Wednesday, January 3, 2018

अभंग

इंद्रायणी तिरी असे देहू गाव l सुख शोभा थोर मन घेई धाव l
अशा देहूगावी असे एक संत l नसे व्यवहारी नसे भाग्यवंत l
धर्मसत्ता खोटी खोटे चार वर्ण l मानव समान जशी वृक्षपर्ण l
ऐसे सांगे जना रचूनि अभंग l भक्त तुकाराम देव पांडुरंग l
क्षोभ वाढतसे धर्मांधाचे ठायी l जन जसे येती तुकोबाचे पायी l
सर्वाचेच मूळ अशी तीच गाथा l बुडवावी आता होई उंच माथा l
निषेधाचा पडे सत्वर आघात l एकेक अभंग जातसे पाण्यात l
संतोषून जाती विध्वंसक घरा l तुकोबाच्या नुरे चित्तास त्या थारा l
धरणे धरिले विठ्ठलाचे दारी l निश्चक्र उपास हताशच सारी l
जलसमाधीस दिन झाले तेरा l दुष्टचक्रची हे संपेना तो फेरा l
परी चमत्कार ईश्वरी घडिला l एकेक अभंग जनांना स्मरिला l
जरी पानावरी नुरतसे शाई l मनी कोरले जे असे जात नाही l
तुकयाची वाणी बोलितसे कोणी l जरी मूळ गाथा गिळे इंद्रायणी l
जीवनाचे सार तारे लोकगंगा l ज्ञानी झाले जन देवा पांडुरंगा!
ऐसे वदला तो संत तुकाराम l ने रे प्रभू आता तुझे निजधाम l
सदेह करितो वैकुंठ गमन l संपे कार्य माझे थकले अन तन l
ऐसी थोर वाणी ऐसी ती करणी l ऐसा पांडुरंग रखुमाई राणी l
अकल्पित घडे इंद्रायणी काठी l गंगेहून ठरे लोकगंगा मोठी l
तुकोबाचा धडा आज आठवावा l अर्थ त्या वाणीचा मनी साठवावा l
द्यावा माणसाने माणसाला मान l व्हावे एक सर्व थोर नि लहान l
एकमेकांच्या त्या हाती हात द्यावे l माणसांचे नातेच ’अभंग’ व्हावे l

Sunday, May 7, 2017


माणसाचा मेंदू आणि हृदय यांच्यामधे एक पट्टा आहे,
तिथे चेता, मज्जा, स्नायूंसोबत भावनाही राहतात म्हणे!

त्यांपैकी आनंदाचा कोपरा असतो कायम उजळलेला
तिथे असतात निखळ, खळखळते हास्यरंग आणि सकारात्मक ऊर्जा

दुःख असतं पडून, डोळे मिटून कुठेतरी...
वेड्याला वाटतं की स्वतःला मिटून घेणं हाच सगळ्यावरती उपाय आहे!
पण मन गुंततं ते त्याच्यापाशीच आणि मोकळं होतं ते ही त्याच्यापाशीच...

खोलवर आत दडून बसलेली असते अव्यक्त, अस्पष्ट भिती
अज्ञाताच्या भयाने अज्ञातावरच विश्वास ठेवणारी आणि सतत नव्याने जन्मणारी

इथे राग हा मोठा दिलदार, काही साचत गेलं की लगेच बाहेर काढणारा
कधी उघड, धगधगता तर कधी छुपा, डूख धरून बसणारा

तशा अगदी गुण्यागोविंदाने राहतात या भावना,
पण कधी कधी मात्र काय होतं,
भितीला दाबून राग प्रकटतो, दुःख दाबून आनंद हसतो,
आनंदी व्हायचं सोडून मन भयकंपित होतं
आणि रागवून मोकळं होता येईल अशी गोष्ट दुःख कुरवाळत बसतं!

असं भावनांचं व्यक्त होणंच चुकलं की उरतं ते फक्त शून्य.

मग ना आनंद निर्मळ उरतो, ना दुःख खरच खुपतं,
उरते ती निराधार भावनांची, निर्विकार धडपड...

Friday, February 24, 2017

अक्षरनंदन...



पुलंनी म्हंटलंय की ’अस्सल पुणेकर व्हायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा जाज्वल्यं अभिमान असला पाहिजे!" (यातला गंमतीचा भाग सोडला तर) असा विचार करता माझ्यापुरतं तरी मी असं म्हणेन की " मला, मी या शाळेची अक्षरनंदनची विद्यार्थिनी असल्याचा जाज्वल्य अभिमान आहे."
       अक्षरनंदनमधला काळ सुंदर होताच पण त्या संचितासह बाहेर पडल्यावरही अनेक सुखद आठवणी जमा होत गेल्या हे विशेष. एकदा आम्ही कर्नाटकातील ’कूर्ग’ या ठिकाणी गेलो होतो. तिथे आम्ही ज्यांच्याकडे राहिलो त्या काका-काकूंशी आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. बोलण्याच्या ओघात विषय ’कन्नड’ भाषेकडे वळला. अचानक मला शाळेत शिकलेलं ’इदेशनन्नदू’ गाणं आठवलं आणि मी ( शक्य तितक्या सुरेल आवाजात ) ते म्हणूनही दाखवलं. मी एका संपूर्णपणे वेगळ्या भाषेतलं गाणं, योग्य शब्दोच्चारांसह कसं काय म्हंटलं याचंच त्यांना अप्रूप वाटत राहिलं. त्या एका गाण्यामुळे आमच्यात वेगळेच बंध तयार झाले. तेव्हा इतकं सुंदर वाटलं मला...काहीसं भरुनही आलं, शाळेच्या आठवणींनी. सुरुवातीला ( कधीकधी शेवटपर्यंत ) अगम्य वाटणारे शब्द कधी ताल/लयीच्या ओढीने, क्वचित कधी धाकानेही पाठ करून म्हणणारा वर्ग आठवला. सहज म्हणून शिकलेली ही वेगवेगळ्या भाषांतली गाणी प्रत्येक मुलाला परक्यांशी जोडणारी पुंजी आहेत हा विचारच किती गोड आहे!
   शाळेने वेळोवेळी आमच्याही नकळत कितीतरी गोष्टी, विचार, मूल्यं आमच्यात रुजवली आहेत. सहजपणे आम्हाला भवतालाशी, निसर्गाशी जोडलं आहे. पराकोटीची समानता असावी याबद्द्दल आग्रह धरणं शिकवलं आहे. आपण कोणी वेगळे नाही, आपली नाळ या समाजाशी, भाषेशी, संस्कृतीशी जोडलेली आहे हे भान दिलं आहे. मस्त अनवाणी फिरणं, फारसा विचार न करता पटकन मांडी घालून खाली बसणं हा मोकळेपणाही मला शाळेनीच दिला आहे. पाणी/कागद जपून वापरणं, टाकाऊतून टिकाऊ असं काही तयार करणं, गोष्ट सर्वांगाने समजून घेणं, राजकीय दबाव/ धर्मांधतेच्या लाटा येत असताना ठामपणे आपल्या जागी उभं राहून प्रत्येक घटनेला शास्त्रकाट्याची कसोटी लावणं हे सगळं मी शाळेतच शिकत गेले.
    शाळेतून बाहेर पडल्यापासून सतत लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे काहीही समोर आलं तरी मन बंद होत नाही. अगदी प्रतिक्षिप्त क्रिया असावी इतक्या लगेच मनात त्याचा सूर्य तयार होतो. मग हे करून पाहू, ह्या पर्यायावर विचार करू, ही शक्यता पडताळून पाहू असं सुरु होतं. एक ठराविक मार्ग बंद झाला तरी खटपट करणं, गर्भगळीत न होता विचार करत रहाणं हे सहज जमतं. यात खटपट करत रहाण्याची मानसिकता दिल्याबद्दल शाळेचं कौतुक आहेच, पण बंद झालेला मार्ग आमच्यासाठी कधीच ’ठराविक’ नव्हता याचंही श्रेय शाळेलाच आहे. म्हणूनच कॉलेजमधे शिक्षक ’गाईड वापरू नका’ म्हणाले की ’यात सांगायचंय काय?!’ असं वाटून जातं आणि ’मनाने विचार करून उत्तर द्या’ असं म्हटलं की वैताग येण्यापेक्षा ’तेच बरं’ असा विचार डोक्यात येतो. शाळा किती भारी आहे हे अशावेळी नव्याने उलगडत जाते.
      मला कायम असं वाटतं की आम्ही सगळे उत्तम शिक्षक होऊ शकतो, कारण ज्ञानसंरचनावादी, अनुभवाधारित, विद्यार्थीकेंद्रित सकस शिक्षण कसं असतं हे आम्ही बारा वर्ष पाहिलं आहे. आपलं वय, पत, परिस्थिती काहीही असो, आपलं म्हणणं मांडण्याचा आपल्याला अधिकार असतो, आपलं मत हे ऐकलं गेलंच पाहिजे ह्याचा आग्रह धरायला शाळेने शिकवलं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आमचं म्हणणं प्रत्येकवेळी अत्यंत आदराने ऐकून घेतलं.
      ना.शा.संगती सारखा एक वेगळा तास, पाठ्यपुस्तकाखेरीज प्रचंड अवांतर अभ्यासक्रम ( फक्त आणि संपूर्ण पाठ्यपुस्तक मी बहुतेक थेट १०वीत शिकले), पूरक पुस्तिकांमधून शिकलेला इतिहास, "’आप’नी दिल्लीत बहुमत मिळवण्यासाठी कॉंग्रेसकडे जावं की पुन्हा मतदान व्हावं?" अशा राजकारणावरच्या खडाजंगी चर्चा, ’मुलग्यांनी [’मुलगे’ हे अनेकवचनही अक्षरनंदनची खासियत ;) ] केस वाढवले तर त्यांनीही हेअरबॅंड लावयचा का?’ सारख्या लहान मोठ्या नियमांच्या निर्मितीतला सक्रिय सहभाग, भातशेती, खरी कमाई, वर्षोत्सव, अत्यंत सूत्रबद्ध आणि सकस संमेलने, दुकानजत्रा, कार्यशाळा, गौरीताईंचा तास, नाट्यवाचन, अभ्यास शिबिरे, त्रिपुरी पौर्णिमा हे सगळंच अविस्मरणीय आहे. शाळेने खरंच आमचे खूप लाड केले हे आत्ता लक्षात येतंय.
     आम्ही ४थी/५वीत असताना एकदा शा.शि. चा तास सुरु असतानाच अचानक पाऊस पडायला लागला. आत जाण्याऐवजी आम्ही बाहेरच पावसात भिजू लागलो. त्यानंतरच्या वाचनालयाच्या तासालाही कोणी गेलं नाही....अख्खा वर्ग बाहेर- पावसात! थोड्यावेळाने ताई आम्हाला शोधत आल्या, एकूण रागरंग पहाता त्यांनी अजून २/३ तायांना टॉवेल घेऊन बोलावलं. तायांनी आमचं डोकं वगैरे पुसून आम्हाला चौकात बसवलं आणि कसलीशी गोष्टही वाचून दाखवली. ’पुन्हा असं तास बुडवून भिजत बसायचं नाही’ हे सांगितलंच पण त्यापलिकडे जाऊन आम्हा छोट्या मुलांचा पावसात भिजण्यातला आनंद त्यांनी खूप सुंदरपणे समजून घेतला. प्रत्येक टप्प्यावर आपलेपणाने समजून घेणारी शाळा मिळण्याइतकं छान दुसरं काय असेल?
    १०वी आणि त्याचबरोबर शाळाही संपत आली तेव्हा मी सैरभैर झाले होते. ’काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं’ ह्या वाक्यातला फोलपणा पहिल्यांदाच धडधडीतपणे जाणवू लागला होता. मी जे सोडणार होते त्याहून वरचढ काही असणं शक्य तरी होतं का? त्या सगळ्या मानसिक अवस्थेतच शाळा संपली. कॉलेज सुरु झालं आणि माझ्या लक्षात आलं की खरं तर मी अक्षरनंदन सोडलीच नाहिये. माझ्या वागण्यात, बोलण्यात, प्रतिक्रियांत, विचारात अक्षरनंदन आहेच. बाहेर इतर मोठ-मोठ्या शाळांमधल्या मुलांसारखी सपोर्ट सिस्टिम आपल्या शाळेतल्या मुलांना मिळत नाही. कॉलेजमधे पुढच्या वर्गात, मागच्या वर्गात आपण ओळखतो अशी, शाळेतली २०-२५ मुलं आहेत हे माझ्याबाबतीत शक्यच नव्हतं. तरीही ’अक्षरनंदनची विद्यार्थिनी’ हीच ओळख मला खूप मदत करून गेली. "तू कोणत्या शाळेत होतीस?" हा मला विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. याचं उत्तर देणं मला सगळ्यात जास्त आवडतं, ती ओळख अभिमानास्पद वाटते, ते जणू एक qualification आहे असं वाटतं. :)

    शाळेबद्दल लिहीताना, बोलताना ’चिमुकल्या पंखांना बळ दिलं’ इ. वाक्यं खूपदा वापरली जातात. मात्र अक्षरनंदनच्या बाबतीत त्या रूपकाची थोडीशी पुनर्मांडणी करण्याची गरज वाटते मला. मला उडण्याचं बळ शाळेने दिलं असं मी नाही म्हणणार. सुशिक्षित पालक, पुण्यासारख्या शहरातल्या वास्तव्यामुळे आणि निसर्गतः ते बळ मला मिळालं असतंच. ’अक्षरनंदन’ने त्याहून महत्त्वाचं असं काहीतरी केलं. ’अक्षरनंदन’ने माझ्यापुढील आकाशाच्या कक्षा रूंदावल्या. ’अक्षरनंदन’ने माझं आभाळ मोठं केलं.....  

