Saturday, October 8, 2011

मी - आम्ही

मी जन्मले तेव्हा मी म्हणजे फक्त ’मी’ होते. माझ्यावर ना कोणाचा प्रभाव होता ना जबरदस्ती, ही ’मी’ तेव्हा मनमानी करायची, रडायची, हट्ट करायची. मग ही ’मी’ मोठी झाली. ती ’आम्ही’ या गटात गेली. आम्ही - आमचं कुटूंब, आम्ही विद्यार्थी, आम्ही पुणेकर इ. या ’मी’ ला हे "आम्हीपण" आवडू लागलं. ती प्रत्येक ’आम्ही’ चा एक भाग झाली. मी ’आम्ही’ त मिसळून गेली. "मी" ला ’मी" साठी वेळ पुरेनासा झाला. तिचे सगळे "आम्ही’ म्हणजे मित्र-मैत्रिणी, वर्गमित्र, कुटूंब, यात ती गुंतून गेली. आज याच्यासाठी हे उद्या त्याच्यासाठी ते, असं चालू झालं. "मी" ’मी’ ला विसरूनच गेली. ’सगळ्या आम्ही’त मीच काहीतरी वेगळं केलं तर माझ्या प्रतिमेचं काय होईल? "मी" नं प्रतिमेला जपलं पण "मी"पण जपायला विसरली.
खूप दिवस गेले "मी" मोठी झाली, तिचा "आम्ही " परिवारही मोठा झाला, वाढला. आणि एकदिवस जेव्हा "मी" नं मागे वळून पाहिलं तेव्हा ती हळहळली. ’मी’ ने मान मिळवला पण स्वतःची आवडविसरली. नवी ’मी’, आधीची ’मी’ राहिलीच नाही. ’सगळ्यांचं असच होतं का?’ मी ला प्रश्न पडला. सगळ्या "आम्ही" त स्वतःच्या "मी" लाही वेळ द्यायला हवा हे तिला जाणवलं.
’मी’ असतो तेव्हा ’आम्ही’ असावसं वाटतं आणि जेव्हा ’आम्ही’ असतो तेव्हा काहितरी ’मी’चं असावसं वाटतं.
’मी’ मग मनाशी विचार करू लागली, आणि लहानपणीच्या ’मी’ शी तिची गट्टीच जमली. ’मी’ला ’मी’चच नवल वाटलं. काय जादू केली असावी या ’आम्ही’ने?
प्रत्येकजणच या ’मी’ आणि ’आम्ही’मधे गुंतत जातो. ज्यांना ’मी’ची आस वाटते आणि आम्ही ची शक्ती समजते, त्यांनाच तर म्हणतात......
" ’मी’पण त्यांना कळले हो........"

[ ना.शा.संगतीच्या तासाला लिहिलेला लेख. ]


- मुक्ता

Friday, September 16, 2011

अंड्याचं कवच

माझा भाऊ सुहृद याने सांगितलेली गोष्ट


एक होतं बदक. त्याच्या अंड्याला एक कवच होतं. ते कवच निघून गेलं. पिल्लू बाहेर आलं.सोबत कवच घेऊन ते आई-बाबांना शोधायला निघालं. त्याने एका दारावर ”टिंग टॉंग” केलं. ” अहो, दार उघडा की!”
घरात कोणीच नाही.
त्याने दार उघडलंच नाही.
तिसर्‍या दिवशी तो एका मांजरीकडे गेला. मांजरीने विचारलं, ”खेळायला काय आणलंय?”
बदक म्हणालं, ” कवच आहे.”
त्या मांजरीला खूप केस होते.
तिने विचारलं,” कोण आहे?”
”मी आहे बदकाचं पिल्लू. आईबाबांना शोधायला आलोय.”
” मी आहे मांजर”
एवढा मोठा आवाज ऎकून ते घाबरलं.
” माझ्याकडे अंड्याचं कवच आहे.”
मांजरीने कवचावर हात ठेवला. ते कवच तुटलं.
” आधी तू कुठल्या घरात होतास?”
” मी कवचात राहतो.”
तिने बदकाचं घर मोडून टाकलं होतं.
” चल माझ्या घरात राहा.”
तिने कात्रीने भिंत कापली. घराचे दोन भाग केले.
घराला सगळीकडे भिंत होती एका बाजूला भिंतच नाही. छत अर्ढं अर्धं झालं. मग त्यांनी घर जोडलं. मग मांजरीचं घर बदकाचं घर एकच झालं.
त्यांच्या छताला एक भोक पडलं. त्या भोकातून त्यांना सूर्याचे डोळे दिसले.
सूर्यालापण एक मांजर आणि बदक दिसले.
रात्री झोपताना त्यांच्याकडे कुत्रा आला. तेंव्हा त्यांनी घड्याळात पाहिलं. एकवर काटा होता.
मांजरीने हरवायचं ठरवलं. ती एका इंजिनमधे बसली. सिग्नल पिवळा होता. सिग्नलवर इंजिन तुटलं. मग ती एका ट्रॅक्टरमधे बसली. त्या ट्रॅक्टरमधून उतरून ती जाळीत बसली आणि प्राणीसंग्रहालयात गेली. जाळीत एक सिंह होता. वरून ती जाळीच्या बाहेर निघाली. सिंह पण बाहेर आला. मग मांजर सर्कशीत गेली. सिंह आल्यामुळे सर्कशीतले सगळे सील मासे घाबरून बाहेर आले. सर्कशीला तीन लोक होते. तीन लोक लोक घाबरून बाहेर आले. विदुषकपण घाबरून बाहेर आला.
एक सील मासा खिडकीहून छोटा होता. रात्री तो खिडकीतून बाहेर आला. पळून कुत्र्याच्या घरी आला. कुत्रा पोहत होता. तो मासे खायला बाहेर आला. सील मासे घाबरले, निघून गेले.
कुत्रा भिंतीवर धडकून खाली पडला. त्याला काही मासा खाताच आला नाही. तो कुत्रा पडला त्याचे डोळे पांढरे झाले. त्याचे बुबुळ दिसलेच नाही.
बदकाचं पिल्लू आणि कुत्रा मांजरीला शोधायला लागतात. मग कुत्र्याला मांजर सापडली.

--- सुहृद

Saturday, April 23, 2011

एक जिवलग मित्र....... " हॅरी " नावाचा!

