Saturday, October 30, 2010

स्पर्श

स्पर्श म्हणजे काय असतं ? माझ्यामते ती एक हवीहवीशी आठवण असते; आपल्यापासून कोणी दूर गेलं की येणारी.
परतीच्या गाडीत बसलं कीच कशी आजीच्या मऊ हातांच्या स्पर्शाची आठवण होते ? बाहेरगावी गेलं की कशी आपल्या पांघरुणाची आठवण येते ? कधीकधी या स्पर्शामुळे त्या अनोळखी व्यक्तीचं/वस्तूचंही आपल्याशी खूप जुनं नातं आहे असं वाटतं. खूप गोष्टींना आपण स्पर्श करतो, करुन पाहतो; त्यावेळी लक्षात येत नाही, कधीकधी आठवतही नाही. पण कधीतरी त्या स्पर्शामुळेच आपल्याला त्या व्यक्‍तीची, निसर्गाची खूप प्रकर्षाने आठवण येते. कारण ? स्पर्श माणसं जोडण्याचं काम करतो ! आपण एखाद्या व्यक्‍तीशी पटकन दोस्ती करतो, याला कारणही कधीकधी स्पर्शच असतो ! एखाद्या व्यक्तीची पिशवी आपल्याला आपल्या मैत्रिणीसारखीच वाटली, तिचा स्पर्श तसाच जाणवला तर आपण पटकन काय म्हणतो ? "तुमच्यासारखीच पिशवी माझ्या मैत्रिणीकडे आहे बरं का!" समोरची व्यक्तीही खुलते आणि संभाषणाला / गप्पांना सुरुवात होते.
आपल्या आप्तांच्या, जिवलगांच्या स्पर्शात मायेची उब जाणवते, प्रेम जाणवतं. माझ्या मोठीआईचा (माझ्या आईची आई) हात खरखरीतच पण तिने पाठीवरुन फिरवलेला हाताचा स्पर्शही उबदार, मऊसूत वाटतो, भातासारखा ! काही स्पर्श लोभावणारे असतात. पुस्तकांचा स्पर्श आणि त्यांचा वास यांनी मला वेड लागायची पाळी येते. काही स्पर्श अदृश्य असतात, पण तेच जवळचे वाटतात !
अमुक अमुक गोष्ट मनाला जाऊन स्पर्श करते असं आपण म्हणतो ते का उगाच ? असे अनेक स्पर्श आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतात. त्यावेळी त्यांची किंमत समजत नसली तरी नंतर समजते, आणि मग आपण पुन्हा भूतकाळात जातो; आठवणींच्या पलिकडे........... !

-- मुक्‍ता


(सहावी सहामाही परीक्षेत मराठीच्या उत्तरपत्रिकेत केलेले स्फुटलेखन)

Sunday, September 12, 2010

सुहृदची कविता : गणपती गणपती ये

गणपती गणपती ये SS
उंदरावर बसून ये.
गणपती गणपती ये SS
मोदक खायला ये
गणपती गणपती ये SS
मराठीतून शिकायला ये
गणपती गणपती ये SS
टीव्ही लावलाय ये
जाहिरात पाहायला ये
गणपती गणपती ये SS
गणपती गणपती ये SS

Wednesday, August 25, 2010

सुहृदच्या कविता



तापा तापा येऊ नकोस
मला भीती दाखवू नकोस
मला असा गार ठेव
माझ्या भानगडीत पडू नकोस
लाs लाs लाs
लंल लंल लाs
-----------




एक होता माणूस
त्याने खाल्ला चिवडा
सरपटत सरपटत येणारी
चकली खाल्ली
मधेच गाल फुगवणारा
लाडू खाल्ला
करंजी, काजूकतली, बाकरवडी
सगळं त्याने खाऊन टाकलं.
हैशा हुईशा हैशा
माणसाचं पोट भरलं
केवढं मोठ्ठं झालं!
पुन्हा पुन्हा फुगायला लागलं,
दुखायला लागलं.
पलंग शोधून
नीट झोपी गेला
हाताची उशी करून
नीट झोपी गेला
अशा कुठल्याही गोष्टी
खायच्या नाहीत, माणसा
लं लं लाs लै लै लाs
आई त्याची रागावली
लं लं लाs लै लै लाs
-----------