Sunday, June 12, 2016

मलाव्य


मलाव्य म्हणजे "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व". एक अशी व्यक्ती जिने जनमानसाला अक्षरशः वेड लावले. प्रचंड लोकसमुदायाला कधी खळखळून हसवले, कधी कोपरखळ्या मारल्या, क्वचित कधी रडवले आणि अखंडपणे रिझवले. त्या व्यक्तीने अव्घ्या महाराष्ट्राच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले, तिच्या शब्दांची मोहिनी आजही आबालवृद्धांना भुरळ घालते व ते भारावलेपण आज झिरपत झिरपत आमच्या पिढीपर्यंत येऊन पोचलेलं आहे. ती व्यक्ती म्हणजे अर्थातच - पु.ल.देशपांडे.
  १२ जून २००० ला पुलं गेले तेव्हा मी बरोबर एका वर्षाची होते. ती हळहळ, कातरता, आक्रंदन, मळभ, एकटेपण-पोकळी आणि वातावरणात भरून आलेलं आषाढघनासारखं पुलंप्रेम हे समजण्याची, त्यात सामील होण्याची माझी क्षमताच नव्हती. पुढे मी पुलंचं साहित्य वाचू लागल्यावर एखाद्या भक्ताप्रमाणे त्यांच्या एका दर्शनासाठी गर्दीत घुसायला, त्यांची शक्य ती - शक्य तिथे जाऊन भाषणं ऐकायला, त्यांना पत्र पाठवून त्यांच्या पत्रोत्तराची चातकासारखी वाट पहायला, सध्याच्या घटनांवर त्यांची खुमासदार प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आवडलं असतं, पण त्यासाठी पुलं इथे नव्हतेच. मग एक चाहती म्हणून माझा संवाद एकतर्फीच राहिला का? खरं तर नाही. त्यांची पुस्तकं, लेख, भाषणं, कथाकथनं या सर्वांतून तेच तर बोलत होते!
  मला वाटतं मी सर्वप्रथम पाहिलं ते ’चंद्रकांत काळेंनी’ केलेलं पुलंचं "वार्‍यावरची वरात". त्यातला माहौल, प्रासंगिक चटकदार विनोद, एकाहून एक नग अशी पात्रं आणि सतत खणखणणारा टेलिफोन हे सगळंच भुरळ पाडण्याजोगं होतं. " हा आत येण्याचा दरवाजा, म्हणजे आतुनही बाहेर जाता येतं!" हा म्हटलं तर साधाच संवाद पण कितीही वेळा ऐकला तरी खुदकन हसू येतं. पुढे प्रत्यक्ष पुलंचं "वार्‍यावरची वरात" पाहिलं आणि हसून हसून पुरेवाट झालीच पण अगदी ’भरून पावलो’ असं समाधान मिळालं ते त्यांना टीव्हीवर का होईना, पहायची संधी मिळाली म्हणून. मला तेव्हा काही वाचता येत नव्हतं, कदाचित त्यामुळेच मी आधी पाहिली ती पुलंची नाटकंच. "वार्‍यावरची वरात" नंतर लगेचच पाहिलेलं नाटक म्हणजे "ती फुलराणी" तेही नवीन नटसंचातीलच. ते मी पाहिलं तेव्हा काही कळायचं वयच नव्हतं पण कसल्यातरी जादूने ती सीडी पुन्हा पुन्हा पहावीशी वाटे. तेव्हा नकळत अनेक संवाद तोंडात बसले होते. एकदा ’अशोक जहागिरदार’चं पाहून पाहून मीपण कधीतरी "साला!" असं म्हणून आईकडून दटावूनही घेतलं होतं! ’तुला शिकवीन चांगलाच धडा!’, ’एक होता राजा’, ’मला फ्लोरिष्टाच्या शापामधल्या..’ इ. रचना आणि संवाद जवळपास पाठ झाले होते. ते सगळं किती आशयपूर्ण आहे हे आता पुन्हा त्या म्हणून पाहिल्या की जाणवतं.’बर्नार्ड शॉ’च्या "माय फेअर लेडी" ला अगदी मराठीतच उमलल्यासारखी वाटणारी अस्सल फुलराणी म्हणून रेखाटणार्‍या पुलंचा आदरही वाटतो.
    त्यानंतर गूळपीठ जमलं ते चितळे मास्तर, म्हैस, सखाराम गटणे, अंतू बर्वा, हरीतात्या, असा मी असा मी, पाळीव प्राणी, मी आणि माझा शत्रूपक्ष, माझे पौष्टिक जीवन, अपूर्वाई या सगळ्यांशी. ह्यातली विनोदनिर्मिती उच्च दर्जाची आहेच पण आमच्या पिढीने कधीच न अनुभवलेले तत्कालिन सामाजिक संदर्भही त्यातून उलगडत जातात. आम्ही मुळात पोस्टातच जात नाही; गेलोच तरी तेव्हा ’चि. बाळकुशास आशीर्वाद’ छाप मजकूर सांगणारे व लिहून घेणारे दिसत नाहीत. ’ बाबूज गॅरेज मिक्स्ड विथ लेमन वॉटर’ ही तारांची गंमत संपलीच. "भरताने चौदा वर्षं सांभाळल्या..." म्हणणारे, घोकंपट्टी करून घेणारे शिक्षक आम्ही कधी पाहिले नाहीत. आजही म्हैस वगैरे बसला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, बसमधे सुबक ठेंगणीही असेल पण या धकाधकीत " चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना sss" ह्या वाक्याला मात्र वाली नसेल. शत्रूपक्षाशी मुकाबला बिकट होण्याची शक्यता अधिक कारण "ह्यांचा पोहतानाचा फोटो" लगेच डिजीटल अल्बममधे सापडेल आणि त्यासरशी चटकन सापडणारे अजून " चोरट्या अफूची आयात करणारी टोळी" म्हणून खपू शकतील असे ५० फोटोही पहावे लागतील! आजकाल किमान शुद्ध मराठी बोलणारेच विरळा त्यात प्राज्ञ मराठी बोलणारा गटणे सापडणं अशक्यच! हे असे स्थलकालाचे संदर्भ बदलले आहेत तरी आनंदाने, कदाचित जास्तच आनंदाने या सर्व लेखांचा व्यक्तीचित्रणांचा आस्वाद घेतला गेला. मॉंजिनीज मधे शिरतानाची धडधड नाही स्वतःशी जोडून घेता आली पण आजही आपल्या पाळीव प्राण्यांच्या ’अगदी परवाच्या’ गोष्टी ऐकवणारे, संत प्रवृत्तीने गिर्‍हाईकाला न कंटाळता शंभर साड्या दाखवणारे विक्रेते, लग्नातले नारायण, ’आतलं घड्याळ’ सांभाळत नव्या-जुन्यात अडकलेले धोंडोपंत आणि शुद्ध-अशुद्धतेच्या निष्कारण जाळ्यात फसलेल्या फुलराण्याही...हे सगळे भेटतातच! असे आजही दिसणारे असोत वा कालबाह्य झालेले असोत, पुलंच्या लिखाणातले संदर्भ त्यांच्या मिष्किल शैलीने जिवंत होऊन जातात.
  पुलंची शैली कोणालाही आवडावी अशीच मस्त गळ्यात हात टाकून गुदगुल्या करणारी आहे. त्यात बोचरेपणा नाही. पुलंच्या बर्‍याच (सर्वच नाही) लिखाणांत सुरुवात-मध्य हलकाफुलका-विनोदी असतो पण शेवट मात्र जाणूनबुजून थोडासा खाली येणारा/ अंतर्मुख करणारा असतो...मला अशा बांधणीचे लेख खूप आवडतात, ती आवड पुलंमुळेच लागली असावी. कितीतरीवेळ पोट धरून हसवणारी ’बटाट्याची चाळ’ जेव्हा ’माझ्या पोटात अजून खूप खूप माया होती..’ म्हणते तेव्हा गदगदूनच येतं... ’(चितळेमास्तरांखेरीज) कुठल्याच चपलांच्या टाचा एवढ्या झिजलेल्या नव्हत्या..’ हे वाक्यही असंच. पुलंच्या लिखाणांचे हे शेवट लक्षवेधी वाटतात. पुलं,सुनीताबाई यांनी ’कुठे थांबावं’ याचा विवेक कायम पाळला. पुलंचे लेख हे त्याचं एक उदाहरण म्हणता येईल. लेख एखादा प्रसंग रंगतोय म्हणून उगाच लांबवलेले, विनोदनिर्मितीच्या नादात भरकटलेले नसतात, ते अगदी योग्य वेळी शेवटाकडे येतात आणि त्यांचा शेवट बरोबर तेव्हा होतो जेव्हा वाचक रसानुभूतीच्या उच्चतम पातळीवर असतो. हे ही त्यांचं लिखाण इतकं भावण्याचं एक कारण असावं असं मला वाटतं.
  अशाप्रकारे ’पायाभूत’ म्हणता येईल एवढं वाचन झाल्यावर पुलंचे काही गंभीर लेख, ज्यांचं कधीच पुलंनी प्रकटवाचन केलं नाही असे काही पुस्तकांतील लेख हेही थोडं थोडं वाचलं. त्याच काळात समांतरपणे सुनीताबाईंची कवितांजली, चित्रमय स्वगत ह्यांची पारायणं झाली. मंगला गोडबोलेंचं ’सुनीताबाई’ वाचलं; ते खूप आवडलं, मग ’आहे मनोहर तरी..’ वाचलं आणि ते अगदीच जवळचं पुस्तक होऊन गेलं. या सर्वांतून पुलंची वैयक्तिक माहिती कळू लागली आणि ते व सुनीताबाई कधी न भेटता, कधी प्रत्यक्ष न बघताही माझी खूप आवडीची माणसं होऊन गेली. खरं तर मी घरातल्या कोणाला समोर बसवून सगळे प्रश्न एकदमच का विचारून टाकले नाहीत, माहित नाही....कधी करावंसं वाटलंच नाही. ते माझ्यापरीने हळू हळू शोधत जाणच मला आवडणार होतं, कारण माझा पुलंप्रति प्रवास काहीसा तसाच तर होता!
  पुलंनी लिहिलं आहे की ’ लेखक एकदा परिक्षेला लागला की संपला!’! गंमत म्हणजे पुलंचं कसलंही लिखाण आम्हाला कधीच पाठ्यपुस्तकात नव्हतं. याचा जसा खेद आहे तसाच "पंतांना कुशाभाऊंनंतर कोण भेटायला आले?", " वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जातो - संदर्भासहित स्पष्टीकरण करा" असे प्रश्न सोडवावे लागले नाहित याचा आनंदही आहे.
  पुलंनी निखळपणे हसण्याचा आनंद दिला, क्रिकेट म्हटल्यावर जसा गट एक होऊन जातो तसाच पुलंचा विषय निघताच एक होण्यातला मस्त अनुभव दिला, मराठीतले म्हणी-वाक्‍प्रचार, विरामचिन्हे वापरत केवढी धमाल करता येते हे दाखवलं आणि या भाषेची कायमची गोडी लावली, शाळेतून घरी येताना "कोण’सखाराम गटणे’ तोंडपाठ म्हणून दाखवतो" सारख्या स्पर्धांची मजा घेण्याची संधी दिली, सुनीताबाईंसोबत कित्येक कवींशी पहिली ओळखही करून दिली...

   प्रत्येक लेखक त्याच्या वाचकासाठी वेगळा असला पाहिजे...खरं तर मी त्यांना पुलं आजोबा म्हटलं पाहिजे पण त्यांच्या लेखनातून जे पुलं भेटले ते काळाची कसलीही खूण न उमटलेले, चिरतरूण असे! आमच्या मागच्या, त्यामागच्या पिढीने पुलंचा सगळा प्रवास पाहिला, त्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचे, दर्शनाचे अमृतकण त्यांनी अनुभवले...त्याला मुकल्याबद्दल मी स्वतःला दोष देण्याखेरीज काहीच करू शकत नाही. मात्र त्या सर्व प्रवासातल्या शेवटच्या एका छोट्या तुकड्यात कुठेतरी अजाणतेपणी माझं अस्तित्व होतं याचं मला मुग्ध समाधान आहे...

Thursday, April 17, 2014

पृथ्वीची गोष्ट!

पृथ्वी जर सुट्टीवर गेली!
तर पृथ्वी फिरायची थांबेल. जिथे दिवस तिथे दिवसच! जिथे रात्र तिथे रात्रच!
दिवस असेल तिथली लोकं म्हणतील, "आमच्या इथे रात्र करा. आम्हांला झॊपायचंय "
रात्र असेल तिथली लोकं म्हणतील," दिवस करा ना हो. आम्हांला शाळेत जायचंय. मोठ्या माणसांना ऑफीसमधे जायचंय. पेपर वाचायचाय. खेळायचंय."
पोलीस म्हणतील पृथ्वीला शिक्षा करू. पण पोलीस तर पृथ्वीला शिक्षा करूच शकणार नाहीत! ते पृथ्वीवरच राहतात ना!
मग ते काय म्हणतील, "पृथ्वी पृथ्वी फिर ना."
मग पृथ्वी फिरायला लागेल. भराभर फिरायला लागेल.
पटापट दिवस की रात्र! पुन्हा लगेच दिवस की पुन्हा लगेच रात्र!
मुलं म्हणतील, "आम्ही पटापट मोठे होतोय. पटापट पुढच्या वर्गात जातोय."
मोठी माणसं म्हणतील, " आम्ही पटापट म्हातारे होतोय. आमचे केस पटापट पांढरे होताहेत. आमची ताकद कमी होतीये.  आम्हांला काठी घ्यावी लागतीये. आम्हांला पटापट नातू होताहेत. ते आम्हांला आजोबा म्हणताहेत. म्हणून पृथ्वी तू नेहमीसारखी फिरायला लाग."

नंतर मग पृथ्वी नेहमीसारखी फिरायला लागली.
तिला आता सुट्टी घेताच येणार नाही.

-- - सुहृद

Sunday, March 2, 2014

चूक व बरोबरचा पाढा



चूक एके चूक
चूक दुणे टी.व्ही. उघडा
चूक त्रिक वॉशिंग मशीन तोडा
चूक चोक देवाला चिडवा
चूक पंचे झाड कापा
चूक सख घाबरवा
चूक साते कोणी घाबरलं तर हसा
चूक आठे त्रास द्या
चूक नवे ढकला
चूक दाहे कोणाला त्रास झाला तर हसा

---------------------

बरोबर एके बरोबर
बरोबर दुणे मदत करा
बरोबर त्रिक गंमत करा
बरोबर चोक देवासमोर हात जोडा
बरोबर पंचे लाईट गेले तर बॅटरी लावा
बरोबर सख विचार करा
बरोबर साते हातात घड्याळ घाला
बरोबर आठे पुस्तक वाचा
बरोबर नवे आळस सोडा
बरोबर दाहे चांगलं वागा

- सुहृद

Saturday, July 27, 2013

दोन गोष्टी


स्वप्नं

पुस्तकाला पाय आले तर ते शाळेत गेलं. 
डब्यात त्याला गोष्टी दिल्या. ते दप्तराच्या बाहेर बसलं.
त्याला सगळे वाचायचे, हसायचे.
एकदा काय झालं?
कोणीच वाचलं नाही त्या पुस्तकाला!
मग काय झालं?
त्याचे हातपायच गेले.
त्याबरोबर मला जाग आली.

.......

वस्तू  आणि फळं

माणसं पुस्तकात गोष्टी लिहीतात.
माणसं पुस्तक बनवतात
आणि माणसंच वाचतात.

माणसं सीडी बनवतात.
माणसंच सीडी लावतात.
माणसंच सीडी पाहतात.

माणसंच आम्रखंड बनवतात.
माणसंच आम्रखंड खातात.

पण माणसं आंबा नाही बनवू शकत.
आंबा स्वत:च स्वत:ला बनवतो.
फक्त फळं स्वत:च स्वत:ला बनवू शकतात.

- सुह्रद

Wednesday, June 5, 2013

विषम पायांचा बेडूक

एक सात पायांचा बेडूक होता. म्हणून तो विषम पायांनी उड्या मारायचा. पण तो सात लोकांची शिकार करायचा तर एका कुत्र्याने त्याला पकडलं, खाऊन टाकलं. पण एक मांजर कुत्र्याला पकडायला आली , मांजरीने कुत्र्याला पकडलं मग बेडूक कुत्र्याच्या पोटातून बाहेर आला. मग त्याने रोज सात माणसांची शिकार केली मग कुठलाही माणूस राहिला नाही. मग कुत्रा मांजरीपेक्षा मोठा झाला मग कुत्र्याने बेडकाला खाल्लं, कुत्र्याने खाल्ल्यामुळे बेडकाचे पाय तुटले, बेडूक मरून गेला.  कुत्र्याने मांजरीला पकडलं , खाऊन टाकलं मग मांजर गेली मरून. कुत्र्याने स्वत:वर विश्वास बसवला. कुत्र्याने सगळ्या माणसांना सांगितलं, तुम्हांला त्रास देणारांना मी खाल्लंय, मग सगळी माणसं जिवंत झाली.
 मग सगळे सम पायांचे प्राणी आले.

-- सुहृद

Wednesday, January 30, 2013

मला काय करायला आवडतं? आणि काय करायला आवडत नाही?


मला मोठं व्हायला आवडत नाही. मला अभ्यास करायला आवडत नाही. मला "मिलियन डॉलर कॅट सीडी" पाहायला आवडते. मला झोपायला आवडतं. मला पाणी प्यायला आवडतं. मला द्राक्षं खायला आवडतात. मला उठायला आवडत नाही. मला संगमनेरला जायला आवडतं. पण मी जन्मलो होतो तेव्हा मला संगमनेरला जायला आवडायचं नाही. मला कर्‍हाडला जायला आवडत नाही. मला रॅपिडमधे चक्कर मारायला आवडते. मला "प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी" गाणं ऎकायला आवडतं. कालचा दिवस करता येत नाही, हे मला आवडत नाही. जादू करता येत नाही हे मला आवडत नाही. ऍक्सेस गाडीवर मागे आईला धरून बसायला मला आवडतं. मला यशचं मोठी शाळा पुस्तक आवडतं. मला चित्र पाहायला आवडतात. मला पुस्तक वाचायला आवडत नाही. मला ओठांना क्रीम लावायला आवडतं. हॉटेलमधे जायला मला आवडतं. मला आईसक्रीम खायला आवडतं.


 -- सुहृद

Sunday, June 24, 2012

सुपरकॅट आणि सुपररॅट


आपण दोघं मित्र
सुपरकॅट आणि सुपररॅट

खालून पाय
वरुन डोकं
पाण्याचं सूप
नदीत पिऊ

दहा दिवस
बुड बुड बुड
सर्दी झाली
छ्या छ्या छ्या
पाणी पाणी
थू थू थू
कानामध्ये पाणी
भरपूर
ऐकायला नाही येत
भरपूर भरपूर

जेरीशी लढाई करू
जेरीला पकडून खाऊ.
जेरी आहे भित्रा भित्रा
जेरी आहे शूर शूर

आपण करू
फेरारी की सवारी
चल मेरी गाडी उडती देख.

Saturday, June 16, 2012

मी समुद्रात बुडलो आणि बाहेर आलो.

मी झोपलो. की पलंगावर झोपलो. मी समुद्रात बुडायचो. मला शार्क मासा दिसायचा शार्क माशाने डोकं बाहेर काढलं. आणि मला समुद्रात घेतलं आणि खाऊन टाकलं. परत मी त्याच्य तोंडातून बाहेर आलो. परत मी कधीही समुद्रात गेलो नाही. मला समुद्राची भीती वाटते. -- सुहृद

Tuesday, February 14, 2012

सुहृदच्या कविता

भूत असं कोणी नसतं
भूत असं कोणी नसतं
मग कशाला ओरडायचं?
हात कशाला धरायचे?
खरं सांगू का?
स्वप्नात वाटू शकतं!