मला तो दिवस चांगलाच आठवतो, आम्ही औरंगाबादला होतो. त्यादिवशी मोठीआई ( माझ्या आईच्या आईला मी मोठीआई म्हणते. ) ने पुरणपोळी केली होती, म्हणून माझी स्वारी खुशीत होती.
मी पुरणपोळी खात खात टि.व्ही. पहात होते. मी तेव्हा ४-५ वर्षांची असल्याने मला नॉडी पहायला खूप आवडायचे. "नॉडी" चा एक एपिसोड संपला आणि जाहिराति सुरू झाल्या, तेव्हा मी यापूर्वी कधीच न पाहिलेली एक जाहिरात सुरू झाली, तिच्यात एक मुलगा वरून पडत असलेली पाकिटे गोळा करत होता. आणि एक गलेलठ्ठ माणूस त्याला जोरजोरात ओरडत होता! मला त्या प्रसंगाची क्षणभर मजा वाटली आणि पुन्हा नॉडी सुरू होई पर्यंत मी ते विसरूनही गेले होते. पण नॉडी संपल्यावर त्या जाहिरातीच्या शेवटी जी अगम्य अक्षरे आली होती तीच पुन्हा चमकली आणि एक लांबलचक अंगरखा घातलेला, पांढरी शुभ्र दाढी असलेला माणूस अंधारातून चालत येऊ लागला. एखाद्या ४-५ वर्षांच्या मुलाला घाबरायला हे दृष्य पुरेसे होते. मला तर तेव्हा अश्या भयकथा मुळीच आवडत नसत त्यामुळे मी पटकन चॅनेल बदलले, पण आई तोपर्यंत बाहेर आली होती आणि तिने ते दृष्य पाहिले होते, त्यामुळे तिने पुन्हा सिनेमा लावायला सांगितले आणि म्हणाली की " तुला आवडेल असाच आहे हा!" मला पटलं आणि मी सिनेमा पहायला सुरूवात केली. खरच मस्त होता तो! शेवटी शेवटी तर आईच मला सांगत होती की घाबरली असशील तर बंद करूया पण मी ऐकायला तयार नव्हते, मला तो सिनेमा शेवटपर्यंत बघायचा होता! मला प्रथमदर्शनीच प्रभावीत करणार्‍या त्या चित्रपटाचं नाव होतं.... हॅरी पॉटर...! हिच हॅरीची आणि माझी पहिली भेट!
त्यानंतर काही दिवसांनी पुण्याला आलो. तरीही मी "हॅरी" ला विसरले नव्हते, पण कायम त्याचाच विचार करायचे असे नाही. खरे तर मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण तरीही मी खूपच प्रभावीत झालेली होते हे नक्की! एक दिवस माझ्या नावाने एक कुरियर आलं, त्याच्या आत चक्क हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाची सी.डी. होती! मग काय त्या सी.डी. ची पारायणे सुरू झाली! मी ती इतक्यावेळा पाहिली की मला त्यातले संवादही तोंडपाठ झाले होते! त्यानंतर हॅरी पॉटरचा दुसरा भाग निघाला तेव्हा त्याचीही सी.डी. बाबाने आणून दिली! पण ती इंग्रजी असल्याने मी आईला जवळ बसून घ्यायचे आणि सी.डी पहायचे मग एखादा संवाद झाला की अर्थ विचारायचे. हॅरी पॉटरच्या दोन सी.डी पेक्षा काही मिळेल अशी माझी कल्पनाही नसताना....
एकदिवस आम्ही क्रॉसवर्ड मधे गेलो होतो तेव्हा बाबाला हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाचं मराठी पुस्तक दिसलं, त्याने मला विचारलं " घेऊया? " मी अगदी आनंदाने हो! असे सांगितले आणि हॅरी पॉटरचे पहिले पुस्तक माझ्या घरी आले! तेव्हा मला धड वाचताही येत नसल्याने कुणीतरी मला पुस्तक वाचून दाखवायचे, पण बाबा पुस्तक वाचून दाखवताना अनुवादावर इतकी टिका करायचा की जेमतेम एक प्रकरण वाचून होई! त्यामुळे आम्ही जेमतेम तीन प्रकरणे वाचली की कुठे होतो हे विसरून जायचो त्यामुळे त्या पुस्तकाचा शेवट मला कधीच ऐकता आला नाही. असं रटाळ वाचन चालू असल्याने मी कंटाळलेच होते त्यामुळे ते पुस्तक कुठेतरी हरवलं आणि मी ते शोधण्यासाठी फार कष्ट केले नाहीत .ते मला पुन्हा सापडलं तेव्हा मला अडखळत का होईना वाचता येत होतं. मी ठरवलं की आपण आता शेवटचं वाचूया! म्हणून अगदी शेवटचं प्रकरण उघडलं आणि वाचायला सुरूवात केली. सिनेमातल्यापेक्षा जास्त सविस्तर होतं हे! त्यातला मला एक संवाद फारच आवडला होता तो म्हणजे....

" हॅरी म्हणाला " पण सर, क्विरल मला स्पर्श का करू शकला नाही ?"
डम्बलडोरनी एक दिर्घ उसासा सोडला आणि ते म्हणाले-
" तुला वाचवण्यासाठी तुझ्या आईने आपले प्राण गमावले. जर एक कोणती गोष्ट व्होल्डेमॉर्टला कधीही कळली नसेल तर ती म्हणजे प्रेम, माया! त्याला हे कधीच कळलं नाही की जसं तुझ्या आईचं तुझ्यावर होतं तसं अत्यंत सशक्त प्रेम आपली काही आठवण ठेवून जातं. तो एखादा व्रण नसतो. दृश्य खूणही नसते.. असं उत्कट प्रेम असणं, जरी ते करणारी व्यक्ती नसली तरी, आपल्याला नेहमी काही संरक्षण देत असतं. ते तर तुझ्या रोमारोमात भिनलय. क्विरल, ज्यात व्देष अगदी खच्चून भरला होता, हाव होती, महत्वाकांक्षाही होती, व्होल्डेमॉर्टबरोबर आपला आत्मा त्यानं एक केला होता, याच कारणामुळे तो तुला स्पर्श करू शकत नव्हता. असं काही चांगलं ज्यात आहे अश्यांना स्पर्श करणंही त्याला वेदनात्मक होतं."

त्यामुळे मी उलट-सुलट करत सगळं पुस्तक वाचलं. आणि मग मी लहर येई तेव्हा ते काढून वाचायचे. मी दुसरीत गेले त्यावेळी उन्हाळयात हॅरी पॉटरचा दुसरा मराठी भाग आणला. आणि मग हे दोन्ही भाग मी इतक्यावेळा वाचायचे की शेवटी बाबाने ते आठवड्याभरासाठी लपवून ठेवले होते! मग काही महिन्यांनी हॅरी पॉटरच्या ३ र्‍या, ४ थ्या व पाचव्या भागाच्याही सीडी मिळाल्या. त्यांचीही पारायणे झाली.
याच काळात कधीतरी नीरजाचा वाढदिवस होता, तेव्हा मी ठरवले की हॅरी पॉटरचा पहिला भाग तिला लिहून द्यायचा! पण एवढी २९० पाने लिहून काढणे काही मजा नव्हती म्हणून आणि जर सगळं पुस्तक लिहून काढलं तर नीरजा वाचायचा कंटाळा करेल म्हणून मी कथा संक्षिप्त करून लिहीली. तरीही संदर्भ न गाळता एवढी करामत करणं अर्थातच कठीण होतं पण तरिही दिवस रात्र खपून मी ते पुस्तक तयार केलं होतं!
मी तिसरीत जाईपर्यंत संपूर्ण हॅरीमय झाले होते. त्याच भरात आम्ही रिक्षात हॅरी पॉटरची पात्रे ठरवून घेऊन त्यांचे प्रसंग बसवू लागलो. आम्ही चॉपस्टीक्स वापरून एकमेकांना मंत्र/ शाप देउ लागलो! एकमेकांना प्रश्न विचारू लागलो आणि चक्क वर्तमानपत्रही काढू लागलो! मी तयार केलेला दै. जादूगारचा एक अंक अजूनही माझ्याकडे आहे. आम्ही हॅरी पॉटरच्या विविध पात्रांची नक्कल करतो हे मात्र आम्ही गुपितच ठेवले होते. त्यानुसार आम्ही आम्हाला टोपण नावे सुध्दा दिली होती! उदा. हिंदूस्तान पेट्रोलियम ( hp म्हणजेच हॅरी पॉटर ), मांजर ( हर्माईनीने वेगळाच केस आणल्याने ती "मांजर" होते ना! =२ र्‍या भागात ), डोनाल्ड डक ( रॉनल्ड विज्ली ), टोपीवाल्या बाई ( मॅक‍गोनागल ), घुबड ( हेडवीग) इ.!