फुगे चालले गावाला
फुगे चालले गावाला
एक फुगा मडमडणारा
त्याची दोरी एवढी लांब
त्याच्या मागे ओळ झाली
सोळा सतरा फुगे चालले
लं लं लाs लै लै लाs
हा आठ मी सात
हा सहा मी पाच
हा चार मी तीन
हा दोन मी एक
हा शून्य, हा शून्य, हा शून्य
मी शून्य, मी शून्य, मी शून्य
----------


बदकराव बदकराव

खाता काय, कसे राव?

दात घासून या राव

चूळा भरा, भाव भाव


----------


मांजर मांजर भाटीबाई

उंदराला खाते पटा पटा

कुत्रा कुत्रा

मांजरीला खातो

कुत्र्याला खातो वाघ

मटा मटा
-----------

Saturday, May 15, 2010

शाळेची घंटा

आमची शाळेची घंटा आहे दुसर्‍या मजल्यावर
ती वाजली उशीरा येणारे कापती थरथर
तिचा स्वर आहे मंजूळ व सुस्वर
पण कधी इतका भयाण की वाटे जोडावे कर
शाळा सुटल्याची घंटा वाजली की सारे पळतात
मौनाची घंटा वाजली की चुपचाप बसतात
थोडक्यात म्हणजे आम्ही पाळतो तिची आज्ञा
शोभाताई म्हणतात घंटा ही आहे संज्ञा

आमची घंटा आहे लटपटी नार
आम्हाला ती आवडते फार!

Tuesday, May 11, 2010

बुंदा

लंपूला आम्ही बुंदा म्हणायला लागलो
त्याचे कारण ही कविता....

बुंदीचा लाडू , लाडू मधला बुंदा
आला आमच्याकडे
गोडू, गोडू, गोडू
पकडल्यावर म्हणतो सोडू, सोडू, सोडू

त्याला आवडतात मासे खूप
वरण-भाताबरोबर खातो तूप
वाटतं पापे घ्यावे हजार पाहून त्याचं रूप!!!!

बुंदीचा लाडू , लाडू मधला बुंदा
आला आमच्याकडे
गोडू, गोडू, गोडू
पकडल्यावर म्हणतो सोडू, सोडू, सोडू