.......

टेडी बिअरला
एक स्वप्न पडलं
बाथरूममधे त्याला
एक भूत दिसलं
इतका घाबरला
इतका घाबरला
बेसीनमधे नळ सुरू झाला
आई, पळत पळत ये.
सकाळी उठलाSS
त्याला कळलेSS
आले नाही भूत
आई आहे घरी
नाहीये भूत.
भूत नसतं नसतं नसतं
भूत असतं असतं असतं.

-- सुहृद

Saturday, October 8, 2011

मी - आम्ही

मी जन्मले तेव्हा मी म्हणजे फक्त ’मी’ होते. माझ्यावर ना कोणाचा प्रभाव होता ना जबरदस्ती, ही ’मी’ तेव्हा मनमानी करायची, रडायची, हट्ट करायची. मग ही ’मी’ मोठी झाली. ती ’आम्ही’ या गटात गेली. आम्ही - आमचं कुटूंब, आम्ही विद्यार्थी, आम्ही पुणेकर इ. या ’मी’ ला हे "आम्हीपण" आवडू लागलं. ती प्रत्येक ’आम्ही’ चा एक भाग झाली. मी ’आम्ही’ त मिसळून गेली. "मी" ला ’मी" साठी वेळ पुरेनासा झाला. तिचे सगळे "आम्ही’ म्हणजे मित्र-मैत्रिणी, वर्गमित्र, कुटूंब, यात ती गुंतून गेली. आज याच्यासाठी हे उद्या त्याच्यासाठी ते, असं चालू झालं. "मी" ’मी’ ला विसरूनच गेली. ’सगळ्या आम्ही’त मीच काहीतरी वेगळं केलं तर माझ्या प्रतिमेचं काय होईल? "मी" नं प्रतिमेला जपलं पण "मी"पण जपायला विसरली.
खूप दिवस गेले "मी" मोठी झाली, तिचा "आम्ही " परिवारही मोठा झाला, वाढला. आणि एकदिवस जेव्हा "मी" नं मागे वळून पाहिलं तेव्हा ती हळहळली. ’मी’ ने मान मिळवला पण स्वतःची आवडविसरली. नवी ’मी’, आधीची ’मी’ राहिलीच नाही. ’सगळ्यांचं असच होतं का?’ मी ला प्रश्न पडला. सगळ्या "आम्ही" त स्वतःच्या "मी" लाही वेळ द्यायला हवा हे तिला जाणवलं.
’मी’ असतो तेव्हा ’आम्ही’ असावसं वाटतं आणि जेव्हा ’आम्ही’ असतो तेव्हा काहितरी ’मी’चं असावसं वाटतं.
’मी’ मग मनाशी विचार करू लागली, आणि लहानपणीच्या ’मी’ शी तिची गट्टीच जमली. ’मी’ला ’मी’चच नवल वाटलं. काय जादू केली असावी या ’आम्ही’ने?
प्रत्येकजणच या ’मी’ आणि ’आम्ही’मधे गुंतत जातो. ज्यांना ’मी’ची आस वाटते आणि आम्ही ची शक्ती समजते, त्यांनाच तर म्हणतात......
" ’मी’पण त्यांना कळले हो........"

[ ना.शा.संगतीच्या तासाला लिहिलेला लेख. ]


- मुक्ता

Friday, September 16, 2011

अंड्याचं कवच

माझा भाऊ सुहृद याने सांगितलेली गोष्ट


एक होतं बदक. त्याच्या अंड्याला एक कवच होतं. ते कवच निघून गेलं. पिल्लू बाहेर आलं.सोबत कवच घेऊन ते आई-बाबांना शोधायला निघालं. त्याने एका दारावर ”टिंग टॉंग” केलं. ” अहो, दार उघडा की!”
घरात कोणीच नाही.
त्याने दार उघडलंच नाही.
तिसर्‍या दिवशी तो एका मांजरीकडे गेला. मांजरीने विचारलं, ”खेळायला काय आणलंय?”
बदक म्हणालं, ” कवच आहे.”
त्या मांजरीला खूप केस होते.
तिने विचारलं,” कोण आहे?”
”मी आहे बदकाचं पिल्लू. आईबाबांना शोधायला आलोय.”
” मी आहे मांजर”
एवढा मोठा आवाज ऎकून ते घाबरलं.
” माझ्याकडे अंड्याचं कवच आहे.”
मांजरीने कवचावर हात ठेवला. ते कवच तुटलं.
” आधी तू कुठल्या घरात होतास?”
” मी कवचात राहतो.”
तिने बदकाचं घर मोडून टाकलं होतं.
” चल माझ्या घरात राहा.”
तिने कात्रीने भिंत कापली. घराचे दोन भाग केले.
घराला सगळीकडे भिंत होती एका बाजूला भिंतच नाही. छत अर्ढं अर्धं झालं. मग त्यांनी घर जोडलं. मग मांजरीचं घर बदकाचं घर एकच झालं.
त्यांच्या छताला एक भोक पडलं. त्या भोकातून त्यांना सूर्याचे डोळे दिसले.
सूर्यालापण एक मांजर आणि बदक दिसले.
रात्री झोपताना त्यांच्याकडे कुत्रा आला. तेंव्हा त्यांनी घड्याळात पाहिलं. एकवर काटा होता.
मांजरीने हरवायचं ठरवलं. ती एका इंजिनमधे बसली. सिग्नल पिवळा होता. सिग्नलवर इंजिन तुटलं. मग ती एका ट्रॅक्टरमधे बसली. त्या ट्रॅक्टरमधून उतरून ती जाळीत बसली आणि प्राणीसंग्रहालयात गेली. जाळीत एक सिंह होता. वरून ती जाळीच्या बाहेर निघाली. सिंह पण बाहेर आला. मग मांजर सर्कशीत गेली. सिंह आल्यामुळे सर्कशीतले सगळे सील मासे घाबरून बाहेर आले. सर्कशीला तीन लोक होते. तीन लोक लोक घाबरून बाहेर आले. विदुषकपण घाबरून बाहेर आला.
एक सील मासा खिडकीहून छोटा होता. रात्री तो खिडकीतून बाहेर आला. पळून कुत्र्याच्या घरी आला. कुत्रा पोहत होता. तो मासे खायला बाहेर आला. सील मासे घाबरले, निघून गेले.
कुत्रा भिंतीवर धडकून खाली पडला. त्याला काही मासा खाताच आला नाही. तो कुत्रा पडला त्याचे डोळे पांढरे झाले. त्याचे बुबुळ दिसलेच नाही.
बदकाचं पिल्लू आणि कुत्रा मांजरीला शोधायला लागतात. मग कुत्र्याला मांजर सापडली.

--- सुहृद

Saturday, April 23, 2011

एक जिवलग मित्र....... " हॅरी " नावाचा!

मला तो दिवस चांगलाच आठवतो, आम्ही औरंगाबादला होतो. त्यादिवशी मोठीआई ( माझ्या आईच्या आईला मी मोठीआई म्हणते. ) ने पुरणपोळी केली होती, म्हणून माझी स्वारी खुशीत होती.
मी पुरणपोळी खात खात टि.व्ही. पहात होते. मी तेव्हा ४-५ वर्षांची असल्याने मला नॉडी पहायला खूप आवडायचे. "नॉडी" चा एक एपिसोड संपला आणि जाहिराति सुरू झाल्या, तेव्हा मी यापूर्वी कधीच न पाहिलेली एक जाहिरात सुरू झाली, तिच्यात एक मुलगा वरून पडत असलेली पाकिटे गोळा करत होता. आणि एक गलेलठ्ठ माणूस त्याला जोरजोरात ओरडत होता! मला त्या प्रसंगाची क्षणभर मजा वाटली आणि पुन्हा नॉडी सुरू होई पर्यंत मी ते विसरूनही गेले होते. पण नॉडी संपल्यावर त्या जाहिरातीच्या शेवटी जी अगम्य अक्षरे आली होती तीच पुन्हा चमकली आणि एक लांबलचक अंगरखा घातलेला, पांढरी शुभ्र दाढी असलेला माणूस अंधारातून चालत येऊ लागला. एखाद्या ४-५ वर्षांच्या मुलाला घाबरायला हे दृष्य पुरेसे होते. मला तर तेव्हा अश्या भयकथा मुळीच आवडत नसत त्यामुळे मी पटकन चॅनेल बदलले, पण आई तोपर्यंत बाहेर आली होती आणि तिने ते दृष्य पाहिले होते, त्यामुळे तिने पुन्हा सिनेमा लावायला सांगितले आणि म्हणाली की " तुला आवडेल असाच आहे हा!" मला पटलं आणि मी सिनेमा पहायला सुरूवात केली. खरच मस्त होता तो! शेवटी शेवटी तर आईच मला सांगत होती की घाबरली असशील तर बंद करूया पण मी ऐकायला तयार नव्हते, मला तो सिनेमा शेवटपर्यंत बघायचा होता! मला प्रथमदर्शनीच प्रभावीत करणार्‍या त्या चित्रपटाचं नाव होतं.... हॅरी पॉटर...! हिच हॅरीची आणि माझी पहिली भेट!
त्यानंतर काही दिवसांनी पुण्याला आलो. तरीही मी "हॅरी" ला विसरले नव्हते, पण कायम त्याचाच विचार करायचे असे नाही. खरे तर मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण तरीही मी खूपच प्रभावीत झालेली होते हे नक्की! एक दिवस माझ्या नावाने एक कुरियर आलं, त्याच्या आत चक्क हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाची सी.डी. होती! मग काय त्या सी.डी. ची पारायणे सुरू झाली! मी ती इतक्यावेळा पाहिली की मला त्यातले संवादही तोंडपाठ झाले होते! त्यानंतर हॅरी पॉटरचा दुसरा भाग निघाला तेव्हा त्याचीही सी.डी. बाबाने आणून दिली! पण ती इंग्रजी असल्याने मी आईला जवळ बसून घ्यायचे आणि सी.डी पहायचे मग एखादा संवाद झाला की अर्थ विचारायचे. हॅरी पॉटरच्या दोन सी.डी पेक्षा काही मिळेल अशी माझी कल्पनाही नसताना....
एकदिवस आम्ही क्रॉसवर्ड मधे गेलो होतो तेव्हा बाबाला हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाचं मराठी पुस्तक दिसलं, त्याने मला विचारलं " घेऊया? " मी अगदी आनंदाने हो! असे सांगितले आणि हॅरी पॉटरचे पहिले पुस्तक माझ्या घरी आले! तेव्हा मला धड वाचताही येत नसल्याने कुणीतरी मला पुस्तक वाचून दाखवायचे, पण बाबा पुस्तक वाचून दाखवताना अनुवादावर इतकी टिका करायचा की जेमतेम एक प्रकरण वाचून होई! त्यामुळे आम्ही जेमतेम तीन प्रकरणे वाचली की कुठे होतो हे विसरून जायचो त्यामुळे त्या पुस्तकाचा शेवट मला कधीच ऐकता आला नाही. असं रटाळ वाचन चालू असल्याने मी कंटाळलेच होते त्यामुळे ते पुस्तक कुठेतरी हरवलं आणि मी ते शोधण्यासाठी फार कष्ट केले नाहीत .ते मला पुन्हा सापडलं तेव्हा मला अडखळत का होईना वाचता येत होतं. मी ठरवलं की आपण आता शेवटचं वाचूया! म्हणून अगदी शेवटचं प्रकरण उघडलं आणि वाचायला सुरूवात केली. सिनेमातल्यापेक्षा जास्त सविस्तर होतं हे! त्यातला मला एक संवाद फारच आवडला होता तो म्हणजे....

" हॅरी म्हणाला " पण सर, क्विरल मला स्पर्श का करू शकला नाही ?"
डम्बलडोरनी एक दिर्घ उसासा सोडला आणि ते म्हणाले-
" तुला वाचवण्यासाठी तुझ्या आईने आपले प्राण गमावले. जर एक कोणती गोष्ट व्होल्डेमॉर्टला कधीही कळली नसेल तर ती म्हणजे प्रेम, माया! त्याला हे कधीच कळलं नाही की जसं तुझ्या आईचं तुझ्यावर होतं तसं अत्यंत सशक्त प्रेम आपली काही आठवण ठेवून जातं. तो एखादा व्रण नसतो. दृश्य खूणही नसते.. असं उत्कट प्रेम असणं, जरी ते करणारी व्यक्ती नसली तरी, आपल्याला नेहमी काही संरक्षण देत असतं. ते तर तुझ्या रोमारोमात भिनलय. क्विरल, ज्यात व्देष अगदी खच्चून भरला होता, हाव होती, महत्वाकांक्षाही होती, व्होल्डेमॉर्टबरोबर आपला आत्मा त्यानं एक केला होता, याच कारणामुळे तो तुला स्पर्श करू शकत नव्हता. असं काही चांगलं ज्यात आहे अश्यांना स्पर्श करणंही त्याला वेदनात्मक होतं."

त्यामुळे मी उलट-सुलट करत सगळं पुस्तक वाचलं. आणि मग मी लहर येई तेव्हा ते काढून वाचायचे. मी दुसरीत गेले त्यावेळी उन्हाळयात हॅरी पॉटरचा दुसरा मराठी भाग आणला. आणि मग हे दोन्ही भाग मी इतक्यावेळा वाचायचे की शेवटी बाबाने ते आठवड्याभरासाठी लपवून ठेवले होते! मग काही महिन्यांनी हॅरी पॉटरच्या ३ र्‍या, ४ थ्या व पाचव्या भागाच्याही सीडी मिळाल्या. त्यांचीही पारायणे झाली.
याच काळात कधीतरी नीरजाचा वाढदिवस होता, तेव्हा मी ठरवले की हॅरी पॉटरचा पहिला भाग तिला लिहून द्यायचा! पण एवढी २९० पाने लिहून काढणे काही मजा नव्हती म्हणून आणि जर सगळं पुस्तक लिहून काढलं तर नीरजा वाचायचा कंटाळा करेल म्हणून मी कथा संक्षिप्त करून लिहीली. तरीही संदर्भ न गाळता एवढी करामत करणं अर्थातच कठीण होतं पण तरिही दिवस रात्र खपून मी ते पुस्तक तयार केलं होतं!
मी तिसरीत जाईपर्यंत संपूर्ण हॅरीमय झाले होते. त्याच भरात आम्ही रिक्षात हॅरी पॉटरची पात्रे ठरवून घेऊन त्यांचे प्रसंग बसवू लागलो. आम्ही चॉपस्टीक्स वापरून एकमेकांना मंत्र/ शाप देउ लागलो! एकमेकांना प्रश्न विचारू लागलो आणि चक्क वर्तमानपत्रही काढू लागलो! मी तयार केलेला दै. जादूगारचा एक अंक अजूनही माझ्याकडे आहे. आम्ही हॅरी पॉटरच्या विविध पात्रांची नक्कल करतो हे मात्र आम्ही गुपितच ठेवले होते. त्यानुसार आम्ही आम्हाला टोपण नावे सुध्दा दिली होती! उदा. हिंदूस्तान पेट्रोलियम ( hp म्हणजेच हॅरी पॉटर ), मांजर ( हर्माईनीने वेगळाच केस आणल्याने ती "मांजर" होते ना! =२ र्‍या भागात ), डोनाल्ड डक ( रॉनल्ड विज्ली ), टोपीवाल्या बाई ( मॅक‍गोनागल ), घुबड ( हेडवीग) इ.!