तिसरीत आल्यावर एक दिवस कुणीतरी म्हणाले की हॅरी पॉटरचा तिसरा मराठी भाग आला आहे! झालं! त्यादिवशी मी आणि आई इथून पाथफांडरला गेलो, आणि पुस्तक घेऊन आलो! पाचवीत कल्याणी म्हणाली की चौथा भाग आला आहे, त्यामुळे आम्ही सेनापती बापट रोडवर जाऊन चौथा भाग घेऊन आलो. हा चौथा भाग खूप मोठा आहे , ६७२ पानांचा! यावेळी मी एक गंमत केली हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं ( दोन दिवस लागले, अभ्यास धरून! ) त्यानंतर पुन्हा पहिल्या प्रकरणापासून सुरूवात केली! असं सलग वाचन १० वेळा केलं आणि मग असं कळलं की पहिल्यांदा वाचतो तेव्हा गोष्ट कळते. दुसर्‍यांदा वाचताना प्रखरपणे कळते, तिसर्‍यांदा वाचताना हलकी फुलकी वाक्य लक्षात येतात, चौथ्यांदा वाचताना घडलेल्या प्रत्येक घटनेचा अर्थ लावता येतो,पाचव्यांदा वाचताना वाक्य लक्षात रहातात, सहाव्यांदा वाचताना विविध प्रसंगांच्या वेळी व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रिया समजून घेता येतात आणि नंतर वाचताना आपणही त्या पात्रांसोबत तिथे उतरतो आणि मंत्रमुग्ध होऊन जातो!
आता माझ्याकडे इंग्रजी हॅरी पॉटरसुध्दा आहेत त्याची कथा....
मी हॅरीच्या पहिल्या आणि दुसर्‍या भागाची पारायणे करत असताना आई म्हणाली की पुस्तकातली वाक्य तर तुला तोंडपाठ आहेतच, मग इंग्रजी पुस्तकं वाचून पहा! झालं! त्यादिवसापासून मी रोज आईला पुस्तकाबद्द्ल विचारायचे, शेवटी एक दिवस भर पावसात बाहेर पडून आम्ही पहिला भाग आणला! तो मी झपाटल्यासारखा वाचून संपवला. मग दुसरा, तोही संपला! तिसरा भाग जवळच्या दुकानात मिळालाच नाही म्हणून पॉप्यूलर पर्यंत जाउन आणला, हे पहिले तीनही भाग मी मराठीतून वाचले होते पण चौथा भाग घेतला तेव्हा काहीच नीट समजेना म्हणून मी ते पुस्तक ठेवून दिलं.
चौथीचं वर्ष हे माझ्यासाठी फारच छान गेलं कारण या एका वर्षात मला तीन इंग्रजी हॅरी पॉटर मिळाले! पाचवीत ४ था भाग मराठीतून आला त्यामुळे इंग्रजीसुध्दा वाचला, आणि मग एक तासभर रडून ५ वा भाग मिळवला! तो घेताना आईच्या रागिट चेहर्‍याकडे पहात बाबा म्हणाला होता " खेळण्यांसाठी नाही; पुस्तकांसाठी हट्ट करतीये हे किती चांगलं आहे! " यानंतरचे भाग मिळवण्यात माझं काहीच कर्तृत्व नाही कारण पुढचे दोन्ही भाग बाबाने स्वतःसाठी घेतले होते.

माझ्यामते हॅरी मुळे मी वाचू लागले. म्हणजे आधी वाचायचे नाही असं नाही कारण १ ला भाग मिळायच्या आधी मला वाचताच यायचं नाही! पण माझ्या वाचनाची सुरूवात हॅरीने केली. आणि मग मी फक्त त्याचाच ध्यास घेतला. अगदी १२ जून २०१० पर्यंत मी वाट पाहिली की मला कदाचित पत्र येईल, पण नाही आलं! [ अर्थात जर माझ्याबरोबर आदित्य ( आठवले ) ला बोलावलं असतं तरच मी गेले असते कारण मला खूप छान इंग्रजी बोलता येत नाही. ] सगळे म्हणतात की तूच सगळ्यांना हॅरीचा नाद लावला आहेस! मला हे त्यांचं बोलणं ऐकायला छान वाटत असलं तरी
सत्य हेच आहे की ती हॅरीची गुणवत्ता आहे! मी तर फक्त त्याची बाकिच्यांशी ओळख करून दिली आहे!
कधी कधी असं वाटतं की हा आपला मित्र आपल्याला दुरावत तर नाहिये ना? सहावीत आल्यावर प्रथमच मी वेगवेगळी मराठी पुस्तके वाचू लागले, त्यांची पारायणे करू लागले आणि कधी कधी चक्क हॅरीला बाजुला सारून इतर पुस्तके घेउ लागले. पहिल्यांदाच हॅरीबद्द्ल पडणारी स्वप्ने कमी झाली...

तसं म्हणायचच असेल तर हॅरी म्हणजे माझी ओळख आहे. कित्येक जण मला त्याच्या संबंधी प्रश्न विचारतात, गोष्ट सांगायला सांगतात... पण ही माझी ओळखच पुसली जातीये असं वाटतयं... परवा मुल्यमापनाच्या वेळी ताईंनी विचारलं " सध्या काय वाचतीयेस? " तर मी चक्क " काही नवीन नाही " असं म्हणाले. नंतर आठवलं आपण हॅरी पॉटर आणि अग्निचषक पुन्हा वाचत आहोत! तेव्हा मनाला चटका बसला, वाटलं कित्येक दिवस मित्र म्हणू उराशी बाळगलेल्या या पुस्तकाला आपण विसरलो कसे?
काल पुन्हा सगळे भाग वाचले, जीवात जीव आल्यासारखं वाटलं! तेव्हाच ठरवलं एकदा पक्की केलेली मैत्री सोडायची नाही, अगदी आयुष्यभर! क्षणासाठीच मी या माझ्या मित्राला विसरले होते, पण आता कायम लक्षात ठेवीन!
आज, जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी, हा लेख.... हॅरीसाठी!
कदाचित हा लेख नीट लिहीला गेलाही नसेल पण हे सगळं माझ्या मनातलं आहे, जसं आठवेल तसं उतरवत गेलेलं, कदाचित बालिशपणासारखं....
पण माझ्यासाठी खूप महत्वाचं, कारण या लेखाच्या निमित्तानी मला हॅरीला सांगायचय, तू खरा असशील अथवा नसशीलही, माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये,
कदाचित मी इतर पुस्तके वाचत असल्याने तू कधीतरी दुखावलासुध्दा गेला असशील, पण मी तुला मुळीच विसरलेली नाही, कारण तूच मला लढायला शिकवलं आहेस, कणखर बनवलेलं आहेस,

तूच माझा जीवाभावाचा मित्र आहेस!


