी प्रमाणे आता खालच्या ओळीवर लिहा दुपारचा एक म्हणजे दु. एक बरोबर तेरा विश्वभारती बोलू नकोस दु. दोन बरोबर चौदा स्वल्पविराम दु. तीन बरोबर पंधरा आता मधे डॉट डॉट दया मिहीर ते आत ठेव आणि नंतर लिहा रात्रीचे बारा बरोबर चोवीस चला वह्या मला दाखवा.


बरोबर आहे ना? आता यात काही चिडण्यासारखं होतं का? ताई जे बोलल्या तेच लिहायचं असतं ना?
श्रुतलेखन असंच करतात ना?

Friday, January 15, 2010

माझा अभ्यास

मला ना काही समजतच नाही. आज मराठीच्या तासाला ताई काहीतरी वाकचार का वाकप्रचाराबद्द्ल बोलत होत्या. ते वाकप्रचार का वाकचार सहा होते एव्हडं नक्की. आणि हो तेव्हा साडेदहा वाजले होते, ताईंनी निळा- पांढरा ड्रेस घातला होता. आणि आता गृहपाठ दिला आहे कि प्रत्येकी एक वाक्य बनवून आण. मी लिहून घेतले आहेत ते वाकचार पण अर्थ काही लागत नाही. कोंबडे झुंजवणे... म्हणजे काय? बहुतेक दोन कोंबडे आणून त्यांची मारामारी बघणे! हा! जमलं!
आता वाक्य काय सोप्प! मी आणि नीरजाने कोंबडे झुंजवले. दुसरं, कान फुंकणे म्हणजे कानात हवा सोडणे! मी रमाचे कान फुंकल्यावर तिला गुदगुल्या झाल्या!
आपलेच घोडे दामटणे...स्वतःचे घोडे घेऊन पळवणे वाक्यं - मला आपलेच घोडे दामटता येत नसल्याने मला त्याचा क्लास लावायचा आहे. आता चौथं काय आहे?
डोळेझाक करणे? सोप्पं! मी झोपल्यावर डोळे झाक करते. आता डोक्यावर बसवणे काय? मला बाबाच्या डोक्यावर बसून पंखा साफ करता येतो. वा! काय हुशार आहे मी! किती पटकन जमलं मला! आता लास्ट, नाक खुपसणे ......... छे! काहीच समजत नाही... हा! आत्ता ट्यूब पेटली! अर्थ लिहायचा नाही, तर वाक्य लिहायचं आहे! मला नाक खुपसणेचा अर्थच समजला नाही!
आई मी चालले खेळायला! बाय!

Monday, January 4, 2010

आजार

तशी माझी तब्येत अगदी तंदुरुस्त आहे. माझ्यामते माझे पेशीसैन्य रोगांशी लढण्यास सक्षम आहे. त्यांच्याबद्‍दल विचार केला की माझ्यासमोर लाल-पांढरे विचित्र लोक, हिरव्या विचित्र शत्रूशी सामना करत आहेत असे दृश्य उभे राहतो. अशा या लाल-पांढर्‍या विचित्र सैनिकमित्रांसाठी मी दररोज सर्व अन्नघटक घेण्याचा प्रयत्‍न करते.
माझ्याजवळ आजार सहसा फिरकत नाहीत. ज्याची साथ आली आहे व तो मला झालाय असा एकच रोग आहे, "कांजिण्या". कधी हिवाळ्यात सर्दी, खोकला येऊन अधूनमधून हजेरी लावतात. उन्हाळ्यात कधी ताप येऊन पलंगावरुन उठू देत नाही पण याचे वार्षिक प्रमाण कमीच. एकदा हिवाळ्यात आईस्क्रीम खाऊनही खोकला मला शिवला नाही हे पाहून आईने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. (अर्थात बोटांना लागलेले आईस्क्रीम चोखण्यासाठी नव्हे.)
गेल्या दोन-तीन वर्षात विचार करता यावा असा आजारच झालेला नाहीये मला. पण १ली-२री मध्ये असताना मला धम्माल यायची. माझ्यामते आजार ही पुन्हा लहान होण्याची संधी आहे. सगळे आपल्याजवळ येऊन बसतात. बाबाने तर हज्जारदा हॅरी पॉटरच्या १ल्या भागाच्या मराठी अनुवादाला बेक्कार म्हंटले असूनही तेच पुस्तक पुन्हा वाचून दाखवायला तयार!. आजारी पडली असं आईने सांगितलं की तिथे आज्या-मावश्यांची बॅग भरायला सुरुवात. एक दिवस आजी येऊन धडकते मग चिवडा काय, लाडू काय नुसती धम्माल!
तेव्हा मी पहिलीत होते. मी फ्रॉक घालून आईजवळ गेले. तिने चेन लावायला हात पुढे केला तर तिला हाताला काहीतरी लागले. तो होता एक फोड!
त्यादिवशी आईने तू शाळेत जाऊ नकोस असे सांगितले तेव्हापासून मी बाबाच्या फोनची वाट पाहत होते. कारण एकदा खूप पाऊस होता म्हणून आईने मला शाळेत पाठवायला बंदी केली होती तेव्हा बाबाने फोन करून सांगितले होते की शाळेत पाठव, फार पाऊस नाही. पण अपेक्षेप्रमाणे बाबाचा फोन आला नाही. आई एका दुष्ट राक्षसासारखी माझ्या शिक्षणाच्या मध्ये येतीय असा विचार माझ्या मनात आला. पण आई बाहेर जाऊन माझ्यासाठी पुस्तके घेऊन आली तेव्हा माझा राग पळून गेला. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर कळाले की मला कांजिण्या झाल्या आहेत. तेव्हा मला बिचारीला ’कांजिण्या’ असे म्हणताही येत नव्हते. मी त्याला ’कानिण्या’ म्हणायचे.
आजारपण एकदाचे गेले. पण दुसरीच भीती छळू लागली. ते म्हणजे माझी जवळजवळ महिन्याभराची रजा आणि तेव्हा दिलेले गृहपाठ ! मला एका पुस्तकांच्या ढिगार्‍यात मी अभ्यास करत असल्याची स्वप्ने पडू लागली. मी अभ्यासापासून दूर पळण्याच्या नादात झोपेत आईला लाथा मारायचे. आणि मी स्वप्नात लाथा मारल्या की सर्व पुस्तके माझ्या अंगावर पडायची आणि मी भोकाड पसरायचे. या प्रकाराला आई जाम वैतागली होती. पण शाळेत गेल्यावर सर्वांनी सांगितले की खूप मुले रजा असल्याने गृहपाठच दिला नव्हता.
मला एक भलामोठ्ठा दगड डोक्यावरुन उतरल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी फारशी कधी आजारी पडले नसल्याने तो दगड अजून पुन्हा चढलेला नाही. पण त्याचा मेल्याचा काही नेम नाही.