Monday, January 4, 2010

आजार

तशी माझी तब्येत अगदी तंदुरुस्त आहे. माझ्यामते माझे पेशीसैन्य रोगांशी लढण्यास सक्षम आहे. त्यांच्याबद्‍दल विचार केला की माझ्यासमोर लाल-पांढरे विचित्र लोक, हिरव्या विचित्र शत्रूशी सामना करत आहेत असे दृश्य उभे राहतो. अशा या लाल-पांढर्‍या विचित्र सैनिकमित्रांसाठी मी दररोज सर्व अन्नघटक घेण्याचा प्रयत्‍न करते.
माझ्याजवळ आजार सहसा फिरकत नाहीत. ज्याची साथ आली आहे व तो मला झालाय असा एकच रोग आहे, "कांजिण्या". कधी हिवाळ्यात सर्दी, खोकला येऊन अधूनमधून हजेरी लावतात. उन्हाळ्यात कधी ताप येऊन पलंगावरुन उठू देत नाही पण याचे वार्षिक प्रमाण कमीच. एकदा हिवाळ्यात आईस्क्रीम खाऊनही खोकला मला शिवला नाही हे पाहून आईने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. (अर्थात बोटांना लागलेले आईस्क्रीम चोखण्यासाठी नव्हे.)
गेल्या दोन-तीन वर्षात विचार करता यावा असा आजारच झालेला नाहीये मला. पण १ली-२री मध्ये असताना मला धम्माल यायची. माझ्यामते आजार ही पुन्हा लहान होण्याची संधी आहे. सगळे आपल्याजवळ येऊन बसतात. बाबाने तर हज्जारदा हॅरी पॉटरच्या १ल्या भागाच्या मराठी अनुवादाला बेक्कार म्हंटले असूनही तेच पुस्तक पुन्हा वाचून दाखवायला तयार!. आजारी पडली असं आईने सांगितलं की तिथे आज्या-मावश्यांची बॅग भरायला सुरुवात. एक दिवस आजी येऊन धडकते मग चिवडा काय, लाडू काय नुसती धम्माल!
तेव्हा मी पहिलीत होते. मी फ्रॉक घालून आईजवळ गेले. तिने चेन लावायला हात पुढे केला तर तिला हाताला काहीतरी लागले. तो होता एक फोड!
त्यादिवशी आईने तू शाळेत जाऊ नकोस असे सांगितले तेव्हापासून मी बाबाच्या फोनची वाट पाहत होते. कारण एकदा खूप पाऊस होता म्हणून आईने मला शाळेत पाठवायला बंदी केली होती तेव्हा बाबाने फोन करून सांगितले होते की शाळेत पाठव, फार पाऊस नाही. पण अपेक्षेप्रमाणे बाबाचा फोन आला नाही. आई एका दुष्ट राक्षसासारखी माझ्या शिक्षणाच्या मध्ये येतीय असा विचार माझ्या मनात आला. पण आई बाहेर जाऊन माझ्यासाठी पुस्तके घेऊन आली तेव्हा माझा राग पळून गेला. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर कळाले की मला कांजिण्या झाल्या आहेत. तेव्हा मला बिचारीला ’कांजिण्या’ असे म्हणताही येत नव्हते. मी त्याला ’कानिण्या’ म्हणायचे.
आजारपण एकदाचे गेले. पण दुसरीच भीती छळू लागली. ते म्हणजे माझी जवळजवळ महिन्याभराची रजा आणि तेव्हा दिलेले गृहपाठ ! मला एका पुस्तकांच्या ढिगार्‍यात मी अभ्यास करत असल्याची स्वप्ने पडू लागली. मी अभ्यासापासून दूर पळण्याच्या नादात झोपेत आईला लाथा मारायचे. आणि मी स्वप्नात लाथा मारल्या की सर्व पुस्तके माझ्या अंगावर पडायची आणि मी भोकाड पसरायचे. या प्रकाराला आई जाम वैतागली होती. पण शाळेत गेल्यावर सर्वांनी सांगितले की खूप मुले रजा असल्याने गृहपाठच दिला नव्हता.
मला एक भलामोठ्ठा दगड डोक्यावरुन उतरल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी फारशी कधी आजारी पडले नसल्याने तो दगड अजून पुन्हा चढलेला नाही. पण त्याचा मेल्याचा काही नेम नाही.

2 comments:

  1. वा! मस्तच!
    वाक्प्रचारांसुध्दा छान वापर केला आहेस.
    ‘आई एका दुष्ट राक्षसासारखी माझ्या शिक्षणाच्या मध्ये येतीय’, हे वाक्य वाचून तर मला इतके हसू आले.
    मी देखील लहानपणी फ़ारशी आजारी पडत नसे. कधीमधी पडलेच आजारी की मला खूप गंमत वाटायची, सगळेजण आपल्याच भोवती, विचारपूस करायला, हवं-नको ते पाहायला! पण मला अशावेळी शाळा बुडलेली आवडायची बरं का :)

    - आशा मावशी

    ReplyDelete