- मुक्ता

Tuesday, April 19, 2011

अक्षरनंदन शाळा

अक्षरनंदन म्हणजे एक आगळी वेगळी शाळा.
या शाळेचा आता मला लागला लळा.

खूप नाही चकचकीत,
पण चकचकीतपणाला बाजूला सारणारा
आपलेपणा आहे तिच्यात !
खूप नाहीत रीतीरिवाज
पण त्यापेक्षाही इतरांबद्दल
भरपूर आदर आहे तिच्यात !

वह्या भरत नाही इथे कोणी,
अनुभवातून शिकतात सारे
चाकोरीबद्‍ध शिक्षण नसते,
मुक्तपणा असतो त्याच्यात !

गणवेशाची सक्‍ती नसते,
अभ्यासावर भक्‍ती असते !
हुशार होतकरु नागरिक घडवते
ही आगळी-वेगळी शाळा !

गुणांचे बंधन नसते,
दोस्तांचीही संगत असते
निर्मळ आनंद खळखळणारे, भरभरून देते ,
हि आगळी वेगळी शाळा!

ताई भरपूर ज्ञान देतात,
निसर्गाची महती गातात !
मुलांचे बालपण हरवणार नाही
याची काळजी घेते ही आगळीवेगळी शाळा !

कधी वाटते, दहावीनंतर कसे असेल जगणे माझे,
शाळा नाहीत, दोस्त नाहीत, फक्‍त अभ्यासाचे साचे !
शाळा सोडण्याच्या कल्पनेनेच, डोळ्यात अश्रू उभे राहतात.
हे प्रेम, वात्सल्य, कधी मिळेल का परत आयुष्यात ?
काहीतरी दूर होतंय याची जाणीव होते आहे
म्हणून मन मोकळं होण्यासाठी, आता कविता लिहिते आहे.


(सहावीचे वर्ष संपतानाची कविता)

Friday, April 15, 2011

आत्याला सोडवायला दिलेला पेपर......

हॅरी पॉटर मंडळातर्फे....

हॅरी पॉटर शिष्यवृत्ती
प्रश्नपत्रिका

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्र.१ गाळलेल्या जागा भरा. वाक्य उतरवून घ्या.

1. हॅरी पॉटर आणि ----- हा ४था भाग आहे.
2.हॅरीचे संपूर्ण नाव "------ ------ ------" असे आहे.
3.हॅरीचा जन्म -------- ला झाला.
4.हॅरीच्या एका वर्गमैत्रिणीचे नाव भारतीय आहे. ती म्हणजे ------- व तिच्या जुळ्या बहिणीचे नाव ------- असून
ती ------- या हाउसमधे आहे.
5.सिरियस ब्लॅक हा हॅरीचा ------- होता
6.सिरियस व रिटा दोघेही -------- होते.
7.हॅरीची जन्मतारिख -------- ही आहे. ( साल नको. )


प्र.२ ओळख द्या. साधारणतः इतिहास, कार्य या सर्व गोष्टी यायला हव्यात.

1.सिविरस स्नेप
2.व्हॉल्डेमॉर्ट
3.फायरबोल्ट

प्र.३ सविस्तर उत्तरे द्या.

1.व्हॉल्डेमॉर्टनी हॅरीला ( सातव्या भागात ) मारूनही तो कसा जिवंत झाला? कशामुळे?
सिविरस स्नेप डम्बलडोरच्या बाजूने कसा आला? कशामुळे? त्याने डम्बलडोरना कोणत्या महत्वाच्या बेताला मदत केली?

2.मृत्यूची बक्षिसे म्हणजे काय? यांच्यामुळे काय होतं?

3.हॅरीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करा.

प्र.४ जोड्या लावा.

1.हॅरी लुपिन
2.स्नेप अजेय छडी
3.डम्बलडोर शापांची माहिती
4.टोंक्स पॉटर

प्र.५ नावे लिहा-

1.हॉगवर्टसची हाऊस =
2.डर्स्ली कुटुंबातील सदस्य =
3.डम्बलडोर परिवारातील चौघांची नावे =
4.संपूर्ण विज्ली कुटुंबियांची नावे =
5.त्रिजादुगार स्पर्धेत भाग घेतलेल्या व्यक्ती =
6.त्रिजादुगार स्पर्धेत भाग घेणार्‍या शाळा =
7.व्हॉल्डेमॉर्टचे समर्थक अर्थात प्राणभक्षी =

प्र.६ फरक लिहा.

1.ड्रेको मॅल्फॉय , हॅरी पॉटर
2.जिनी विज्ली , लव्हेंडर ब्राऊन

प्र.७ हॉगवर्टसच्या किमान ६ प्रोफेसरांची नावे व त्यांचे विषय लिहा.

प्र.८ विशेषणे द्या. ( कमीत कमी १० )

1.हर्माइनी जीन ग्रेंजर =
2.स्नेप =

प्र.९ निबंध लिहा. कमीत कमी २५ ओळी.

1.क्विडिच
2.हॉगावर्टस
3.ग्रिंगॉटस

प्र. १० तुम्हाला हॉगवर्टसला शिकायची संधी मिळाल्यास काय कराल ते १५ - २० ओळीत लिहा.

प्र.११ छू मंतर गल्लीचे वर्णन करा. उदाहरणे अवश्य द्या.

प्र.१२ निदान ३ झाडूंच्या प्रकारांची नावे व योग्यता लिहा.

प्र.१३ एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.जादूई जगात अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतःच आपला मालक निवडते?
2.पर्सी आयर्लंड विरूध्द बल्गेरिया सामन्याच्या वेळी कोणता अहवाल लिहीत होता?
3.हॅग्रिड कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे?
4.कोण फक्त ग्रिफिंडॉरची तलवार वापरू शकतो?
5.कोणत्या पक्षाची कोणती गोष्ट जखम भरू शकते?
6.सुवर्णशोधक काय काम करतात?

प्र.१४ थोडक्यात उत्तरे लिही.

1.व्हॉल्डेमॉर्ट चे नाव त्याने व्हॉल्डेमॉर्ट असे का ठेवले?
2.मायासुवर्ण म्हणजे काय?


प्र.१५ भरपूर माहिती लिहून स्पष्ट करा...

1.व्हॉल्डेमॉर्टचा पुनर्जन्म
2.हॅरीने घेतलेला होरक्रक्सचा शोध
3.स्नेपचा हॅरीबद्दलचा हेतू

1.जेके रोलिंगला कथा कशी सुचली? कशामुळे?
2.हॅरी पॉटरचा विक्रमी खप
3.जेकेच्या रहाणीमानात पडलेला फरक


प्र.१६ विचार करून सोडव.

हॅरीच्या मित्राचा पाळीव मित्र , त्याचा शत्रू, त्याची मोठी मैत्रिण , तिचा पाळिव मित्र , त्याचा नवीन मोठा कैदी मित्र , त्याचा मित्र , त्याचा मुलगा , त्याची पाळिव मैत्रिण ,
तिचा खुनी , त्याचा शुध्द रक्ताचा- गुलाम बाळगणारा मित्र , त्याची मैत्रिण , तिची शत्रू , तिचा आवडता (माजी) शिक्षक.........

कोण??