तिसरीत आल्यावर एक दिवस कुणीतरी म्हणाले की हॅरी पॉटरचा तिसरा मराठी भाग आला आहे! झालं! त्यादिवशी मी आणि आई इथून पाथफांडरला गेलो, आणि पुस्तक घेऊन आलो! पाचवीत कल्याणी म्हणाली की चौथा भाग आला आहे, त्यामुळे आम्ही सेनापती बापट रोडवर जाऊन चौथा भाग घेऊन आलो. हा चौथा भाग खूप मोठा आहे , ६७२ पानांचा! यावेळी मी एक गंमत केली हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं ( दोन दिवस लागले, अभ्यास धरून! ) त्यानंतर पुन्हा पहिल्या प्रकरणापासून सुरूवात केली! असं सलग वाचन १० वेळा केलं आणि मग असं कळलं की पहिल्यांदा वाचतो तेव्हा गोष्ट कळते. दुसर्‍यांदा वाचताना प्रखरपणे कळते, तिसर्‍यांदा वाचताना हलकी फुलकी वाक्य लक्षात येतात, चौथ्यांदा वाचताना घडलेल्या प्रत्येक घटनेचा अर्थ लावता येतो,पाचव्यांदा वाचताना वाक्य लक्षात रहातात, सहाव्यांदा वाचताना विविध प्रसंगांच्या वेळी व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रिया समजून घेता येतात आणि नंतर वाचताना आपणही त्या पात्रांसोबत तिथे उतरतो आणि मंत्रमुग्ध होऊन जातो!
आता माझ्याकडे इंग्रजी हॅरी पॉटरसुध्दा आहेत त्याची कथा....
मी हॅरीच्या पहिल्या आणि दुसर्‍या भागाची पारायणे करत असताना आई म्हणाली की पुस्तकातली वाक्य तर तुला तोंडपाठ आहेतच, मग इंग्रजी पुस्तकं वाचून पहा! झालं! त्यादिवसापासून मी रोज आईला पुस्तकाबद्द्ल विचारायचे, शेवटी एक दिवस भर पावसात बाहेर पडून आम्ही पहिला भाग आणला! तो मी झपाटल्यासारखा वाचून संपवला. मग दुसरा, तोही संपला! तिसरा भाग जवळच्या दुकानात मिळालाच नाही म्हणून पॉप्यूलर पर्यंत जाउन आणला, हे पहिले तीनही भाग मी मराठीतून वाचले होते पण चौथा भाग घेतला तेव्हा काहीच नीट समजेना म्हणून मी ते पुस्तक ठेवून दिलं.
चौथीचं वर्ष हे माझ्यासाठी फारच छान गेलं कारण या एका वर्षात मला तीन इंग्रजी हॅरी पॉटर मिळाले! पाचवीत ४ था भाग मराठीतून आला त्यामुळे इंग्रजीसुध्दा वाचला, आणि मग एक तासभर रडून ५ वा भाग मिळवला! तो घेताना आईच्या रागिट चेहर्‍याकडे पहात बाबा म्हणाला होता " खेळण्यांसाठी नाही; पुस्तकांसाठी हट्ट करतीये हे किती चांगलं आहे! " यानंतरचे भाग मिळवण्यात माझं काहीच कर्तृत्व नाही कारण पुढचे दोन्ही भाग बाबाने स्वतःसाठी घेतले होते.

माझ्यामते हॅरी मुळे मी वाचू लागले. म्हणजे आधी वाचायचे नाही असं नाही कारण १ ला भाग मिळायच्या आधी मला वाचताच यायचं नाही! पण माझ्या वाचनाची सुरूवात हॅरीने केली. आणि मग मी फक्त त्याचाच ध्यास घेतला. अगदी १२ जून २०१० पर्यंत मी वाट पाहिली की मला कदाचित पत्र येईल, पण नाही आलं! [ अर्थात जर माझ्याबरोबर आदित्य ( आठवले ) ला बोलावलं असतं तरच मी गेले असते कारण मला खूप छान इंग्रजी बोलता येत नाही. ] सगळे म्हणतात की तूच सगळ्यांना हॅरीचा नाद लावला आहेस! मला हे त्यांचं बोलणं ऐकायला छान वाटत असलं तरी
सत्य हेच आहे की ती हॅरीची गुणवत्ता आहे! मी तर फक्त त्याची बाकिच्यांशी ओळख करून दिली आहे!
कधी कधी असं वाटतं की हा आपला मित्र आपल्याला दुरावत तर नाहिये ना? सहावीत आल्यावर प्रथमच मी वेगवेगळी मराठी पुस्तके वाचू लागले, त्यांची पारायणे करू लागले आणि कधी कधी चक्क हॅरीला बाजुला सारून इतर पुस्तके घेउ लागले. पहिल्यांदाच हॅरीबद्द्ल पडणारी स्वप्ने कमी झाली...

तसं म्हणायचच असेल तर हॅरी म्हणजे माझी ओळख आहे. कित्येक जण मला त्याच्या संबंधी प्रश्न विचारतात, गोष्ट सांगायला सांगतात... पण ही माझी ओळखच पुसली जातीये असं वाटतयं... परवा मुल्यमापनाच्या वेळी ताईंनी विचारलं " सध्या काय वाचतीयेस? " तर मी चक्क " काही नवीन नाही " असं म्हणाले. नंतर आठवलं आपण हॅरी पॉटर आणि अग्निचषक पुन्हा वाचत आहोत! तेव्हा मनाला चटका बसला, वाटलं कित्येक दिवस मित्र म्हणू उराशी बाळगलेल्या या पुस्तकाला आपण विसरलो कसे?
काल पुन्हा सगळे भाग वाचले, जीवात जीव आल्यासारखं वाटलं! तेव्हाच ठरवलं एकदा पक्की केलेली मैत्री सोडायची नाही, अगदी आयुष्यभर! क्षणासाठीच मी या माझ्या मित्राला विसरले होते, पण आता कायम लक्षात ठेवीन!
आज, जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी, हा लेख.... हॅरीसाठी!
कदाचित हा लेख नीट लिहीला गेलाही नसेल पण हे सगळं माझ्या मनातलं आहे, जसं आठवेल तसं उतरवत गेलेलं, कदाचित बालिशपणासारखं....
पण माझ्यासाठी खूप महत्वाचं, कारण या लेखाच्या निमित्तानी मला हॅरीला सांगायचय, तू खरा असशील अथवा नसशीलही, माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये,
कदाचित मी इतर पुस्तके वाचत असल्याने तू कधीतरी दुखावलासुध्दा गेला असशील, पण मी तुला मुळीच विसरलेली नाही, कारण तूच मला लढायला शिकवलं आहेस, कणखर बनवलेलं आहेस,

तूच माझा जीवाभावाचा मित्र आहेस!


- मुक्ता

Tuesday, April 19, 2011

अक्षरनंदन शाळा

अक्षरनंदन म्हणजे एक आगळी वेगळी शाळा.
या शाळेचा आता मला लागला लळा.

खूप नाही चकचकीत,
पण चकचकीतपणाला बाजूला सारणारा
आपलेपणा आहे तिच्यात !
खूप नाहीत रीतीरिवाज
पण त्यापेक्षाही इतरांबद्दल
भरपूर आदर आहे तिच्यात !

वह्या भरत नाही इथे कोणी,
अनुभवातून शिकतात सारे
चाकोरीबद्‍ध शिक्षण नसते,
मुक्तपणा असतो त्याच्यात !

गणवेशाची सक्‍ती नसते,
अभ्यासावर भक्‍ती असते !
हुशार होतकरु नागरिक घडवते
ही आगळी-वेगळी शाळा !

गुणांचे बंधन नसते,
दोस्तांचीही संगत असते
निर्मळ आनंद खळखळणारे, भरभरून देते ,
हि आगळी वेगळी शाळा!

ताई भरपूर ज्ञान देतात,
निसर्गाची महती गातात !
मुलांचे बालपण हरवणार नाही
याची काळजी घेते ही आगळीवेगळी शाळा !

कधी वाटते, दहावीनंतर कसे असेल जगणे माझे,
शाळा नाहीत, दोस्त नाहीत, फक्‍त अभ्यासाचे साचे !
शाळा सोडण्याच्या कल्पनेनेच, डोळ्यात अश्रू उभे राहतात.
हे प्रेम, वात्सल्य, कधी मिळेल का परत आयुष्यात ?
काहीतरी दूर होतंय याची जाणीव होते आहे
म्हणून मन मोकळं होण्यासाठी, आता कविता लिहिते आहे.


(सहावीचे वर्ष संपतानाची कविता)

Friday, April 15, 2011

आत्याला सोडवायला दिलेला पेपर......

हॅरी पॉटर मंडळातर्फे....

हॅरी पॉटर शिष्यवृत्ती
प्रश्नपत्रिका

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्र.१ गाळलेल्या जागा भरा. वाक्य उतरवून घ्या.

1. हॅरी पॉटर आणि ----- हा ४था भाग आहे.
2.हॅरीचे संपूर्ण नाव "------ ------ ------" असे आहे.
3.हॅरीचा जन्म -------- ला झाला.
4.हॅरीच्या एका वर्गमैत्रिणीचे नाव भारतीय आहे. ती म्हणजे ------- व तिच्या जुळ्या बहिणीचे नाव ------- असून
ती ------- या हाउसमधे आहे.
5.सिरियस ब्लॅक हा हॅरीचा ------- होता
6.सिरियस व रिटा दोघेही -------- होते.
7.हॅरीची जन्मतारिख -------- ही आहे. ( साल नको. )


प्र.२ ओळख द्या. साधारणतः इतिहास, कार्य या सर्व गोष्टी यायला हव्यात.

1.सिविरस स्नेप
2.व्हॉल्डेमॉर्ट
3.फायरबोल्ट

प्र.३ सविस्तर उत्तरे द्या.

1.व्हॉल्डेमॉर्टनी हॅरीला ( सातव्या भागात ) मारूनही तो कसा जिवंत झाला? कशामुळे?
सिविरस स्नेप डम्बलडोरच्या बाजूने कसा आला? कशामुळे? त्याने डम्बलडोरना कोणत्या महत्वाच्या बेताला मदत केली?

2.मृत्यूची बक्षिसे म्हणजे काय? यांच्यामुळे काय होतं?

3.हॅरीच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करा.

प्र.४ जोड्या लावा.

1.हॅरी लुपिन
2.स्नेप अजेय छडी
3.डम्बलडोर शापांची माहिती
4.टोंक्स पॉटर

प्र.५ नावे लिहा-

1.हॉगवर्टसची हाऊस =
2.डर्स्ली कुटुंबातील सदस्य =
3.डम्बलडोर परिवारातील चौघांची नावे =
4.संपूर्ण विज्ली कुटुंबियांची नावे =
5.त्रिजादुगार स्पर्धेत भाग घेतलेल्या व्यक्ती =
6.त्रिजादुगार स्पर्धेत भाग घेणार्‍या शाळा =
7.व्हॉल्डेमॉर्टचे समर्थक अर्थात प्राणभक्षी =

प्र.६ फरक लिहा.

1.ड्रेको मॅल्फॉय , हॅरी पॉटर
2.जिनी विज्ली , लव्हेंडर ब्राऊन

प्र.७ हॉगवर्टसच्या किमान ६ प्रोफेसरांची नावे व त्यांचे विषय लिहा.

प्र.८ विशेषणे द्या. ( कमीत कमी १० )

1.हर्माइनी जीन ग्रेंजर =
2.स्नेप =

प्र.९ निबंध लिहा. कमीत कमी २५ ओळी.

1.क्विडिच
2.हॉगावर्टस
3.ग्रिंगॉटस

प्र. १० तुम्हाला हॉगवर्टसला शिकायची संधी मिळाल्यास काय कराल ते १५ - २० ओळीत लिहा.

प्र.११ छू मंतर गल्लीचे वर्णन करा. उदाहरणे अवश्य द्या.

प्र.१२ निदान ३ झाडूंच्या प्रकारांची नावे व योग्यता लिहा.

प्र.१३ एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.जादूई जगात अशी कोणती गोष्ट आहे जी स्वतःच आपला मालक निवडते?
2.पर्सी आयर्लंड विरूध्द बल्गेरिया सामन्याच्या वेळी कोणता अहवाल लिहीत होता?
3.हॅग्रिड कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे?
4.कोण फक्त ग्रिफिंडॉरची तलवार वापरू शकतो?
5.कोणत्या पक्षाची कोणती गोष्ट जखम भरू शकते?
6.सुवर्णशोधक काय काम करतात?

प्र.१४ थोडक्यात उत्तरे लिही.

1.व्हॉल्डेमॉर्ट चे नाव त्याने व्हॉल्डेमॉर्ट असे का ठेवले?
2.मायासुवर्ण म्हणजे काय?


प्र.१५ भरपूर माहिती लिहून स्पष्ट करा...

1.व्हॉल्डेमॉर्टचा पुनर्जन्म
2.हॅरीने घेतलेला होरक्रक्सचा शोध
3.स्नेपचा हॅरीबद्दलचा हेतू

1.जेके रोलिंगला कथा कशी सुचली? कशामुळे?
2.हॅरी पॉटरचा विक्रमी खप
3.जेकेच्या रहाणीमानात पडलेला फरक


प्र.१६ विचार करून सोडव.

हॅरीच्या मित्राचा पाळीव मित्र , त्याचा शत्रू, त्याची मोठी मैत्रिण , तिचा पाळिव मित्र , त्याचा नवीन मोठा कैदी मित्र , त्याचा मित्र , त्याचा मुलगा , त्याची पाळिव मैत्रिण ,
तिचा खुनी , त्याचा शुध्द रक्ताचा- गुलाम बाळगणारा मित्र , त्याची मैत्रिण , तिची शत्रू , तिचा आवडता (माजी) शिक्षक.........

कोण??



----------------------------------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------------------------------------------

Sunday, April 3, 2011

// क्रिकेटप्रेमींना पत्र //

लोक हो,

अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या. क्रिकेट पहाण्यासाठी या. आपापले उद्योग टाळून या. भारताच्या जर्सी घालून या. ८ तासांची सवड काढून या.
हे क्रिकेट म्हणजे काही कबड्डी - खो, खो नाही. नुसतं बसून रहाणं आहे. मधूनच ओरडणं आहे. क्रिकेटचं प्रेम मनात ठेवत दिवस भर एका जागी बसायचं असतं. या खेळात असते हार - जीत, चुकीचे निर्णय , २ - ३ पॉवर प्ले. पण हे आव्हान असतं जिद्दिला, क्रिकेटप्रेमाला!
ध्यानात घ्या, तिथे आपले जुने खेळाडू काही इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला, कित्येकदा पराभवही!
कधी कधी प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्यावर मात केली असेल, तो भलामोठा विश्वचषक मुकाट्याने प्रतिस्पर्ध्यांना द्यावा लागला असेल त्यांना!
त्या प्राचिन क्रिकेटचं स्मरण, हा आहे क्रिकेट पहाण्याचा उद्देश!
आपल्या पुर्वजांनी क्रिकेटवर जिवापाड प्रेम केलं होतं. ते वेळ घालवून पाहिलं होतं!
गावसकरांची मते तुम्हाला ठाउकच आहेत, ते म्हणतात,
जनतेच्या एकतेचं कारण म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा विश्वचषक हातातून जाताच समाज दुःखी होतो. समाज दुःखी झाल्यावर, त्याच्या पाठिंब्या शिवाय क्रिकेट कसे खेळावे? म्हणूनच याआधीच्या क्रिकेट्वीरांनी (१९८३ मधे) विश्वचषक जिंकून क्रिकेटप्रेम वाढते ठेवले आणि मगच पुढिल स्पर्धांमधे उतरले. आत्ताचे क्रिकेटप्रेम तर कपिलदेवने १९८३ मधेच निर्माण केलेले होते!
गावसकर पुढे म्हणतात,
क्रिकेट विरहीत समाज म्हणजे आनंदापासून वंचित राहिलेला समाज. म्हणूनच ज्या व्यक्तींस प्रसिध्दी ह्वी अशांसाठी ( नेते, अभिनेते ) क्रिकेट हेच प्रसिध्दीचे साधन, क्रिकेट हेच त्यांच्या लोकप्रियतेचे मूळ, क्रिकेट म्हणजेच पैसा, क्रिकेट हेच त्यांचे बळ, क्रिकेट हिच धनलक्ष्मी, क्रिकेट हेच आपले क्षेत्र, हक्काचे ठिकाण ! म्हणूनच प्रसिध्दीसाठी आपले प्राण ओतून स्वतःच्या क्रिकेटप्रेमाचा प्रसार करणे ही अशांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट!
क्रिकेट हा तर इंग्रजाचा खेळ, मग त्याला एवढा मान कशाला द्यायचा हा एक प्रश्न तुमच्या मनात येउ शकेल, पण त्याचं एकच उत्तर आहे, आज क्रिकेट ऐवजी कार्टून्स पाहिली जातात, बेब्लेडस फिवली जातात! फूटबॉल खेळला जातो! क्रिकेट हा एक संथ खेळ आहे असं म्हणून त्याची उपेक्षा केली जाते! म्हणून क्रिकेट, जे एके काळी तीर्थ होतं त्याचा निदान अनादर तरी करू नये!
आजपर्यंत २२ विश्वचषक झाले आहेत असा पुस्तकांत उल्लेख आहे! त्यातले मी ४ पाहिले आहेत. अगदी निवांतपणे पाहिलेत.
क्रिकेट कसं पहावं याचं एक तंत्र आहे. ते धावत-पळत पाहून उपयोग नाही. खेळपट्टीची संपूर्ण माहिती, तिचा इतिहास, त्या सामन्याचं महत्व, मैदानाचा आकार, दोन्ही संघांची माहिती , त्यांच्या अपेक्षा या सार्‍याची कशी नीट माहिती पाहिजे, तरच त्याचं महत्व लक्षात येतं.
धावता- पळता सामना पहायला क्रिकेट म्हणजे काही सिरियल / घड्याळ नाही! मधेच स्कोर पाहून जाणं हा त्याचा अपमान व आपलाही! असं करू नये.
क्रिकेट हा प्रकाशदिप आहे. उणं- दुणं स्वच्छ दाखवणारा. काय सोडायचं व काय घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं.
ज्याचं स्मरण होताच मस्तक नम्र होतं, बाहू स्फुरण पावतात, शरिरावर रोमावळी उभ्या ठाकतात त्या विजयी सचिन तेंडूलकरने या मैदानावर एक तरी चौकार मारला आहे. तेव्हा....
सचिनचे बोलणे, चालणे, सल्ला देणे सगळं त्या मैदानाने अनुभवलेलं आहे!
जर त्या मैदानाला वाचा फुटली तर, ते आपल्याला म्हणेल "होय, तो पवित्रात्मा आम्ही आमच्या अंगाखांद्यावर खेळवला आहे!"