Saturday, May 1, 2010

लंपू

लंपूसारखा भाउ मिळणं फार कठीण आहे. आणि मिळालाच तर त्याच्याशी जुळवून घेणं कठीण आहे. आधी त्याला मी आई मागून काय खाणाखूणा करते ते त्याला ते कळतच नसे, आता मात्र तो त्यात तरबेज झाला आहे. परवा तर त्याच्यामुळे मला फॅंटाची बाटली मिळाली. तेव्हापासून कधीपण हुक्की आली की तो चला आपन फॅंटा पिउया असं म्हणतो. एके दिवशी मी नी लंपू आत्याकडे झोपायला गेलो होतो. झोपायच्या वेळी तो सवयीप्रमाणे म्हणाला चला आपन फॅंटा पिउया! आदित्यला आश्चर्य वाटले कारण त्याच्या फ्रिजमधे खरच फॅंटाची बाटली होती! त्याला समजेना की याला कसे कळले?
आम्ही नवा कुकर आणला, त्याच्या खोक्यावर कुकर ठेवून आम्ही स्वयंपाक- स्वयंपाक खेळत होतो. तेव्हा साखरेचा विषय निघाला. आणि मी लंपूला "रासायनिक बदल" शिकवू लागले, " रासायनिक बदल म्हणजे साखर पांढरी होती, ती काळी झाली!!!" पण हे वाक्य त्याला शिकवायला माझा भरपूर वेळ खर्ची पडला. मी सावकाश, मोठ्यांदा हे वाक्य म्हटलं, आणि त्याला म्हणायला सांगितलं तर तो अतिशय सावकाश,विचार करत असल्याचं दाखवत म्हणाला " लाशायनिक बदल म्हनजे..." हे ऐकल्यावर मी एक शब्द सांगणार आणि तो पुन्हा म्हणणार असे करू लागलो कारण एकदा सांगून काम होत नव्हतं! " रासायनिक" " लाशायनिक" "बदल" "बदल" [ या "बदल" मधे काहीच बदल नाही!! ] "म्हणजे" "म्हनजे" अशा रितीने त्याने ते वाक्य म्हटलं. पण तेव्हड्यात बाबा आला. आणि लंपूच्या कानात पुटपुटला. आणि त्याप्रमाणे लंपू म्हणाला " हे काय शिकवतेश दुशलं काहितरी शिकव. गानं बिनं! " तेव्हापासून मी त्याला असलं काही शिकवत नाही!
औरंगाबादला एक दिवस आम्ही हॉटेल-हॉटेल खेळत होतो पहिल्यांदा लंपू व आई माझ्या हॉटेलमधे आले. तेव्हा त्यांना डोसा [ खोटा ] दिल्यावर मला तहान लागली म्हणऊन मी पाणी पित होते तोच माझ्याकडे बोट दाखवत तो म्हणाला बघ आई काका पाणी पित आहेत! [ हॉटेलमधे काकाच असतात असं सांगून मला त्याने काका व्हायला लावलं होतं आणि तो पूर्णवेळ मला काकाच म्हणत होता! ] मला खूप हसू आल्याने पाणी बाहेर येउन माझा फ्रॉक ओला झाला! जेव्हा तो हॉटेलवाला झाला तेव्हा त्याने आम्हाला खिचडी [ खोटी ] आणून दिली. नंतर १० सेकंदात येउन त्याने विचारलं " तुमचं खाउन झालं का?" आणि उत्तराची वाट न पहाता त्याने सरळ डिश [ खर्‍या ] उचलून नेल्या!
असा आहे हा लंपू. गोड, खोडकर, शिरजोर आणि हवाहवासा वाटणारा! तो असताना आम्हाला विनोदाची / केबलची चिंताच नाही! कारण तो एकटाच या सर्वाला पूरून उरेल!!!

Thursday, April 1, 2010


हा! हा! हा!

एप्रिल फूल!!!

Saturday, March 27, 2010

जिवाची मुंबई!