----------------------------------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------------------------------------------

Sunday, April 3, 2011

// क्रिकेटप्रेमींना पत्र //

लोक हो,

अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या. क्रिकेट पहाण्यासाठी या. आपापले उद्योग टाळून या. भारताच्या जर्सी घालून या. ८ तासांची सवड काढून या.
हे क्रिकेट म्हणजे काही कबड्डी - खो, खो नाही. नुसतं बसून रहाणं आहे. मधूनच ओरडणं आहे. क्रिकेटचं प्रेम मनात ठेवत दिवस भर एका जागी बसायचं असतं. या खेळात असते हार - जीत, चुकीचे निर्णय , २ - ३ पॉवर प्ले. पण हे आव्हान असतं जिद्दिला, क्रिकेटप्रेमाला!
ध्यानात घ्या, तिथे आपले जुने खेळाडू काही इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला, कित्येकदा पराभवही!
कधी कधी प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्यावर मात केली असेल, तो भलामोठा विश्वचषक मुकाट्याने प्रतिस्पर्ध्यांना द्यावा लागला असेल त्यांना!
त्या प्राचिन क्रिकेटचं स्मरण, हा आहे क्रिकेट पहाण्याचा उद्देश!
आपल्या पुर्वजांनी क्रिकेटवर जिवापाड प्रेम केलं होतं. ते वेळ घालवून पाहिलं होतं!
गावसकरांची मते तुम्हाला ठाउकच आहेत, ते म्हणतात,
जनतेच्या एकतेचं कारण म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा विश्वचषक हातातून जाताच समाज दुःखी होतो. समाज दुःखी झाल्यावर, त्याच्या पाठिंब्या शिवाय क्रिकेट कसे खेळावे? म्हणूनच याआधीच्या क्रिकेट्वीरांनी (१९८३ मधे) विश्वचषक जिंकून क्रिकेटप्रेम वाढते ठेवले आणि मगच पुढिल स्पर्धांमधे उतरले. आत्ताचे क्रिकेटप्रेम तर कपिलदेवने १९८३ मधेच निर्माण केलेले होते!
गावसकर पुढे म्हणतात,
क्रिकेट विरहीत समाज म्हणजे आनंदापासून वंचित राहिलेला समाज. म्हणूनच ज्या व्यक्तींस प्रसिध्दी ह्वी अशांसाठी ( नेते, अभिनेते ) क्रिकेट हेच प्रसिध्दीचे साधन, क्रिकेट हेच त्यांच्या लोकप्रियतेचे मूळ, क्रिकेट म्हणजेच पैसा, क्रिकेट हेच त्यांचे बळ, क्रिकेट हिच धनलक्ष्मी, क्रिकेट हेच आपले क्षेत्र, हक्काचे ठिकाण ! म्हणूनच प्रसिध्दीसाठी आपले प्राण ओतून स्वतःच्या क्रिकेटप्रेमाचा प्रसार करणे ही अशांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट!
क्रिकेट हा तर इंग्रजाचा खेळ, मग त्याला एवढा मान कशाला द्यायचा हा एक प्रश्न तुमच्या मनात येउ शकेल, पण त्याचं एकच उत्तर आहे, आज क्रिकेट ऐवजी कार्टून्स पाहिली जातात, बेब्लेडस फिवली जातात! फूटबॉल खेळला जातो! क्रिकेट हा एक संथ खेळ आहे असं म्हणून त्याची उपेक्षा केली जाते! म्हणून क्रिकेट, जे एके काळी तीर्थ होतं त्याचा निदान अनादर तरी करू नये!
आजपर्यंत २२ विश्वचषक झाले आहेत असा पुस्तकांत उल्लेख आहे! त्यातले मी ४ पाहिले आहेत. अगदी निवांतपणे पाहिलेत.
क्रिकेट कसं पहावं याचं एक तंत्र आहे. ते धावत-पळत पाहून उपयोग नाही. खेळपट्टीची संपूर्ण माहिती, तिचा इतिहास, त्या सामन्याचं महत्व, मैदानाचा आकार, दोन्ही संघांची माहिती , त्यांच्या अपेक्षा या सार्‍याची कशी नीट माहिती पाहिजे, तरच त्याचं महत्व लक्षात येतं.
धावता- पळता सामना पहायला क्रिकेट म्हणजे काही सिरियल / घड्याळ नाही! मधेच स्कोर पाहून जाणं हा त्याचा अपमान व आपलाही! असं करू नये.
क्रिकेट हा प्रकाशदिप आहे. उणं- दुणं स्वच्छ दाखवणारा. काय सोडायचं व काय घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं.
ज्याचं स्मरण होताच मस्तक नम्र होतं, बाहू स्फुरण पावतात, शरिरावर रोमावळी उभ्या ठाकतात त्या विजयी सचिन तेंडूलकरने या मैदानावर एक तरी चौकार मारला आहे. तेव्हा....
सचिनचे बोलणे, चालणे, सल्ला देणे सगळं त्या मैदानाने अनुभवलेलं आहे!
जर त्या मैदानाला वाचा फुटली तर, ते आपल्याला म्हणेल "होय, तो पवित्रात्मा आम्ही आमच्या अंगाखांद्यावर खेळवला आहे!"

पण त्या वेळेचं महत्व आपण लक्षात घेत नाही. जिथे आपले क्रिकेटवीर निकाराने लढत असतात , ते पहायचं सोडून आपण पत्त्यांचे डाव मांडतो!
अविस्मरणिय सामना बघण्याऐवजी, आपण वेगळ्याच विषयांवर गप्पा ठोकतो!
हे असं करता कामा नये...
क्रिकेट ध्यानात येत नाही तोपर्यंत तो एक खेळ असतो
पण ते ध्यानात आल्यावर तो एक जीवन-मरणाचा प्रश्न असतो! हा खेळ खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान तिथे दिलेलं असतं,
ते जाणवायला हवं! मग क्रिकेट पहाणे सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसतेच वेळ घालवणे होते.
यावेळी मनस्वास्थ्यासाठी जर क्रिकेटकडे पहायचं ठरवलं तर अशी रोमहर्षक, चैतन्यमय, वय विसरून टाकणारी, तरूणाईस हाक घालणारी गोष्ट शोधूनही सापडणार नाही!
क्रिकेट पहाताना मनाची होणारी चलबिचल, कितीही सुधारलेले असलो तरी त्या क्षणी मनात येणार्‍या अंधश्रध्दा याची कशाशीच तुलना करता येणार नाही
सांसारिक व्यापांपासून मन मुक्त होतं, केबलवाले, टिव्ही दुरूस्त करणारे लोक यांच्याशी मैत्र जुळतं, थोडावेळ आरामात बसल्याने आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं, वाढ्तं वय तिथेच थांबतं.
नाना समस्यांनी खच्चून भरलेल्या या जीवनातून काही क्षण तरी बाजूस काढून जे क्रिकेट पहातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. साक्षात्कार म्हणजे तरी यावेगळं काय
असतं?
इति!