पण त्या वेळेचं महत्व आपण लक्षात घेत नाही. जिथे आपले क्रिकेटवीर निकाराने लढत असतात , ते पहायचं सोडून आपण पत्त्यांचे डाव मांडतो!
अविस्मरणिय सामना बघण्याऐवजी, आपण वेगळ्याच विषयांवर गप्पा ठोकतो!
हे असं करता कामा नये...
क्रिकेट ध्यानात येत नाही तोपर्यंत तो एक खेळ असतो
पण ते ध्यानात आल्यावर तो एक जीवन-मरणाचा प्रश्न असतो! हा खेळ खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान तिथे दिलेलं असतं,
ते जाणवायला हवं! मग क्रिकेट पहाणे सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसतेच वेळ घालवणे होते.
यावेळी मनस्वास्थ्यासाठी जर क्रिकेटकडे पहायचं ठरवलं तर अशी रोमहर्षक, चैतन्यमय, वय विसरून टाकणारी, तरूणाईस हाक घालणारी गोष्ट शोधूनही सापडणार नाही!
क्रिकेट पहाताना मनाची होणारी चलबिचल, कितीही सुधारलेले असलो तरी त्या क्षणी मनात येणार्‍या अंधश्रध्दा याची कशाशीच तुलना करता येणार नाही
सांसारिक व्यापांपासून मन मुक्त होतं, केबलवाले, टिव्ही दुरूस्त करणारे लोक यांच्याशी मैत्र जुळतं, थोडावेळ आरामात बसल्याने आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं, वाढ्तं वय तिथेच थांबतं.
नाना समस्यांनी खच्चून भरलेल्या या जीवनातून काही क्षण तरी बाजूस काढून जे क्रिकेट पहातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. साक्षात्कार म्हणजे तरी यावेगळं काय
असतं?
इति!

- मुक्ता


[ "गोनिदांचे दुर्गप्रेमिंना पत्र" वरून प्रेरणा घेउन. ]

Thursday, March 10, 2011

पत्र

९ / ३ / ११, बुधवार
पान १
प्रिय आत्या, आजोबा, आजी,
सप्रेम नमस्कार! ( हे आपले उगाचच, दरवेळी काय विचारायचे कसे आहात? मला ठाऊक आहे तुम्ही कसे आहात!)पत्र लिहिणेस कारण की (पुढे सुचत नाही) आज कुठलेतरी रिकामे पाकीट सापडले आणि कितीतरी दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. खरे तर मी नीरजाला तिच्या सादरीकरणासाठी द्यायला कविता शोधत होते/ आहे. पण मधेच हे पाकिट दिसले आणि उचलले पेन लावले कागदाला! (उचलली जीभ लावली टाळयाला ) तुम्हांला एक विशेष ’ ता. क.’ सांगायचाय...... संस्थेची माहिती लिहायची होती, कविता लिहायची होती हे तुम्हांला ठाऊकच आहे. मी मयुरदादाच्या 'SPTM' ( save pune trafick (स्पेलिंग चूक) movment) बद्दल माहिती लिहिली होती. आधी ताईंची परवानगी घेऊन माझ्या ताज्या कविताही वाचायच्या ठरवल्या होत्या. शिवाय विंदांची ’घेता’ होतीच! मी सुरूवात केली आणि पहिली म्हणजे माझीच कविता वाचून संपवली, ती झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला! अशा बाबतीत चोखळदंड असणार्‍या वीणाताईंनीही कविता छान असल्याची पावती दिली., दुसरी कविता माझीच सुरू झाली, ती संपल्यावरही टाळ्या! मी चकीतच झाले! मग SPTM ची माहिती वाचायची होती (रमाने माहितीचे सुरूवातीचे वाक्य लिहिले होते, ’मी आज तुम्हांला फारश्या परीचित नसलेल्या संस्थेची माहिती सांगणार आहे!’ ) ती झाल्यावरही टाळ्या! (यावेळी टाळ्या का पडल्या ते मलाही ठाऊक नाही!) मग कोणीतरी ओरडले ” अरे, अजून एक कविता आहे” मग आमची घेता सुरू झाली. ती झाल्यावरही टाळ्या! या १० जणांमधे मला एकटीला एवढ्या टाळ्या मिळाल्या असतील! बर्‍याच जणांनी मला
पान २
सांगीतले की त्यांनी मला आधीच पूर्ण मार्क दिले होते! ( यावेळी विद्यार्थी मार्क देणार होते!)
आत्या, आलीच बघ १० तारीख, आता कितीसे दिवस उरलेत? ( गणित कच्चं) आज मोठीआई - आजोबा पनवेलला पोचलेत. ईशानची परीक्षा झाली सुद्धा! एकेकाचं नशीब असतं नाही का? (उत्तराची अपेक्षा नाही.) आमची उद्या चित्रकलेची परीक्षा आहे. आज आठवणीने खडू भरलेत. हल्ली गृहपाठाच्या बाबतीत माझ्या अंगात भयानक आळस भरलाय! उन्हाळा खुणावतोय दुसरं काय? आमचे वर्गमित्र-मैत्रिणी अभ्यासाला लागले सुद्धा! आमचं काय आदल्या दिवशी अभ्यास करूनही चांगलं चाललंय! मला आत्तापर्यंत बर्‍याच पेपरावर लिहून मिळालंय! ’अभ्यास केल्याचे जाणवते’ डोंबलाचा अभ्यास!
आता मला वाटतंय लवकरच मी दुसरा कागद घेणार. तशी माझी शैली ओघवतीच आहे, नाही का?
आईगं ss छे! डास चावला! उन्हाळ्यात डास कमी का होत नाहीत बरं?
माझे केस बर्‍यापैकी वाढलेत पण लोकांना मात्र तसं दिसत नाही. कारण ते खांद्यावर असल्याने खालून कुरूळे झाले आहेत. मी सारखे ते बोटे फिरवून सरळ करत राहते पण त्यामुळे ते आणखीनच कुरूळे होतात की काय अशी मला भीती वाटतीय! आजी, एखादा उपाय सुचवना? (तेल लावणे सोडून)
आमचे पेनबुवा आता लवकरच शाईची मागणी करणार असं दिसतंय, बहुदा पुन्हा उठावं लागेल, काय कटकट आहे!
पान ३
माझ्याकडे रिटा स्किटर सारखी लेखणी हवी होती, पटापट लिहिणारी! (स्वत:चं स्वत:)
खूपच उशीर होऊ लागलाय असं दिसतंय. आई, बाबा, लंपू एव्हाना झोपी गेले असतील. बाबूजींच्या मोबाईलवर ”गेले द्यायचे राहून ss'' ऎकू येतंय. ज्या कोणी गातायत त्यामुळे प्रसन्न वाटण्याऎवजी उदासवाणंच वाटतंय. जाउदे नाहीतर मला ’गेले द्यायचे राहून तुझ्यासाठी लिहिलेले पत्र.....” असं म्हणावं लागेल!
काल आम्ही मनीषाताईंचा ’सोलो’ पहायला गेलो होतो. काय सुंदर होता म्हणून सांगू! पण त्याआधी आयोजित केलेला सत्कारसमारंभ बाळबोधच होता/वाटला. पतंगराव कदम आले होते. ऍड. मकरंद ही होते (आडनाव विस्मृतीत, हे म्हणे दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांचे माहेरघर!) दाजीसाहेबही होते. त्यांनी मनीषाताईंना ५ हजार रू. चा चेक पाकीटात घालून दिला. ते पाकीट दिल्यावर म्हणाले ’आत पाच हजार रू. चा चेक आहे, तो उघडून दाखवू काय?’ या वाक्यानंतर जो हशा पिकला त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. सर्वांनी आपले मनोगत (भाषण) व्यक्त करायचे होते. एक किर्ती.... नावाच्या बाईंनी आपल्या संथ आवाजात सुरूवात केली आणि ’स्त्रिया कधीच दीन नव्हत्या’ या एका वाक्यावर टाळ्या/ हशा मिळवून गेल्या ( वाक्य तिसरे होते का ते आठवत नाही, कदाचित त्या पुणेकर नसतीलही) तेवढ्यात जानकीबाई (मृण्मयी देशपांडे) आल्या आणि मकरंद टिल्लू तेव्हढ्यात ७.०० वाजताच्या कुंकूंवर विनोद करून गेले. पतंगराव तर काय बोलत होते ते
पान ४
त्यांनाच ठाऊक! आधीच ते ’पतंगरावांचे मत राज्यसरकारला खूप महत्त्वाचे असते/ आकाशात भरारी घेणारा पतंग’ इ. टिल्लूंच्या स्तुतीमुळे हरभर्‍याच्या झाडावर जाऊन बसले होते! त्यांचे ’मनोगत’ उरकल्यावर ऍड. मकरंद उभे राहिले. त्यांनी अशा थाटात सुरूवात केली जणू ते ’शास्त्रा’ चे वकील म्हणूनच आले होते. असं शास्त्र सांगतं, तसं शास्त्र सांगतं असं ते सारखं- सारखं म्हणत होते. आता शास्त्र सर्वांच्या आधी त्यांना सांगतं आणि मग ते आपल्याला सांगतात की ते आपल्याला वाट्टेल ते ’शास्त्र’या नावाखाली सांगतात यापैकी सत्य काय देव जाणे!/ शास्त्र जाणे! अजून एक भारदार गृहस्थ तिथे उपस्थित होते. अगदी झब्बा गांधीटोपी घालून ते मनोगत सांगायला उभे राहिले तेव्हा बाबा म्हणाला,’आता बघ, श्लोक म्हणतील’ आणि खरोखरच त्यांनी ’समुद्र’ पासून सुरू होणारा श्लोक म्हणायला सुरूवात केली. शेवटी दीपश्च दीपश्च असं दहावेळा म्हणाले आणि मग स्वत:च्या कार्याबद्दल सांगू लागले! एकूणच माझ्यामते निवडसमितीला महिलांचा सत्कार करण्यासाठी कोणी मिळाले नसावे. मला त्यांना सल्ला द्यायला आवडेल!
आजची मॅच छान झाली ना? तशी यशाबद्दल खात्री होती, तरीही!
अच्छा! आता झोप येतीये, पत्र मिळाल्यावर लगेच फोन करा.
-- तुमची लाडकी
एकुलती एक नात, एकुलती एक भाची,
मुक्ता!

Sunday, March 6, 2011

माझ्या मैत्रिणी

शाळेत मिळाल्या आहेत मला मैत्रिणी छान
मैत्री आहे टिकून तरीही असलो जरी लहान

पहिली मैत्रिण, तिचं नाव नीरजा
तिच्या संगतीत येते खूपखूप मजा
सुंदर चेहरा आणि इवलेसे डॊळे
दोस्ती कधी झाली ते त्यांनाही न कळे !
प्राणी पाळण्याचा छंद आहे तिला
मातेसम प्रेम देते तिच्या ’मोतिया’ला
हसतो कधी आम्ही देतो एकमेका टाळी
माझी पहिली मैत्रिण अशी साधी-भोळी !

रमा आहे माझी दुसरी मैत्रिण
खेळताना कधी होते माझीच बहिण
आहे थोडी खुजी, गोरी नी गोंडस
देवानं दिलं आहे तिला पुरेपुर बाळसं
काळेकाळे डोळे आणि टोकदार नाक
आवाजात असते तिच्या गमतीची झाक
गालावर पडती खळ्या जेव्हा ती हसते
तेव्हा माझी ही दुसरी मैत्रिण खूप छान दिसते !

माझी तिसरी मैत्रिण, नाव तिचं कल्याणी
रंग तिचा सावळा नि मधुर वाणी
तिचे केस आहेत दाट, काळे
काळ्याच रंगाचे आणि मग डोळे
कधी जर चिडली तर खूपच ओरडते
पण थोड्याच वेळात राग विसरुन खूप खूप हसते
कधी काही हितगुज करुन मला मिठी मारते
तेव्हा माझी ही तिसरी मैत्रिण मला भारीच आवडते !

माझ्या चौथ्या मैत्रिणीचं नाव आहे गौतमी
ही इतकी बोलते की म्हणावं लागतं "बोलणं कर कमी"
गौतमीचा आवाज आहे खणखणीत नी गोड
वस्तू असतात तिच्या नीटनेटक्या, कधी होत नाही त्यांची मोडतोड
शाब्दिक कोटया करण्यात ही आहे पटाईत
त्यांचे अर्थ कोणालाच पटकन कळत नाहीत
वाचनाचा आहे हिला छंद
सध्या ती वाचतीये पानिपत व तेव्हाचे हत्याकांड
तिचे माझे सूर चांगलेच जुळतात
तिच्या मनातले विचारही मला पटकन कळतात.
संकटाशी ही करते धैर्याने सामना
आमची मैत्री अशीच राहो हीच ईश्वरचरणी कामना

माझ्या पाचव्या मैत्रिणीचं नाव आहे सई
काहीना काही उद्योग ही करतच राही
"हॅरी पॉटर’ वरच्या आमच्या चर्चा भरपूर रंगतात
बाकीच्या मग येऊन आम्हाला थांबायला सांगतात.
सईचा स्वभाव आहे स्वच्छंदी, मुक्‍त
राग आटोक्यात ठेवणे तिला जमत नाही फक्‍त.
सई कायम करत रहाते विनोद छोटॆ छोटॆ
ती आहे प्रामाणिक, बोलत नाही खोटे
तिच्या संगतीत गप्पा खूप होतात मारुन
आम्हाला रोज खाउ आणून देते घरुन
सई कायम वापरते तिची कल्पनाशक्‍ती
माझी ही पाचवी मैत्रिण कायम शोधत असते युक्‍ती !

छोटी हसरी स्वप्ना आणि धडपडी मैथिली
सडेतोड उत्तरे देणारी वैष्णवी आणि
अवखळ स्पृहा, बडबडी विश्वभारती
आणि आनंदी नेहा, सध्याच्या प्रतिनिधी
प्रणोती आणि वैदेही, स्वत:तच दंग असणार्‍या
रेवा नि सायली

अजून किती सांगू गुण आणि नावे ?
आम्ही एकमेकींवर प्रेम करतो मनोभावे !

एकमेकींच्या सहवासात नाही होत कधी दु:ख
या अक्षरनंदनच्या शाळेतील ८ वर्षात आम्हाला
मिळाली आहेत सारी सुखं !