पाडव्याचा दिवस. आम्ही पहाटे उठून आमच्या बसची वाट पहात होतो. बस आल्यावर आम्ही आत चढलो. रस्त्यावर शेकडो गुढया आम्ही पाहिल्या. बसमधे "थ्रि ईडियट्स" सिनेमा लावल्यामुळे मी त्या कंडक्टरवर खूष होते. बांद्रा आल्यावर मी कुरकुरत उठले. कारण "थ्रि ईडियट्स" अर्धवट राहिला होता! आम्ही नंतर राजीव गांधी पुलावरून "नेहरू प्लॅनेटोरियम" ला पोचलो. आम्हाला १२ चा शो मिळाला.
तो नेमका हिंदीत होता! अर्थात हे मला शो सुरू झाल्यावर कळलं! आम्ही आत गेलो. तिथे छान ए.सी. होता. तिथे एव्हडया उन्हातून प्रवास केल्यावर झोप येणं सहाजिकच होतं. पण संपूर्ण शो पहायचा या जिद्दीने डोळे सताड उघडले. बाबा तिथे निम्मावेळ झोपूनच होता हे मला नंतर कळले! तिथे रेलायची खास सोय आहे. आपण टेकलो की त्या खुर्च्या मागे जातात. त्यातल्या काही हिंदी शब्दांना मंडळी ठरवल्या सारखी हसायची.उदा. निहारीका. निहारीका या शब्दानंतर हास्याचा धबधबा कोसळे.
नेहरू प्लॅनेटोरियम झाल्यावर पुढे म्हणजे राणीची बाग. आत जाताना सरबताच्या बाटल्या काढून घेउन त्या एका कपाटात ठेवण्याचे काम काही माणसे करत होती. आमची स्लाइस सरबताची बाटलीही त्या कपाटात सुखरूप पोचल्यावर आम्हाला आत प्रवेश मिळाला. तिथे निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तिथे झाडांमुळे बर्‍यापैकी सावली आहे . एकूण बाग छान आहे. सुहुदला आवडली.
राणीची बाग झाल्यावर आम्ही एका प्रसिद्ध पाणी-पुरीच्या दुकानात गेलो. पण ते बंद होतं म्हणून मॅक्डोनाल्डसमधे गेलो. तिथे खाउन झाल्यावर आम्ही "गेट वे ऑफ इंडिया" ला गेलो.
तिथे गेल्यावर एका बोटीत बसून फिरायला निघालो. आम्हाला वाटेवर कित्येक परदेशी दिसले. ते सर्वजण कुठेतरी जात होते. ते कुठे जातायत म्हणून वळून पाहिलं, तर ताज हॉटेल! ते बर्‍यापैकी सुस्थितीत होतं. पट्कन कुठे आग लागली होती ते कळत नव्हतं. मी बोटीत बसल्यावर मला छान वाटू लागलं. कारण आता आम्ही समुद्र सफरीला निघणार होतो. एक झटका बसला. आणि बोट लाटांचा सामना करत पुढे निघाली. खूप मनोहर दृश्य होतं. बोटीशेजारी भरपूर फेस तयार झाला होता. मला लाटांबरोबर एक जॅकेट आणि एक लाकूड जाताना दिसलं. तेव्हड्यात आमच्यासमोरून एक बोट गेली. आम्ही वळून परत जायला निघालो.परत जाताना काही छोट्या पण टुमदार बोटी दिसल्या तसं मी बाबाला त्यांच्याबद्दल विचालं. तो म्हणाला की बरेच श्रीमंत लोक अशा बोटी विकत घेतात आणि मित्रांबरोबर फिरायला वापरतात. तिथे जवळपास १०० तरी बोटी असाव्यात याचा अर्थ झाला की बहुतेक श्रीमंतांना समुद्राची आवड आहे! आम्ही बोटीतून उतरलो आणि दख्खनची राणी पकडायला निघालो. जाताना मी हट्ट करून ताज हॉटेल जवळून पाहून परतले.
स्टेशन खूप छान आहे. पण ते नीट पहायला वेळ नसल्याने मी हिरमुसून बाबामागे जाउ लागले. आमचं ए.सी.चं बुकिंग होतं. आत छान वाटत होतं. आमचा डबा स्वयंपाकघरापाशी होता. त्यामुळे खाण्याचे पदार्थ लवकर मिळाले. पुणे येईपर्यंत माझं पोट भरलं होतं. पुणे आल्यावर आम्ही उतरलो. घरी पोचल्यावर दाराशी मी सकाळी काढलेली गुढीची रांगोळी दिसली. ती पाहून मी हसले, चला उदयापासून शाळा सुरू! ही जिवाची मुंबई एकदिवस पुरे झाली!