- मुक्ता


[ "गोनिदांचे दुर्गप्रेमिंना पत्र" वरून प्रेरणा घेउन. ]

Thursday, March 10, 2011

पत्र

९ / ३ / ११, बुधवार
पान १
प्रिय आत्या, आजोबा, आजी,
सप्रेम नमस्कार! ( हे आपले उगाचच, दरवेळी काय विचारायचे कसे आहात? मला ठाऊक आहे तुम्ही कसे आहात!)पत्र लिहिणेस कारण की (पुढे सुचत नाही) आज कुठलेतरी रिकामे पाकीट सापडले आणि कितीतरी दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. खरे तर मी नीरजाला तिच्या सादरीकरणासाठी द्यायला कविता शोधत होते/ आहे. पण मधेच हे पाकिट दिसले आणि उचलले पेन लावले कागदाला! (उचलली जीभ लावली टाळयाला ) तुम्हांला एक विशेष ’ ता. क.’ सांगायचाय...... संस्थेची माहिती लिहायची होती, कविता लिहायची होती हे तुम्हांला ठाऊकच आहे. मी मयुरदादाच्या 'SPTM' ( save pune trafick (स्पेलिंग चूक) movment) बद्दल माहिती लिहिली होती. आधी ताईंची परवानगी घेऊन माझ्या ताज्या कविताही वाचायच्या ठरवल्या होत्या. शिवाय विंदांची ’घेता’ होतीच! मी सुरूवात केली आणि पहिली म्हणजे माझीच कविता वाचून संपवली, ती झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला! अशा बाबतीत चोखळदंड असणार्‍या वीणाताईंनीही कविता छान असल्याची पावती दिली., दुसरी कविता माझीच सुरू झाली, ती संपल्यावरही टाळ्या! मी चकीतच झाले! मग SPTM ची माहिती वाचायची होती (रमाने माहितीचे सुरूवातीचे वाक्य लिहिले होते, ’मी आज तुम्हांला फारश्या परीचित नसलेल्या संस्थेची माहिती सांगणार आहे!’ ) ती झाल्यावरही टाळ्या! (यावेळी टाळ्या का पडल्या ते मलाही ठाऊक नाही!) मग कोणीतरी ओरडले ” अरे, अजून एक कविता आहे” मग आमची घेता सुरू झाली. ती झाल्यावरही टाळ्या! या १० जणांमधे मला एकटीला एवढ्या टाळ्या मिळाल्या असतील! बर्‍याच जणांनी मला
पान २
सांगीतले की त्यांनी मला आधीच पूर्ण मार्क दिले होते! ( यावेळी विद्यार्थी मार्क देणार होते!)
आत्या, आलीच बघ १० तारीख, आता कितीसे दिवस उरलेत? ( गणित कच्चं) आज मोठीआई - आजोबा पनवेलला पोचलेत. ईशानची परीक्षा झाली सुद्धा! एकेकाचं नशीब असतं नाही का? (उत्तराची अपेक्षा नाही.) आमची उद्या चित्रकलेची परीक्षा आहे. आज आठवणीने खडू भरलेत. हल्ली गृहपाठाच्या बाबतीत माझ्या अंगात भयानक आळस भरलाय! उन्हाळा खुणावतोय दुसरं काय? आमचे वर्गमित्र-मैत्रिणी अभ्यासाला लागले सुद्धा! आमचं काय आदल्या दिवशी अभ्यास करूनही चांगलं चाललंय! मला आत्तापर्यंत बर्‍याच पेपरावर लिहून मिळालंय! ’अभ्यास केल्याचे जाणवते’ डोंबलाचा अभ्यास!
आता मला वाटतंय लवकरच मी दुसरा कागद घेणार. तशी माझी शैली ओघवतीच आहे, नाही का?
आईगं ss छे! डास चावला! उन्हाळ्यात डास कमी का होत नाहीत बरं?
माझे केस बर्‍यापैकी वाढलेत पण लोकांना मात्र तसं दिसत नाही. कारण ते खांद्यावर असल्याने खालून कुरूळे झाले आहेत. मी सारखे ते बोटे फिरवून सरळ करत राहते पण त्यामुळे ते आणखीनच कुरूळे होतात की काय अशी मला भीती वाटतीय! आजी, एखादा उपाय सुचवना? (तेल लावणे सोडून)
आमचे पेनबुवा आता लवकरच शाईची मागणी करणार असं दिसतंय, बहुदा पुन्हा उठावं लागेल, काय कटकट आहे!
पान ३
माझ्याकडे रिटा स्किटर सारखी लेखणी हवी होती, पटापट लिहिणारी! (स्वत:चं स्वत:)
खूपच उशीर होऊ लागलाय असं दिसतंय. आई, बाबा, लंपू एव्हाना झोपी गेले असतील. बाबूजींच्या मोबाईलवर ”गेले द्यायचे राहून ss'' ऎकू येतंय. ज्या कोणी गातायत त्यामुळे प्रसन्न वाटण्याऎवजी उदासवाणंच वाटतंय. जाउदे नाहीतर मला ’गेले द्यायचे राहून तुझ्यासाठी लिहिलेले पत्र.....” असं म्हणावं लागेल!
काल आम्ही मनीषाताईंचा ’सोलो’ पहायला गेलो होतो. काय सुंदर होता म्हणून सांगू! पण त्याआधी आयोजित केलेला सत्कारसमारंभ बाळबोधच होता/वाटला. पतंगराव कदम आले होते. ऍड. मकरंद ही होते (आडनाव विस्मृतीत, हे म्हणे दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांचे माहेरघर!) दाजीसाहेबही होते. त्यांनी मनीषाताईंना ५ हजार रू. चा चेक पाकीटात घालून दिला. ते पाकीट दिल्यावर म्हणाले ’आत पाच हजार रू. चा चेक आहे, तो उघडून दाखवू काय?’ या वाक्यानंतर जो हशा पिकला त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. सर्वांनी आपले मनोगत (भाषण) व्यक्त करायचे होते. एक किर्ती.... नावाच्या बाईंनी आपल्या संथ आवाजात सुरूवात केली आणि ’स्त्रिया कधीच दीन नव्हत्या’ या एका वाक्यावर टाळ्या/ हशा मिळवून गेल्या ( वाक्य तिसरे होते का ते आठवत नाही, कदाचित त्या पुणेकर नसतीलही) तेवढ्यात जानकीबाई (मृण्मयी देशपांडे) आल्या आणि मकरंद टिल्लू तेव्हढ्यात ७.०० वाजताच्या कुंकूंवर विनोद करून गेले. पतंगराव तर काय बोलत होते ते
पान ४
त्यांनाच ठाऊक! आधीच ते ’पतंगरावांचे मत राज्यसरकारला खूप महत्त्वाचे असते/ आकाशात भरारी घेणारा पतंग’ इ. टिल्लूंच्या स्तुतीमुळे हरभर्‍याच्या झाडावर जाऊन बसले होते! त्यांचे ’मनोगत’ उरकल्यावर ऍड. मकरंद उभे राहिले. त्यांनी अशा थाटात सुरूवात केली जणू ते ’शास्त्रा’ चे वकील म्हणूनच आले होते. असं शास्त्र सांगतं, तसं शास्त्र सांगतं असं ते सारखं- सारखं म्हणत होते. आता शास्त्र सर्वांच्या आधी त्यांना सांगतं आणि मग ते आपल्याला सांगतात की ते आपल्याला वाट्टेल ते ’शास्त्र’या नावाखाली सांगतात यापैकी सत्य काय देव जाणे!/ शास्त्र जाणे! अजून एक भारदार गृहस्थ तिथे उपस्थित होते. अगदी झब्बा गांधीटोपी घालून ते मनोगत सांगायला उभे राहिले तेव्हा बाबा म्हणाला,’आता बघ, श्लोक म्हणतील’ आणि खरोखरच त्यांनी ’समुद्र’ पासून सुरू होणारा श्लोक म्हणायला सुरूवात केली. शेवटी दीपश्च दीपश्च असं दहावेळा म्हणाले आणि मग स्वत:च्या कार्याबद्दल सांगू लागले! एकूणच माझ्यामते निवडसमितीला महिलांचा सत्कार करण्यासाठी कोणी मिळाले नसावे. मला त्यांना सल्ला द्यायला आवडेल!
आजची मॅच छान झाली ना? तशी यशाबद्दल खात्री होती, तरीही!
अच्छा! आता झोप येतीये, पत्र मिळाल्यावर लगेच फोन करा.
-- तुमची लाडकी
एकुलती एक नात, एकुलती एक भाची,
मुक्ता!