Tuesday, February 15, 2011

माझ्या आवडी - नावडी

आवडी-नावडी सर्वांनाच असतात. अगदी सगळ्यांना!
देवपण वाट्याला आलं तरी कुणाच्या वाटची दु:खं चुकली आहेत होय! पु.ल. तर एका भाषणात म्हणाले होते की ”तुम्ही उगाचच मला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे विशेषणे लावली आहेत! मला माणूस म्हणून राहू द्या की, ही विशेषणे लावली की थोरपणे वागायची जबाबदारी येते!” थोडक्यात काय? माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आवडी - नावडी या असतातच. [ बर्‍याच मोठ्यांना कारल्याची भाजी मुळीच आवडत नाही!] आता मोठ्यांचं जाऊ दे, आपण सामान्यांत येऊ, सामान्यांत म्हणजे नक्की कुठे? तर माझ्यापर्यंत हं, ऎका माझ्या आवडी-निवडी --
मला काय आवडतं? नक्कीच खूप काही आवडतं पण कशाबद्दल जवळीक वाटते? असं विचारलं की थोडं अस्वस्थ वाटतं , जवळीक हा शब्द खूपच हळवा नाजूक वाटतो.
मला गोष्टीतल्या पात्रांविषयी जवळीक वाटते. परवाच मी ’चौघीजणी’ झपाटल्यासारखं एका दिवसांत वाचून काढलं. तेव्हापासून सारखं वाटतं, मी कुणासारखी आहे? ज्यो, मेग, बेथ की ऍमी? हे पुस्तक वाचल्यापासून कधी नव्हे ते मला वाटतंय मला तीन सख्ख्या बहिणी हव्या होत्या. अगदी खरंच! दुसरं म्हणजे मला माझ्या दोन वेण्यांबद्दल जवळीक वाटते. एक कारण म्हणजे त्या कायम माझ्याजवळ असतात आणि दुसरं म्हणजे माझ्या बर्‍याच गोष्टीतल्या मैत्रिणी वेण्या घालतात. उदा. ज्यो, तोत्तोचान, हायडी. मला माझ्या या छोट्याशा विश्वाबद्दल खूप जवळीक वाटते, आत्मीयता वाटते. माझं कुटूंब, मित्र-मैत्रिणी, पुस्तके, शाळा, रिक्षाकाका अगदी माझं दप्तर, पांघरूण आणि माझं लाडकं ’पुणे’ सुद्धा! मला माझ्या घराबद्दल खूप जवळीक वाटते. आमचं घर कसंही असलं तरी! पुस्तकेतर इतकी पसरलेली असतात की नवी माणसे हबकूनच जातात! पण काही असलं तरी ते माझं घर आहे आणि त्याबद्दल मला खूप जिव्हाळा वाटतो.
ह्या आहेत माझ्या आवडी पण नावडींचं काय? थांबा त्याही सांगते--
मला कशाचा राग येतो? खूप गोष्टींचा. मुख्य म्हणजे पुस्तकाच्या दुकानातील दुकानदारांचा. जेव्हा आम्ही जातो तेव्हाच का पाथफाईंडर बंद करून माणसे निघालेली असतात! कायम आम्ही जातो तेंव्हा ’उज्वल ग्रंथ भांडार’ वर बंद दार व ’बुधवार बंद’ पाटी असते. छे ! असल्या गोष्टींचा मला भलताच राग येतो! मला खूप राग येतो जेव्हा मला कोणी म्हणते की मला पुस्तके वाचायला आवडत नाहीत किंवा म्हणते मला ’हॅरी पॉटर’ मुळीच आवडत नाही. तेव्हा मला त्या व्यक्तीला सोडून जावं वाटतं पण शिष्टाचारांमुळे तसं करता येत नाही! त्यावरून आठवलं! या असल्या शिष्टाचारांचाही मला खूप राग येतो. आपण कसे वागावे हे सांगणारे हे कोण तिर्‍हाईत? छे! मला नाही आवडत. कोणी जर म्हणाले की तुमच्या वर्गाला / तुम्हांला ’मॅनर्स’ नाहीत तरीही मला त्यांचा राग येतो. कोणी ( विशेषत: आमच्या सोसायटीतील इंग्रजी माध्यमातील मुली) म्हणाल्या की मला मराठी मुळीच आवडत नाही. श, ज्ञ, स्त्र, त्र इ. अक्षरे माझ्या डोक्यात जातात. आता मराठीचा काय उपयोग आहे? असे म्हंटले की मला त्यांचा राग येतो. अशा वेळी मी मुद्दाम मराठीत बोलते व तेव्हाचे त्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून मला खुनशी आनंद होतो! मला अजून एका गोष्टीचा राग येतो, तो म्हणजे एकटेपणा! मला कायम कुणाबरोबरतरी राहायला आवडतं. एकटेपणाला काहींचा नाईलाज असतो, त्यांच्या दृष्टीने मी चुकत असले तरी मला राग येतो हे खरे! कुणीतरी एकटे राहिले की मला लगेच त्याच्याशी जाऊन बोलावे वाटते. शाळेत कायम मैत्रिणींबरोबर राहावे वाटते. कधी कधी मन ताळ्यावर आणायला हा एकटेपणा उपयोगी पडतो तरी पण!
थोडक्यात ( थोडक्यात काय चांगल्याच सविस्तर!) काय? अशी आहे मी व माझ्या आवडी-नावडी! :)

--मुक्ता

( चाचणी परीक्षेत लिहिलेला निबंध )


*******

Monday, February 7, 2011

पक्ष्यांची गोष्ट

सकाळी मी शाळेत जातो ना? तेंव्हा माझ्या डब्यात कावळे, चिमणी, पोपट जावून बसतात. शाळेत मी डबा उघडला ना, की पटापट बाहेर येतात. माझ्या तोंडात जातात. तिथे एक मंत्र म्हणतात आणि माझ्या पोटात जातात. माझ्या पोटात काव काव, चिऊ चिऊ, मिठू मिठू ओरडायला लागतात. मी ऍ ओ ऍ ओरडलो की ते उडत उड्त बाहेर येतात. ड्ब्यात जावून बसतात.
मला खाऊ आणून देतात. भाजलेला ब्रेड, कधी कधी ना, साबुदाण्याची उसळ आणून देतात.कधी कधी ना, तीन लाडू आणून देतात. ताई आल्या तर ताईंना वाटेल लाडूचेच जेवण! कधी कधी अख्खा पेरू आणून देतात मी पेरूचा छोटा तुकडा खातो, तो माझ्या तोंडामधे गमतीजमती करीत राहतो. हो गमतीजमती करीत राहतो, हो गमतीजमती करीत राहतो.
माझ्या डब्यातली भाजी-पोळी कावळे, चिमण्या, पोपट खाऊन टाकतात.
मला खंजिरी वाजायच्या आधीच झोप येते. येता येता मी झोपतो. घरी येऊन मी झोपतो.

--सुहृद

Thursday, January 27, 2011

काळा पोपट

एक हिरवा पोपट होता. त्याने आपला रंग काळा करून घेतला पण चोच मात्र लालच ठेवली. हा काळा पोपट सारखा आमच्या गच्चीत यायचा.
एकदा तो ’टक टक’ करून दारातून आला. आम्ही त्याला कॉफी पाजली. नंतर पर्स गळ्यात अडकवून तो दारातून पायर्‍या उतरून गेला.
जाताना सोबत सुहृदला आणि शेळीला, दोघांना घरी घेऊन गेला. आणि त्याच्या पर्समधे काय होतं? ते हिवाळ्याचे दिवस होते तरी त्याच्या पर्समधे होते आंबे.
घरी गेल्यावर त्याने आंब्याचा रस केला. सुहृदला आणि शेळीला खाऊ घातला.


--- सुहृद

Sunday, January 23, 2011

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
फुलं घेऊन, पानं घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
वाघाचे बछडे घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
सिंहाचे छावे घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
फुलपाखरांच्या अळ्या घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
पक्षांचे, माकडांचे
घर म्हणजे जॅकरांडा
जॅकरांडा जॅकरांडा
इकडे तिकडे वाटभर
जॅकरांडा जॅकरांडा

---- सुहृद

Friday, January 14, 2011

चंद्र गोष्ट

एक होता मुलगा. तो बाबांना म्हणाला,” मला चंद्र द्या ना.” त्याच्या बाबांनी लांबलचक शिडी आणली आणि डोंगराला लावली. ती चंद्रापर्यन्त गेली. बाबा शिडीवर चढ्त चढत वर गेले. खालती कुणाचा आवाज आहे ते पाहिलं. त्यांचा मुलगा म्हणत होता, ” अरे, आकाशात खेळायला गेले बाबा.” बाबा चंद्राजवळ पोचले. चंद्र तर भलामोठ्ठा होता. बाबांना आणता येईना. मग चंद्र छोटा छोटा होत गेला. छोटा झाल्यावर बाबा चंद्र घेऊन खाली आले. मुलाला चंद्र दिला. चंद्र छोटा छोटा व्हायला लागला. पटकन मुलाच्या पोटातच गेला. मुलगा ऍ ओ ऍ ओरडायला लागला. मग चंद्राची कोर पोटातून बाहेर आली. आकाशात गेली. आकाशात गेल्यावर मोठी मोठी मोठी मोठी व्हायला लागली. मग तो भलामोठ्ठा नेहमीचा चंद्र झाला.

-----सुहृद

Saturday, October 30, 2010

स्पर्श

स्पर्श म्हणजे काय असतं ? माझ्यामते ती एक हवीहवीशी आठवण असते; आपल्यापासून कोणी दूर गेलं की येणारी.
परतीच्या गाडीत बसलं कीच कशी आजीच्या मऊ हातांच्या स्पर्शाची आठवण होते ? बाहेरगावी गेलं की कशी आपल्या पांघरुणाची आठवण येते ? कधीकधी या स्पर्शामुळे त्या अनोळखी व्यक्तीचं/वस्तूचंही आपल्याशी खूप जुनं नातं आहे असं वाटतं. खूप गोष्टींना आपण स्पर्श करतो, करुन पाहतो; त्यावेळी लक्षात येत नाही, कधीकधी आठवतही नाही. पण कधीतरी त्या स्पर्शामुळेच आपल्याला त्या व्यक्‍तीची, निसर्गाची खूप प्रकर्षाने आठवण येते. कारण ? स्पर्श माणसं जोडण्याचं काम करतो ! आपण एखाद्या व्यक्‍तीशी पटकन दोस्ती करतो, याला कारणही कधीकधी स्पर्शच असतो ! एखाद्या व्यक्तीची पिशवी आपल्याला आपल्या मैत्रिणीसारखीच वाटली, तिचा स्पर्श तसाच जाणवला तर आपण पटकन काय म्हणतो ? "तुमच्यासारखीच पिशवी माझ्या मैत्रिणीकडे आहे बरं का!" समोरची व्यक्तीही खुलते आणि संभाषणाला / गप्पांना सुरुवात होते.
आपल्या आप्तांच्या, जिवलगांच्या स्पर्शात मायेची उब जाणवते, प्रेम जाणवतं. माझ्या मोठीआईचा (माझ्या आईची आई) हात खरखरीतच पण तिने पाठीवरुन फिरवलेला हाताचा स्पर्शही उबदार, मऊसूत वाटतो, भातासारखा ! काही स्पर्श लोभावणारे असतात. पुस्तकांचा स्पर्श आणि त्यांचा वास यांनी मला वेड लागायची पाळी येते. काही स्पर्श अदृश्य असतात, पण तेच जवळचे वाटतात !
अमुक अमुक गोष्ट मनाला जाऊन स्पर्श करते असं आपण म्हणतो ते का उगाच ? असे अनेक स्पर्श आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतात. त्यावेळी त्यांची किंमत समजत नसली तरी नंतर समजते, आणि मग आपण पुन्हा भूतकाळात जातो; आठवणींच्या पलिकडे........... !

-- मुक्‍ता


(सहावी सहामाही परीक्षेत मराठीच्या उत्तरपत्रिकेत केलेले स्फुटलेखन)

Sunday, September 12, 2010

सुहृदची कविता : गणपती गणपती ये

गणपती गणपती ये SS
उंदरावर बसून ये.
गणपती गणपती ये SS
मोदक खायला ये
गणपती गणपती ये SS
मराठीतून शिकायला ये
गणपती गणपती ये SS
टीव्ही लावलाय ये
जाहिरात पाहायला ये
गणपती गणपती ये SS
गणपती गणपती ये SS

Wednesday, August 25, 2010

सुहृदच्या कविता



तापा तापा येऊ नकोस
मला भीती दाखवू नकोस
मला असा गार ठेव
माझ्या भानगडीत पडू नकोस
लाs लाs लाs
लंल लंल लाs
-----------




एक होता माणूस
त्याने खाल्ला चिवडा
सरपटत सरपटत येणारी
चकली खाल्ली
मधेच गाल फुगवणारा
लाडू खाल्ला
करंजी, काजूकतली, बाकरवडी
सगळं त्याने खाऊन टाकलं.
हैशा हुईशा हैशा
माणसाचं पोट भरलं
केवढं मोठ्ठं झालं!
पुन्हा पुन्हा फुगायला लागलं,
दुखायला लागलं.
पलंग शोधून
नीट झोपी गेला
हाताची उशी करून
नीट झोपी गेला
अशा कुठल्याही गोष्टी
खायच्या नाहीत, माणसा
लं लं लाs लै लै लाs
आई त्याची रागावली
लं लं लाs लै लै लाs
-----------



फुगे चालले गावाला
फुगे चालले गावाला
एक फुगा मडमडणारा
त्याची दोरी एवढी लांब
त्याच्या मागे ओळ झाली
सोळा सतरा फुगे चालले
लं लं लाs लै लै लाs
हा आठ मी सात
हा सहा मी पाच
हा चार मी तीन
हा दोन मी एक
हा शून्य, हा शून्य, हा शून्य
मी शून्य, मी शून्य, मी शून्य
----------


बदकराव बदकराव

खाता काय, कसे राव?

दात घासून या राव

चूळा भरा, भाव भाव


----------


मांजर मांजर भाटीबाई

उंदराला खाते पटा पटा

कुत्रा कुत्रा

मांजरीला खातो

कुत्र्याला खातो वाघ

मटा मटा
-----------

Saturday, May 15, 2010

शाळेची घंटा

आमची शाळेची घंटा आहे दुसर्‍या मजल्यावर
ती वाजली उशीरा येणारे कापती थरथर
तिचा स्वर आहे मंजूळ व सुस्वर
पण कधी इतका भयाण की वाटे जोडावे कर
शाळा सुटल्याची घंटा वाजली की सारे पळतात
मौनाची घंटा वाजली की चुपचाप बसतात
थोडक्यात म्हणजे आम्ही पाळतो तिची आज्ञा
शोभाताई म्हणतात घंटा ही आहे संज्ञा

आमची घंटा आहे लटपटी नार
आम्हाला ती आवडते फार!

Tuesday, May 11, 2010

बुंदा

लंपूला आम्ही बुंदा म्हणायला लागलो
त्याचे कारण ही कविता....

बुंदीचा लाडू , लाडू मधला बुंदा
आला आमच्याकडे
गोडू, गोडू, गोडू
पकडल्यावर म्हणतो सोडू, सोडू, सोडू

त्याला आवडतात मासे खूप
वरण-भाताबरोबर खातो तूप
वाटतं पापे घ्यावे हजार पाहून त्याचं रूप!!!!

बुंदीचा लाडू , लाडू मधला बुंदा
आला आमच्याकडे
गोडू, गोडू, गोडू
पकडल्यावर म्हणतो सोडू, सोडू, सोडू

Saturday, May 1, 2010

लंपू

लंपूसारखा भाउ मिळणं फार कठीण आहे. आणि मिळालाच तर त्याच्याशी जुळवून घेणं कठीण आहे. आधी त्याला मी आई मागून काय खाणाखूणा करते ते त्याला ते कळतच नसे, आता मात्र तो त्यात तरबेज झाला आहे. परवा तर त्याच्यामुळे मला फॅंटाची बाटली मिळाली. तेव्हापासून कधीपण हुक्की आली की तो चला आपन फॅंटा पिउया असं म्हणतो. एके दिवशी मी नी लंपू आत्याकडे झोपायला गेलो होतो. झोपायच्या वेळी तो सवयीप्रमाणे म्हणाला चला आपन फॅंटा पिउया! आदित्यला आश्चर्य वाटले कारण त्याच्या फ्रिजमधे खरच फॅंटाची बाटली होती! त्याला समजेना की याला कसे कळले?
आम्ही नवा कुकर आणला, त्याच्या खोक्यावर कुकर ठेवून आम्ही स्वयंपाक- स्वयंपाक खेळत होतो. तेव्हा साखरेचा विषय निघाला. आणि मी लंपूला "रासायनिक बदल" शिकवू लागले, " रासायनिक बदल म्हणजे साखर पांढरी होती, ती काळी झाली!!!" पण हे वाक्य त्याला शिकवायला माझा भरपूर वेळ खर्ची पडला. मी सावकाश, मोठ्यांदा हे वाक्य म्हटलं, आणि त्याला म्हणायला सांगितलं तर तो अतिशय सावकाश,विचार करत असल्याचं दाखवत म्हणाला " लाशायनिक बदल म्हनजे..." हे ऐकल्यावर मी एक शब्द सांगणार आणि तो पुन्हा म्हणणार असे करू लागलो कारण एकदा सांगून काम होत नव्हतं! " रासायनिक" " लाशायनिक" "बदल" "बदल" [ या "बदल" मधे काहीच बदल नाही!! ] "म्हणजे" "म्हनजे" अशा रितीने त्याने ते वाक्य म्हटलं. पण तेव्हड्यात बाबा आला. आणि लंपूच्या कानात पुटपुटला. आणि त्याप्रमाणे लंपू म्हणाला " हे काय शिकवतेश दुशलं काहितरी शिकव. गानं बिनं! " तेव्हापासून मी त्याला असलं काही शिकवत नाही!
औरंगाबादला एक दिवस आम्ही हॉटेल-हॉटेल खेळत होतो पहिल्यांदा लंपू व आई माझ्या हॉटेलमधे आले. तेव्हा त्यांना डोसा [ खोटा ] दिल्यावर मला तहान लागली म्हणऊन मी पाणी पित होते तोच माझ्याकडे बोट दाखवत तो म्हणाला बघ आई काका पाणी पित आहेत! [ हॉटेलमधे काकाच असतात असं सांगून मला त्याने काका व्हायला लावलं होतं आणि तो पूर्णवेळ मला काकाच म्हणत होता! ] मला खूप हसू आल्याने पाणी बाहेर येउन माझा फ्रॉक ओला झाला! जेव्हा तो हॉटेलवाला झाला तेव्हा त्याने आम्हाला खिचडी [ खोटी ] आणून दिली. नंतर १० सेकंदात येउन त्याने विचारलं " तुमचं खाउन झालं का?" आणि उत्तराची वाट न पहाता त्याने सरळ डिश [ खर्‍या ] उचलून नेल्या!
असा आहे हा लंपू. गोड, खोडकर, शिरजोर आणि हवाहवासा वाटणारा! तो असताना आम्हाला विनोदाची / केबलची चिंताच नाही! कारण तो एकटाच या सर्वाला पूरून उरेल!!!