Sunday, March 6, 2011

माझ्या मैत्रिणी

शाळेत मिळाल्या आहेत मला मैत्रिणी छान
मैत्री आहे टिकून तरीही असलो जरी लहान

पहिली मैत्रिण, तिचं नाव नीरजा
तिच्या संगतीत येते खूपखूप मजा
सुंदर चेहरा आणि इवलेसे डॊळे
दोस्ती कधी झाली ते त्यांनाही न कळे !
प्राणी पाळण्याचा छंद आहे तिला
मातेसम प्रेम देते तिच्या ’मोतिया’ला
हसतो कधी आम्ही देतो एकमेका टाळी
माझी पहिली मैत्रिण अशी साधी-भोळी !

रमा आहे माझी दुसरी मैत्रिण
खेळताना कधी होते माझीच बहिण
आहे थोडी खुजी, गोरी नी गोंडस
देवानं दिलं आहे तिला पुरेपुर बाळसं
काळेकाळे डोळे आणि टोकदार नाक
आवाजात असते तिच्या गमतीची झाक
गालावर पडती खळ्या जेव्हा ती हसते
तेव्हा माझी ही दुसरी मैत्रिण खूप छान दिसते !

माझी तिसरी मैत्रिण, नाव तिचं कल्याणी
रंग तिचा सावळा नि मधुर वाणी
तिचे केस आहेत दाट, काळे
काळ्याच रंगाचे आणि मग डोळे
कधी जर चिडली तर खूपच ओरडते
पण थोड्याच वेळात राग विसरुन खूप खूप हसते
कधी काही हितगुज करुन मला मिठी मारते
तेव्हा माझी ही तिसरी मैत्रिण मला भारीच आवडते !

माझ्या चौथ्या मैत्रिणीचं नाव आहे गौतमी
ही इतकी बोलते की म्हणावं लागतं "बोलणं कर कमी"
गौतमीचा आवाज आहे खणखणीत नी गोड
वस्तू असतात तिच्या नीटनेटक्या, कधी होत नाही त्यांची मोडतोड
शाब्दिक कोटया करण्यात ही आहे पटाईत
त्यांचे अर्थ कोणालाच पटकन कळत नाहीत
वाचनाचा आहे हिला छंद
सध्या ती वाचतीये पानिपत व तेव्हाचे हत्याकांड
तिचे माझे सूर चांगलेच जुळतात
तिच्या मनातले विचारही मला पटकन कळतात.
संकटाशी ही करते धैर्याने सामना
आमची मैत्री अशीच राहो हीच ईश्वरचरणी कामना

माझ्या पाचव्या मैत्रिणीचं नाव आहे सई
काहीना काही उद्योग ही करतच राही
"हॅरी पॉटर’ वरच्या आमच्या चर्चा भरपूर रंगतात
बाकीच्या मग येऊन आम्हाला थांबायला सांगतात.
सईचा स्वभाव आहे स्वच्छंदी, मुक्‍त
राग आटोक्यात ठेवणे तिला जमत नाही फक्‍त.
सई कायम करत रहाते विनोद छोटॆ छोटॆ
ती आहे प्रामाणिक, बोलत नाही खोटे
तिच्या संगतीत गप्पा खूप होतात मारुन
आम्हाला रोज खाउ आणून देते घरुन
सई कायम वापरते तिची कल्पनाशक्‍ती
माझी ही पाचवी मैत्रिण कायम शोधत असते युक्‍ती !

छोटी हसरी स्वप्ना आणि धडपडी मैथिली
सडेतोड उत्तरे देणारी वैष्णवी आणि
अवखळ स्पृहा, बडबडी विश्वभारती
आणि आनंदी नेहा, सध्याच्या प्रतिनिधी
प्रणोती आणि वैदेही, स्वत:तच दंग असणार्‍या
रेवा नि सायली

अजून किती सांगू गुण आणि नावे ?
आम्ही एकमेकींवर प्रेम करतो मनोभावे !

एकमेकींच्या सहवासात नाही होत कधी दु:ख
या अक्षरनंदनच्या शाळेतील ८ वर्षात आम्हाला
मिळाली आहेत सारी सुखं !