Thursday, April 1, 2010


हा! हा! हा!

एप्रिल फूल!!!

Saturday, March 27, 2010

जिवाची मुंबई!

पाडव्याचा दिवस. आम्ही पहाटे उठून आमच्या बसची वाट पहात होतो. बस आल्यावर आम्ही आत चढलो. रस्त्यावर शेकडो गुढया आम्ही पाहिल्या. बसमधे "थ्रि ईडियट्स" सिनेमा लावल्यामुळे मी त्या कंडक्टरवर खूष होते. बांद्रा आल्यावर मी कुरकुरत उठले. कारण "थ्रि ईडियट्स" अर्धवट राहिला होता! आम्ही नंतर राजीव गांधी पुलावरून "नेहरू प्लॅनेटोरियम" ला पोचलो. आम्हाला १२ चा शो मिळाला.
तो नेमका हिंदीत होता! अर्थात हे मला शो सुरू झाल्यावर कळलं! आम्ही आत गेलो. तिथे छान ए.सी. होता. तिथे एव्हडया उन्हातून प्रवास केल्यावर झोप येणं सहाजिकच होतं. पण संपूर्ण शो पहायचा या जिद्दीने डोळे सताड उघडले. बाबा तिथे निम्मावेळ झोपूनच होता हे मला नंतर कळले! तिथे रेलायची खास सोय आहे. आपण टेकलो की त्या खुर्च्या मागे जातात. त्यातल्या काही हिंदी शब्दांना मंडळी ठरवल्या सारखी हसायची.उदा. निहारीका. निहारीका या शब्दानंतर हास्याचा धबधबा कोसळे.
नेहरू प्लॅनेटोरियम झाल्यावर पुढे म्हणजे राणीची बाग. आत जाताना सरबताच्या बाटल्या काढून घेउन त्या एका कपाटात ठेवण्याचे काम काही माणसे करत होती. आमची स्लाइस सरबताची बाटलीही त्या कपाटात सुखरूप पोचल्यावर आम्हाला आत प्रवेश मिळाला. तिथे निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तिथे झाडांमुळे बर्‍यापैकी सावली आहे . एकूण बाग छान आहे. सुहुदला आवडली.
राणीची बाग झाल्यावर आम्ही एका प्रसिद्ध पाणी-पुरीच्या दुकानात गेलो. पण ते बंद होतं म्हणून मॅक्डोनाल्डसमधे गेलो. तिथे खाउन झाल्यावर आम्ही "गेट वे ऑफ इंडिया" ला गेलो.
तिथे गेल्यावर एका बोटीत बसून फिरायला निघालो. आम्हाला वाटेवर कित्येक परदेशी दिसले. ते सर्वजण कुठेतरी जात होते. ते कुठे जातायत म्हणून वळून पाहिलं, तर ताज हॉटेल! ते बर्‍यापैकी सुस्थितीत होतं. पट्कन कुठे आग लागली होती ते कळत नव्हतं. मी बोटीत बसल्यावर मला छान वाटू लागलं. कारण आता आम्ही समुद्र सफरीला निघणार होतो. एक झटका बसला. आणि बोट लाटांचा सामना करत पुढे निघाली. खूप मनोहर दृश्य होतं. बोटीशेजारी भरपूर फेस तयार झाला होता. मला लाटांबरोबर एक जॅकेट आणि एक लाकूड जाताना दिसलं. तेव्हड्यात आमच्यासमोरून एक बोट गेली. आम्ही वळून परत जायला निघालो.परत जाताना काही छोट्या पण टुमदार बोटी दिसल्या तसं मी बाबाला त्यांच्याबद्दल विचालं. तो म्हणाला की बरेच श्रीमंत लोक अशा बोटी विकत घेतात आणि मित्रांबरोबर फिरायला वापरतात. तिथे जवळपास १०० तरी बोटी असाव्यात याचा अर्थ झाला की बहुतेक श्रीमंतांना समुद्राची आवड आहे! आम्ही बोटीतून उतरलो आणि दख्खनची राणी पकडायला निघालो. जाताना मी हट्ट करून ताज हॉटेल जवळून पाहून परतले.
स्टेशन खूप छान आहे. पण ते नीट पहायला वेळ नसल्याने मी हिरमुसून बाबामागे जाउ लागले. आमचं ए.सी.चं बुकिंग होतं. आत छान वाटत होतं. आमचा डबा स्वयंपाकघरापाशी होता. त्यामुळे खाण्याचे पदार्थ लवकर मिळाले. पुणे येईपर्यंत माझं पोट भरलं होतं. पुणे आल्यावर आम्ही उतरलो. घरी पोचल्यावर दाराशी मी सकाळी काढलेली गुढीची रांगोळी दिसली. ती पाहून मी हसले, चला उदयापासून शाळा सुरू! ही जिवाची मुंबई एकदिवस पुरे झाली!

Monday, March 8, 2010

द सिक्रेट सेव्हन

अक्षरधारातूना आणला होता संच सिक्रेट सेव्हनचा
आता तर झाला आहे अगदी जिवाभावाचा
यात आहेत जेनेट,कोलिन, जॉर्ज, पॅम, जॅक, बार्बरा व पीटर
आणि एक स्पॅनियल कुत्रा स्कॅंपर!
हे सर्व म्हणजेच सिक्रेट सेव्हन
ही आहे जगातील संघटना नंबर वन!
हा आहे पीटर जेनेटचा भाउ
हा आणतो मीटिंगला सर्वांसाठी खाउ!
हा आहे या संघटनेचा प्रमुख
साहस कसं मिळणार याची त्याला कायम असते रूखरूख!
त्यानंतर आली हि जेनेट
स्मरणशक्ती उत्तम हिची, लावा तुम्ही बेट!
एकदा पाहिलेली व्यक्ती ओळखणं हा तिच्या हातचा मळ
तिच्यामुळे सिक्रेट सेव्हनचं वाढलं आहे बळ!
आता हा जॉर्ज याला लावता येते लोकांना लाडिगोडी
पण मधे मधे बोलायची याला वाईट खोडी!
याची नि स्कॅंपरची छान जमते जोडी
दोघेही म्हणतात दोस्तीची मजा बडी!
याला येतो करता चांगला पाठलाग
फक्त मागे बघण्याचा वगळून भाग!
यानंतर आता हि विनोदी पॅम
पीटर हिला सांगत नाही फारसं काम
पण कधी कधी शोधते सुगावे छान
हिच्या निरिक्षणापुढे फसतील कित्येक महान!
आता हा कोलिन हा पण करतो पाठलाग
पण काही वेळा तो पडतो महाग!
हा आहे एकदम धाडसी वीर
वादळी रात्री जंगलात जायचा असतो याला धीर!
याला अचानक सुचतात कविता
हा आहे जणू सिक्रेट सेव्हनचा भाता!
आता हि शहाणी बार्बरा
कोणी काही सांगत असलं तर हिला वाटतं सांगावं जरा भरा भरा!
ही म्हणते बिंकी नावाच्या मुलीला वेडा ससा
काही भांडण झालं की ही रडते ढसा ढसा!
आता हा जॅक बिचारा
त्याच्या वात्रट बहिणीचा सदैव सहन करतो मारा
पण आहे हा धाडसी खरा
त्याच्याच प्रयत्नांनीच स्कॅंपर सुटून परत येतो घरा!
एकदा मात्र त्याला येतो भयानक राग
तेव्हा तो करतो सिक्रेट सेव्हनचा त्याग!
जेव्हा तो परत येतो तेव्हाच वाटते बरे
नाहितर त्याच्याविना चुकल्या चुक्ल्या सारखे होतं असते सारे!
आता हा पीटर- जेनेटचा स्कॅंपर
हा खूष होतो जेव्हा सुट्टी लागते संपून पेपर
याची जात आहे स्पॅनियल
हा अजिबात करत नाही कलकल!
सगळे काय बोलत आहेत ते समजतं त्याला
भू, भू करत म्हणतो समजलं हं मला!
याला पहाता सारेच जातात भारावून
कित्येकदा याने सिक्रेट सेव्हनला नेले आहे तारून!

अशी आहे हि सिक्रेट सेव्हन
काय आहे का नाही जगातील नंबर वन ?

Saturday, March 6, 2010

शटल

आमच्या बॅडमिंटनच्या क्लासमधे बाहेरच्या मोकळ्या जागेत मी, आस्था आणि उमा टॉस करत होतो. छान संध्याकाळ होती, अधून मधून उन डोकावत होतं. खाली खडीमुळे जरा हललो कि आवाज येत होता. आदित्य आत गेम खेळत होता त्यामुळे मी आस्था, उमा सोबत खेळत होते. शटल उमाकडे गेल्यावर उमा जोरात ओरडली "हा माझा बेस्ट शॉट!" आणि तिने शटल उडवले, ते थेट जाउन बॅडमिंटन कोर्टच्या इमारतीच्या जरा पुढे आलेल्या छतावर पडलं! आस्था लगेच ओरडली माझं नवं कोरं शटल घालवलस उमा, तू ! आम्ही लगेच आत जाउन मोठी काठी आणली. आम्हा तिघीत मी सर्वात उंच! त्यामुळे मी हातात ती अवजड काठी धरून उभी राहिले. शटल काढण्यातील सर्वात कटकटीची गोष्ट म्हणजे आपण शटल काढतो तिथून ते अजिबात दिसत नाही आणि शटल दिसावं म्हणून मागे गेलो तर काठी पोचत नाही!
आत मुलं वॉल प्रॅक्टीस करताना टयूब लाइट मधे जाउन अडकतं पण ते सहजपणे काढता येत असल्याने कुणी फारसं मनावर घेत नाही. मीही बर्‍याचवेळा शटल टयूब लाइट मधे पाठवलं आहे! पण बाहेर मात्र झाडावर / छतावर शटल अडकलं कि मुलं मनावर घेतात.
मी बर्‍याच वेळा काठी इकडून तिकडे फिरवली पण शटल काही मिळेना. मागून आस्था व उमा बेंबीच्या देठापासून ओरडत होत्या " अगं थोडं राइटला घे " ( क्लासमधील बहुतेक मुली इंग्रजी माध्यमाच्या आहेत.) मी "राइट"ला काठी नेली कि लगेच " अगं लेफ्टला घे!" असं चालू होतं! मी थोडावेळ थांबायचं सुचवलं तर उमा लगेच म्हणाली "मी आतून खुर्ची आणते" मी हताश होउन पाहू लागले. एव्हाना ती अवजड काठी पकडून चवडयावर उभ राहिल्याने पाठ ठणकत होती पण खुर्ची आणून काही उपयोग झाला नाही. तेव्हड्यात ताईंनी मला गेम खेळायला बोलावले. मी निराश आस्था व उमाकडे पाठ करून , रॅकेट घेत पळाले.

घरी जाताना मी शटल आहे का ते बघीतलं, तर ते तिथं होतं! त्याला आता कोणीच तिथून कढणार नव्हतं. ते तिथंच पडून रहाणार होतं, कायम......

Thursday, March 4, 2010

नात्यातील गुंफण

नाती वेगवेगळ्या प्रकारची असतात. आपल्या आजूबाजूलाखूप नाती दिसतात. आपण स्वताःही ती अनुभवतो. मैत्रीचं नातं तर सर्वांचचं असतं. प्रत्येकाला कोणीतरी जिवाभावाचा दोस्त असतो. परवा पेपरमधे कुणाचा तरी प्रसंग आला होता. त्या माणसाला कुणीतरी ऎनवेळी पैंशांची मदत केली होती. ते होतं माणूसकीचं नातं. माझं नि माझ्या आईचं जिवाभावाचं नातं आहे. एके दिवशी मला तिचा राग आला म्हणून मी तिला रिक्षात बसल्यावर टाटा केला नाही. रिक्षा सुरू झाली मलाच खूप वाईट वाटले आणि मी हात हलवून टा टा केला. माझं नि सुहृदचं अतूट नातं आहे. आम्ही कायम एकमेकांना मारतो, कट्टी घेतो पण शेवटी एकमेकांना मिठी मारतो. माझं नि बाबाचं रक्ताचं नातं आहे, मी अगदी त्याच्यासारखीच आहे. आम्ही दोघेही आई जोरात ओरडून धमकी देई पर्यन्त वाचत बसतो. प्रत्येकाशी माझं नातं, मी जन्मल्यापासून जोडलेलं आहे. ही एक विविध नात्यांची गुंफण माझ्याभोवती आहे आणि असणार आहे.

Friday, February 26, 2010

विदूषकी चाळे

बाबा कायम त्याची पॅंट काढून आमच्या बंकबेडच्या शिडीवर ठेवतो. त्या दिवशी देखील मला त्याची पॅंट दिसली. मला काय वाटले कुणास ठाउक! पण मी ती पॅंट घातली. खरं तर घातली पेक्षा चढवली म्हणणे योग्य ठरेल. मी ती घालताना ती दहावेळा तरी घसरली असेल !!! मग मी पॅंट खाली घसरू
नये म्हणून ती एका हातात धरून दुसर्‍या हाताने आईचा पट्टा शोधून काढला आणि कसाबसा त्या पॅंटला आधार दिला. पॅंट घसरायची थांबली. मला कोपर्‍यात बाबाचा शर्ट दिसला. मी तो शर्ट घातला. तो शर्ट मला पंजाबी-ड्रेसच्या टॉप एवढा होत होता! मग मी माझी टोपी शोधून काढली आणि ती डोक्यावर जरा तिरकी करून ठेवली. मी आरश्यासमोर जाउन जरा चेहर्‍याला रूज लावलं. नाकावर देखील रूजचा एक ठिपका दिला. पावडर शोधत असताना मला आईचे टिकलीचे पाकिट मिळाले. मग मी दोन्ही भुवयांवर त्या लावल्या, काजळ तर अगदी पाणी येइपर्यंत डोळ्यात घातले. सगळ्या मेकअप झाल्यावर मी आरशात स्वतःला न्याहाळले. मी छान दिसत होते. मजेशीर छान! मी जरा विदूषकासारखे इकडून तिकडे पळून पाहिले. काही फार अवघड नव्हतं पण फार सोपं होतं असं मुळीच नव्हतं! मुख्य म्हणजे बाबाची पॅंट ! ती दर वेळी घसरत घोट्यापर्यंत येइ आणि मग मला ती वर घ्यावी लागे!
थोडी कसरत केल्यावर मी आई जवळ गेले. तिने थोडावेळ माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाली "मुक्ता कपडे काढून ठेव, टिकल्या किती वाया घालवल्यास. छे!" मी सगळ्या टिकल्या काढल्या, कपडे कपाटात ठेवताना मला वाटलं जर वेळ आली तर मी देखील एक उत्तम विदूषक होउ शकेन!!

Monday, January 25, 2010

बोगनवेलाची गोष्ट

एक होता खलाशी. त्याचे नाव होते बोगनवाइल. तो हाउसबर्ग शहरात आपली बायको लिला हिच्यासोबत रहात असे. त्याने खलाशी धंदयातून पुष्कळ संपत्ती मिळवली होती. एक दिवस तो पुन्हा सफरीला निघाला. बोटीने किनारा सोडला व ती संथपणे दक्षिणेकडे जाउ लागली. बोगनवाइल डेकवर उभा राहून समुद्र पहात होता. सूर्योदयाचा तो सुंदर देखावा होता. बोगनवाइल त्याच्या जुन्या सफरींबद्दल विचार करत होता. एकदा तो मगरीशी झुंजला होता तर एकदा एका कासवाने त्याचा हात चावला होता, एकदा समुद्रात पडता-पडता वाचला होता तर एकदा प्रचंड आजारी पडला होता. आज मात्र तो खूप खूष होता कारण तो पुन्हा त्याच्या मित्राजवळ होता त्याच्या सागराजवळ! बोगनवाइलचे डोळे तर पाणावले.
पण दैवाचे डोहाळे काय होते?


एक काळा ढग सूर्यासमोर आला. सर्वत्र अंधार पसरला. फक्त बोटीवरील दिव्यांचा काय तो प्रकाश होता. बोगनवाइल ओरडला, ’वादळ, वादळ येतंय’. बोटीला हादरे बसू लागले, प्रवासी ओरडू लागले. सुदैवाने बोट सहीसलामत होती. पण एव्हाना ती निम्म्याहून अधिक ओली झाली होती. एक भली मोठ्ठी लाट आली व तिने एका झटक्यात सर्व दिवे मालवले. कुणालाच काहीच कळेना. सुमारे दीड-दोन तासांनी बोटा अचानक थांबली. बोगनवाइल आणि त्याचे सहकारी जरा दबकत डेकपाशी गेले. लिओनार्दो, बेसिल यांनी कुठुनतरी विजेर्‍या मिळवुन प्रकाशाची सोय केली. तरी आपण कुठल्यातरी जमिनीवर येऊन थांबलो आहोत एवढीच माहिती मिळाली. थोड्याच वेळात ढग दूर सरकला आणि सूर्याचा प्रकाश पडला. प्रवाश्यांमधे उत्साह पसरला. बोगनवाइल, लिओनार्दो, बेसिल, हेन्‍री आणि काही प्रवासी बोटीवरून उतरले. ते साधारण पंधरा मिनिटे चालले आणि अचानक थबकले. त्या जागी अनेक फुले होती. काही गुलाबी तर काही पांढरी. पण ती फुले जरा वेगळीच होती. ती एखाद्या कागदासारखी दिसत होती. त्या कागदाच्या आत रातराणीसारखी फुले होती. बोगनवाइलला ती फुले फार आवडली. त्याने दोन रोपे उचलली व एका कुंडीत लावली. ती कुंडी घेउन ते जहाजावर पोचले. ते येईपर्यंत प्रवाशांनी व इतरांनी जहाजाची डागडुजी केली होती. सर्व इंग्लंडला निघाले.

लंडनला पोचल्यावर बोगनवाइल स्वतः राणीच्या दरबारात गेला व त्याने ती रोपे राणीला दिली. तिने ही फुले कधी पाहिली नव्हती. आता या निनावी सुंदर फुलांना काय नाव दयावे असा प्रश्न राणीला पडला. यावर सात दिवस चर्चा झाली व शेवटी बोगनवाइलच्या सन्मानार्थ त्या झाडाला बोगनवेल नाव देण्यात आले. राणी बोगनवाइलवर फार खूष झाली. तिने त्याला प्रमुख खलाशी म्हणून नियुक्त केलं व नौदल त्याच्या ताब्यात दिलं. बोगनवाइलने २० वर्षे काम केलं व पुढे तो निवृत्त होऊन आपली दोन मुलं, लिलासोबत हाउसबर्ग येथे राहू लागला.

Saturday, January 16, 2010

श्रुतलेखन असंच करतात ना?

आज वर्गात ताई २४ ताशी घडयाळाबद्दल बोलत होत्या. नंतर आम्हाला त्यांनी श्रुतलेखन घातलं आणि यातून ताईंनापण लिहायचा कंटाळा येतो हे सुरुवातीलाच समजले. ताई श्रुतलेखन बघत-बघत माझ्यापर्यंत आल्या, मी त्यांना वही दिली. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिले आणि ३ सेकंदानंतर मी वर्गाबाहेर होते.

मी तर सगळं व्यवस्थित लिहिलं होतं!
तुम्हीच बघा!


२४ ताशी घडयाळ
काही ठिकाणी कंस रेल्वे ऑब्लिक विमान वेळ कंस पूर्ण बारा-बारा, बारा-बारा दोनदा लिहा. तासांच्या ऐवजी चोवीस नीहार गप्प बस ताशी दिवस मानला जातो पूर्णविराम आता खालच्या ओळीवर लिहा रात्रीचा एक ते दुपारचे बारा एरवी प्रमाणे किंवा नेहमी प्रमाणे आता खालच्या ओळीवर लिहा दुपारचा एक म्हणजे दु. एक बरोबर तेरा विश्वभारती बोलू नकोस दु. दोन बरोबर चौदा स्वल्पविराम दु. तीन बरोबर पंधरा आता मधे डॉट डॉट दया मिहीर ते आत ठेव आणि नंतर लिहा रात्रीचे बारा बरोबर चोवीस चला वह्या मला दाखवा.


बरोबर आहे ना? आता यात काही चिडण्यासारखं होतं का? ताई जे बोलल्या तेच लिहायचं असतं ना?
श्रुतलेखन असंच करतात ना?

Friday, January 15, 2010

माझा अभ्यास

मला ना काही समजतच नाही. आज मराठीच्या तासाला ताई काहीतरी वाकचार का वाकप्रचाराबद्द्ल बोलत होत्या. ते वाकप्रचार का वाकचार सहा होते एव्हडं नक्की. आणि हो तेव्हा साडेदहा वाजले होते, ताईंनी निळा- पांढरा ड्रेस घातला होता. आणि आता गृहपाठ दिला आहे कि प्रत्येकी एक वाक्य बनवून आण. मी लिहून घेतले आहेत ते वाकचार पण अर्थ काही लागत नाही. कोंबडे झुंजवणे... म्हणजे काय? बहुतेक दोन कोंबडे आणून त्यांची मारामारी बघणे! हा! जमलं!
आता वाक्य काय सोप्प! मी आणि नीरजाने कोंबडे झुंजवले. दुसरं, कान फुंकणे म्हणजे कानात हवा सोडणे! मी रमाचे कान फुंकल्यावर तिला गुदगुल्या झाल्या!
आपलेच घोडे दामटणे...स्वतःचे घोडे घेऊन पळवणे वाक्यं - मला आपलेच घोडे दामटता येत नसल्याने मला त्याचा क्लास लावायचा आहे. आता चौथं काय आहे?
डोळेझाक करणे? सोप्पं! मी झोपल्यावर डोळे झाक करते. आता डोक्यावर बसवणे काय? मला बाबाच्या डोक्यावर बसून पंखा साफ करता येतो. वा! काय हुशार आहे मी! किती पटकन जमलं मला! आता लास्ट, नाक खुपसणे ......... छे! काहीच समजत नाही... हा! आत्ता ट्यूब पेटली! अर्थ लिहायचा नाही, तर वाक्य लिहायचं आहे! मला नाक खुपसणेचा अर्थच समजला नाही!
आई मी चालले खेळायला! बाय!

Monday, January 4, 2010

आजार

तशी माझी तब्येत अगदी तंदुरुस्त आहे. माझ्यामते माझे पेशीसैन्य रोगांशी लढण्यास सक्षम आहे. त्यांच्याबद्‍दल विचार केला की माझ्यासमोर लाल-पांढरे विचित्र लोक, हिरव्या विचित्र शत्रूशी सामना करत आहेत असे दृश्य उभे राहतो. अशा या लाल-पांढर्‍या विचित्र सैनिकमित्रांसाठी मी दररोज सर्व अन्नघटक घेण्याचा प्रयत्‍न करते.
माझ्याजवळ आजार सहसा फिरकत नाहीत. ज्याची साथ आली आहे व तो मला झालाय असा एकच रोग आहे, "कांजिण्या". कधी हिवाळ्यात सर्दी, खोकला येऊन अधूनमधून हजेरी लावतात. उन्हाळ्यात कधी ताप येऊन पलंगावरुन उठू देत नाही पण याचे वार्षिक प्रमाण कमीच. एकदा हिवाळ्यात आईस्क्रीम खाऊनही खोकला मला शिवला नाही हे पाहून आईने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. (अर्थात बोटांना लागलेले आईस्क्रीम चोखण्यासाठी नव्हे.)
गेल्या दोन-तीन वर्षात विचार करता यावा असा आजारच झालेला नाहीये मला. पण १ली-२री मध्ये असताना मला धम्माल यायची. माझ्यामते आजार ही पुन्हा लहान होण्याची संधी आहे. सगळे आपल्याजवळ येऊन बसतात. बाबाने तर हज्जारदा हॅरी पॉटरच्या १ल्या भागाच्या मराठी अनुवादाला बेक्कार म्हंटले असूनही तेच पुस्तक पुन्हा वाचून दाखवायला तयार!. आजारी पडली असं आईने सांगितलं की तिथे आज्या-मावश्यांची बॅग भरायला सुरुवात. एक दिवस आजी येऊन धडकते मग चिवडा काय, लाडू काय नुसती धम्माल!
तेव्हा मी पहिलीत होते. मी फ्रॉक घालून आईजवळ गेले. तिने चेन लावायला हात पुढे केला तर तिला हाताला काहीतरी लागले. तो होता एक फोड!
त्यादिवशी आईने तू शाळेत जाऊ नकोस असे सांगितले तेव्हापासून मी बाबाच्या फोनची वाट पाहत होते. कारण एकदा खूप पाऊस होता म्हणून आईने मला शाळेत पाठवायला बंदी केली होती तेव्हा बाबाने फोन करून सांगितले होते की शाळेत पाठव, फार पाऊस नाही. पण अपेक्षेप्रमाणे बाबाचा फोन आला नाही. आई एका दुष्ट राक्षसासारखी माझ्या शिक्षणाच्या मध्ये येतीय असा विचार माझ्या मनात आला. पण आई बाहेर जाऊन माझ्यासाठी पुस्तके घेऊन आली तेव्हा माझा राग पळून गेला. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर कळाले की मला कांजिण्या झाल्या आहेत. तेव्हा मला बिचारीला ’कांजिण्या’ असे म्हणताही येत नव्हते. मी त्याला ’कानिण्या’ म्हणायचे.
आजारपण एकदाचे गेले. पण दुसरीच भीती छळू लागली. ते म्हणजे माझी जवळजवळ महिन्याभराची रजा आणि तेव्हा दिलेले गृहपाठ ! मला एका पुस्तकांच्या ढिगार्‍यात मी अभ्यास करत असल्याची स्वप्ने पडू लागली. मी अभ्यासापासून दूर पळण्याच्या नादात झोपेत आईला लाथा मारायचे. आणि मी स्वप्नात लाथा मारल्या की सर्व पुस्तके माझ्या अंगावर पडायची आणि मी भोकाड पसरायचे. या प्रकाराला आई जाम वैतागली होती. पण शाळेत गेल्यावर सर्वांनी सांगितले की खूप मुले रजा असल्याने गृहपाठच दिला नव्हता.
मला एक भलामोठ्ठा दगड डोक्यावरुन उतरल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी फारशी कधी आजारी पडले नसल्याने तो दगड अजून पुन्हा चढलेला नाही. पण त्याचा मेल्याचा काही नेम नाही.

Friday, October 2, 2009

गडबड-गोंधळ


आई म्हणते लाल तर बाबा म्हणतो निळा
आता मी बिचारीने कोणता फ्रॉक घालावा?
आदित्य म्हणतो क्रिकेट तर सुह्रद म्हणतो लपाछपी
आता मी काय खेळू म्हणता तुम्ही?
आत्या म्हणते सिनेमा तर आजी म्हणते नाटकाला जावं
आता मला सांगा मी यातलं काय बघावं?
खरं तर मला वाटतंय मी आत्ता काहीतरी खावं
पण यांना हे कुणी सांगावं?

Thursday, October 1, 2009

Cat and Rat

There is one rat
He likes to sleep on mat
One day he is playing with a bat
and there comes a pusy cat
Ran away the rat
but poor cat
it slipped and fell on mat
Turned around the rat
and now it is going to trouble the cat!

Thursday, September 3, 2009

त्या दिवशी मी खूप घाबरले...


माझा स्वभाव तसा भित्रा नाही. पण मी कधी घाबरतच नाही असेही नाही.
पण एकदा मात्र मी जाम घाबरले होते. याचे कारण हे की मिट्ट काळोख होता.
तुम्ही म्हणाल काळोख होता तर काय त्यात घाबरायची काय गोष्ट ? तो तर
कायमच असतो !
मी पण आता असेच म्हणते पण ३ रीत असताना मी अंधाराला फार घाबरायचे,
१०-११ नंतरच्या काळोखाला तर फारच! त्यादिवशी पण तसंच झालं होतं.
मला खूपच भीती वाटली होती. ऐका तर मग !
११-१२ ची वेळ होती. आईने मला सुहृदसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात
पाठवलं. मी पेला घेऊन पाणी भरत असताना माझं लक्ष स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेलं.
बहुधा अमावस्या असावी कारण चंद्राचा प्रकाश मुळीच नव्हता. अचानक मला संध्याकाळी, ’मस्त आहे!’ म्हणून दोनदा वाचलेली शेरलॉक होम्स ची सोनेरी चष्म्याचे रहस्य गोष्ट आठवली.
एक बाई रात्रीच्या सुमारास विलबी नावाच्या एका तरुणाच्या पाठीत चाकू घालून त्याला मारते अशी काहीतरी गोष्ट होती. पण तिचा परिणाम असा झाला की मी खिडकीकडे पाठ केली व मला अचानक कोणीतरी त्या बाईसारखी खिडकीतून उडी मारल्याचा भास झाला. मी जाम घाबरले. पेला तसाच खालीच टाकून भीतीने थरथरत मी झोपायची खोली गाठून आईला मिठी मारली.


आता तो प्रसंग आठवला की मनमुराद हसते.
पण तेव्हापासून मी संध्याकाळच्या नंतर रहस्यकथा वाचत नाही.

Wednesday, September 2, 2009

चित्र

लाल रंगाची काढली शाल
पाहिली होती दुपारी काल
पिवळ्या रंगाचं परकर पोलकं
गळ्यात काढलं एक ढोलकं
हिरव्या रंगाची मुलगी छान जमली
अशा रंगाची मुलगी होती माझ्या मनावर बिंबली
काळ्या रंगाचे मग लांबसडक केस
ही तर होती अर्जंट केस
नंतर मुलगी इतकी छान दिसली
ती पाहून आई खुद्कन हसली
मी म्हणाले नाही का आवडला मुलीचा रंग?
तर आई म्हणाली छे बाई छान उधळले आहेस रंग!

अफजलखान

मी आणतो उचलला विडा
विजापूरहून निघाला सरदार बडा
खूप सैन्यानिशी आला चालून
त्याला वाटले शिवाजीला टाकले पाहिजे मारुन
खान होता सरदार वाईचा
त्याला माहित होता सर्व मुलुख वाईचा
महाराज तडक प्रतापगडावर गेले
खानाला वाटले महाराज घाबरले
खोटे सांगून महाराजांनी खानाला खेचून आणले
भेटीच्या दिवशी त्याला ठार केले
नंतर त्याचे प्रतापगडावर दफन करण्यात आले
स्वराज्याची प्रगती पाहून जिजाईला धन्य धन्य झाले

Wednesday, August 26, 2009

मी कोण ?

कधी मी असते झाड
कधी होऊन जाते माड
कधी असते सुंदर फूल
कधी होते कानातील डूल
कधी होते मोठ्या लाटा
कधी होते असंख्य वाटा
नंतर कधीतरी लक्षात येते
’मी माणूस आहे’ मी म्हणते...

Sunday, August 23, 2009

कर्ण

जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघाला
तेव्हा ऋषींच्या वेषात इंद्र कर्णाकडे निघाला
कर्णाकडे होती शक्तिशाली कुंडले
जेव्हा ती मागितली इंद्राने, सर्वांचे तेव्हा बोलणेच खुंटले.


पण कर्ण होता दानशूर स्वभावाचा
पाठवायचा नाही तो कुणाला रिकाम्या हाताचा
सूर्याने त्याला हे सांगितले होते आधी
कर्ण म्हणाला मी असं करत नाही कधी
कर्णाने कवचकुंडले अर्पण केली.
इंद्राची मुद्रा आनंदित झाली.


कर्णाचे जीवन संपले दुसर्‍याच दिवशी
कुंती मात्र रडत होती मूकपणे मनाशी

वीर अंगद

वीर अंगद

अंगद होता उभा पाय पुढे करून
सरदार सर्व उभे होते जरा मागे सरकून
ते पाहून आला रावणाला राग
घाबरून सरदारांनी केला आपल्या अब्रूचा त्याग

एक एक सरदार त्याचा हलवू लागला पाय
अंगदाचा पाय इतक्या लवकर हलेल काय ?
सर्वांनी श्वास रोखला, जेव्हा रावण उठला
अंगदाच्या जवळ जेव्हा येऊन पोचला

रावण खाली वाकल्यावर, अंगद त्याला म्हणाला
मुकाट्याने शरण ये हे सांगायला आलो आहे तुला
अंगदाने झट्कन हात मुकुटापाशी नेला
उचलला रावणाचा मुकुट आणि दूर फेकून दिला

हनुमानाने नंतर तो हवेतच झेलला
अखेर युद्‍धात रामच जिंकला