Tuesday, February 15, 2011

माझ्या आवडी - नावडी

आवडी-नावडी सर्वांनाच असतात. अगदी सगळ्यांना!
देवपण वाट्याला आलं तरी कुणाच्या वाटची दु:खं चुकली आहेत होय! पु.ल. तर एका भाषणात म्हणाले होते की ”तुम्ही उगाचच मला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे विशेषणे लावली आहेत! मला माणूस म्हणून राहू द्या की, ही विशेषणे लावली की थोरपणे वागायची जबाबदारी येते!” थोडक्यात काय? माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आवडी - नावडी या असतातच. [ बर्‍याच मोठ्यांना कारल्याची भाजी मुळीच आवडत नाही!] आता मोठ्यांचं जाऊ दे, आपण सामान्यांत येऊ, सामान्यांत म्हणजे नक्की कुठे? तर माझ्यापर्यंत हं, ऎका माझ्या आवडी-निवडी --
मला काय आवडतं? नक्कीच खूप काही आवडतं पण कशाबद्दल जवळीक वाटते? असं विचारलं की थोडं अस्वस्थ वाटतं , जवळीक हा शब्द खूपच हळवा नाजूक वाटतो.
मला गोष्टीतल्या पात्रांविषयी जवळीक वाटते. परवाच मी ’चौघीजणी’ झपाटल्यासारखं एका दिवसांत वाचून काढलं. तेव्हापासून सारखं वाटतं, मी कुणासारखी आहे? ज्यो, मेग, बेथ की ऍमी? हे पुस्तक वाचल्यापासून कधी नव्हे ते मला वाटतंय मला तीन सख्ख्या बहिणी हव्या होत्या. अगदी खरंच! दुसरं म्हणजे मला माझ्या दोन वेण्यांबद्दल जवळीक वाटते. एक कारण म्हणजे त्या कायम माझ्याजवळ असतात आणि दुसरं म्हणजे माझ्या बर्‍याच गोष्टीतल्या मैत्रिणी वेण्या घालतात. उदा. ज्यो, तोत्तोचान, हायडी. मला माझ्या या छोट्याशा विश्वाबद्दल खूप जवळीक वाटते, आत्मीयता वाटते. माझं कुटूंब, मित्र-मैत्रिणी, पुस्तके, शाळा, रिक्षाकाका अगदी माझं दप्तर, पांघरूण आणि माझं लाडकं ’पुणे’ सुद्धा! मला माझ्या घराबद्दल खूप जवळीक वाटते. आमचं घर कसंही असलं तरी! पुस्तकेतर इतकी पसरलेली असतात की नवी माणसे हबकूनच जातात! पण काही असलं तरी ते माझं घर आहे आणि त्याबद्दल मला खूप जिव्हाळा वाटतो.
ह्या आहेत माझ्या आवडी पण नावडींचं काय? थांबा त्याही सांगते--
मला कशाचा राग येतो? खूप गोष्टींचा. मुख्य म्हणजे पुस्तकाच्या दुकानातील दुकानदारांचा. जेव्हा आम्ही जातो तेव्हाच का पाथफाईंडर बंद करून माणसे निघालेली असतात! कायम आम्ही जातो तेंव्हा ’उज्वल ग्रंथ भांडार’ वर बंद दार व ’बुधवार बंद’ पाटी असते. छे ! असल्या गोष्टींचा मला भलताच राग येतो! मला खूप राग येतो जेव्हा मला कोणी म्हणते की मला पुस्तके वाचायला आवडत नाहीत किंवा म्हणते मला ’हॅरी पॉटर’ मुळीच आवडत नाही. तेव्हा मला त्या व्यक्तीला सोडून जावं वाटतं पण शिष्टाचारांमुळे तसं करता येत नाही! त्यावरून आठवलं! या असल्या शिष्टाचारांचाही मला खूप राग येतो. आपण कसे वागावे हे सांगणारे हे कोण तिर्‍हाईत? छे! मला नाही आवडत. कोणी जर म्हणाले की तुमच्या वर्गाला / तुम्हांला ’मॅनर्स’ नाहीत तरीही मला त्यांचा राग येतो. कोणी ( विशेषत: आमच्या सोसायटीतील इंग्रजी माध्यमातील मुली) म्हणाल्या की मला मराठी मुळीच आवडत नाही. श, ज्ञ, स्त्र, त्र इ. अक्षरे माझ्या डोक्यात जातात. आता मराठीचा काय उपयोग आहे? असे म्हंटले की मला त्यांचा राग येतो. अशा वेळी मी मुद्दाम मराठीत बोलते व तेव्हाचे त्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून मला खुनशी आनंद होतो! मला अजून एका गोष्टीचा राग येतो, तो म्हणजे एकटेपणा! मला कायम कुणाबरोबरतरी राहायला आवडतं. एकटेपणाला काहींचा नाईलाज असतो, त्यांच्या दृष्टीने मी चुकत असले तरी मला राग येतो हे खरे! कुणीतरी एकटे राहिले की मला लगेच त्याच्याशी जाऊन बोलावे वाटते. शाळेत कायम मैत्रिणींबरोबर राहावे वाटते. कधी कधी मन ताळ्यावर आणायला हा एकटेपणा उपयोगी पडतो तरी पण!
थोडक्यात ( थोडक्यात काय चांगल्याच सविस्तर!) काय? अशी आहे मी व माझ्या आवडी-नावडी! :)

--मुक्ता

( चाचणी परीक्षेत लिहिलेला निबंध )


*******

Monday, February 7, 2011

पक्ष्यांची गोष्ट

सकाळी मी शाळेत जातो ना? तेंव्हा माझ्या डब्यात कावळे, चिमणी, पोपट जावून बसतात. शाळेत मी डबा उघडला ना, की पटापट बाहेर येतात. माझ्या तोंडात जातात. तिथे एक मंत्र म्हणतात आणि माझ्या पोटात जातात. माझ्या पोटात काव काव, चिऊ चिऊ, मिठू मिठू ओरडायला लागतात. मी ऍ ओ ऍ ओरडलो की ते उडत उड्त बाहेर येतात. ड्ब्यात जावून बसतात.
मला खाऊ आणून देतात. भाजलेला ब्रेड, कधी कधी ना, साबुदाण्याची उसळ आणून देतात.कधी कधी ना, तीन लाडू आणून देतात. ताई आल्या तर ताईंना वाटेल लाडूचेच जेवण! कधी कधी अख्खा पेरू आणून देतात मी पेरूचा छोटा तुकडा खातो, तो माझ्या तोंडामधे गमतीजमती करीत राहतो. हो गमतीजमती करीत राहतो, हो गमतीजमती करीत राहतो.
माझ्या डब्यातली भाजी-पोळी कावळे, चिमण्या, पोपट खाऊन टाकतात.
मला खंजिरी वाजायच्या आधीच झोप येते. येता येता मी झोपतो. घरी येऊन मी झोपतो.

--सुहृद

Thursday, January 27, 2011

काळा पोपट

एक हिरवा पोपट होता. त्याने आपला रंग काळा करून घेतला पण चोच मात्र लालच ठेवली. हा काळा पोपट सारखा आमच्या गच्चीत यायचा.
एकदा तो ’टक टक’ करून दारातून आला. आम्ही त्याला कॉफी पाजली. नंतर पर्स गळ्यात अडकवून तो दारातून पायर्‍या उतरून गेला.
जाताना सोबत सुहृदला आणि शेळीला, दोघांना घरी घेऊन गेला. आणि त्याच्या पर्समधे काय होतं? ते हिवाळ्याचे दिवस होते तरी त्याच्या पर्समधे होते आंबे.
घरी गेल्यावर त्याने आंब्याचा रस केला. सुहृदला आणि शेळीला खाऊ घातला.


--- सुहृद

Sunday, January 23, 2011

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
फुलं घेऊन, पानं घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
वाघाचे बछडे घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
सिंहाचे छावे घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
फुलपाखरांच्या अळ्या घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
पक्षांचे, माकडांचे
घर म्हणजे जॅकरांडा
जॅकरांडा जॅकरांडा
इकडे तिकडे वाटभर
जॅकरांडा जॅकरांडा

---- सुहृद

Friday, January 14, 2011

चंद्र गोष्ट

एक होता मुलगा. तो बाबांना म्हणाला,” मला चंद्र द्या ना.” त्याच्या बाबांनी लांबलचक शिडी आणली आणि डोंगराला लावली. ती चंद्रापर्यन्त गेली. बाबा शिडीवर चढ्त चढत वर गेले. खालती कुणाचा आवाज आहे ते पाहिलं. त्यांचा मुलगा म्हणत होता, ” अरे, आकाशात खेळायला गेले बाबा.” बाबा चंद्राजवळ पोचले. चंद्र तर भलामोठ्ठा होता. बाबांना आणता येईना. मग चंद्र छोटा छोटा होत गेला. छोटा झाल्यावर बाबा चंद्र घेऊन खाली आले. मुलाला चंद्र दिला. चंद्र छोटा छोटा व्हायला लागला. पटकन मुलाच्या पोटातच गेला. मुलगा ऍ ओ ऍ ओरडायला लागला. मग चंद्राची कोर पोटातून बाहेर आली. आकाशात गेली. आकाशात गेल्यावर मोठी मोठी मोठी मोठी व्हायला लागली. मग तो भलामोठ्ठा नेहमीचा चंद्र झाला.

-----सुहृद