Monday, March 8, 2010

द सिक्रेट सेव्हन

अक्षरधारातूना आणला होता संच सिक्रेट सेव्हनचा
आता तर झाला आहे अगदी जिवाभावाचा
यात आहेत जेनेट,कोलिन, जॉर्ज, पॅम, जॅक, बार्बरा व पीटर
आणि एक स्पॅनियल कुत्रा स्कॅंपर!
हे सर्व म्हणजेच सिक्रेट सेव्हन
ही आहे जगातील संघटना नंबर वन!
हा आहे पीटर जेनेटचा भाउ
हा आणतो मीटिंगला सर्वांसाठी खाउ!
हा आहे या संघटनेचा प्रमुख
साहस कसं मिळणार याची त्याला कायम असते रूखरूख!
त्यानंतर आली हि जेनेट
स्मरणशक्ती उत्तम हिची, लावा तुम्ही बेट!
एकदा पाहिलेली व्यक्ती ओळखणं हा तिच्या हातचा मळ
तिच्यामुळे सिक्रेट सेव्हनचं वाढलं आहे बळ!
आता हा जॉर्ज याला लावता येते लोकांना लाडिगोडी
पण मधे मधे बोलायची याला वाईट खोडी!
याची नि स्कॅंपरची छान जमते जोडी
दोघेही म्हणतात दोस्तीची मजा बडी!
याला येतो करता चांगला पाठलाग
फक्त मागे बघण्याचा वगळून भाग!
यानंतर आता हि विनोदी पॅम
पीटर हिला सांगत नाही फारसं काम
पण कधी कधी शोधते सुगावे छान
हिच्या निरिक्षणापुढे फसतील कित्येक महान!
आता हा कोलिन हा पण करतो पाठलाग
पण काही वेळा तो पडतो महाग!
हा आहे एकदम धाडसी वीर
वादळी रात्री जंगलात जायचा असतो याला धीर!
याला अचानक सुचतात कविता
हा आहे जणू सिक्रेट सेव्हनचा भाता!
आता हि शहाणी बार्बरा
कोणी काही सांगत असलं तर हिला वाटतं सांगावं जरा भरा भरा!
ही म्हणते बिंकी नावाच्या मुलीला वेडा ससा
काही भांडण झालं की ही रडते ढसा ढसा!
आता हा जॅक बिचारा
त्याच्या वात्रट बहिणीचा सदैव सहन करतो मारा
पण आहे हा धाडसी खरा
त्याच्याच प्रयत्नांनीच स्कॅंपर सुटून परत येतो घरा!
एकदा मात्र त्याला येतो भयानक राग
तेव्हा तो करतो सिक्रेट सेव्हनचा त्याग!
जेव्हा तो परत येतो तेव्हाच वाटते बरे
नाहितर त्याच्याविना चुकल्या चुक्ल्या सारखे होतं असते सारे!
आता हा पीटर- जेनेटचा स्कॅंपर
हा खूष होतो जेव्हा सुट्टी लागते संपून पेपर
याची जात आहे स्पॅनियल
हा अजिबात करत नाही कलकल!
सगळे काय बोलत आहेत ते समजतं त्याला
भू, भू करत म्हणतो समजलं हं मला!
याला पहाता सारेच जातात भारावून
कित्येकदा याने सिक्रेट सेव्हनला नेले आहे तारून!

अशी आहे हि सिक्रेट सेव्हन
काय आहे का नाही जगातील नंबर वन ?

Saturday, March 6, 2010

शटल

आमच्या बॅडमिंटनच्या क्लासमधे बाहेरच्या मोकळ्या जागेत मी, आस्था आणि उमा टॉस करत होतो. छान संध्याकाळ होती, अधून मधून उन डोकावत होतं. खाली खडीमुळे जरा हललो कि आवाज येत होता. आदित्य आत गेम खेळत होता त्यामुळे मी आस्था, उमा सोबत खेळत होते. शटल उमाकडे गेल्यावर उमा जोरात ओरडली "हा माझा बेस्ट शॉट!" आणि तिने शटल उडवले, ते थेट जाउन बॅडमिंटन कोर्टच्या इमारतीच्या जरा पुढे आलेल्या छतावर पडलं! आस्था लगेच ओरडली माझं नवं कोरं शटल घालवलस उमा, तू ! आम्ही लगेच आत जाउन मोठी काठी आणली. आम्हा तिघीत मी सर्वात उंच! त्यामुळे मी हातात ती अवजड काठी धरून उभी राहिले. शटल काढण्यातील सर्वात कटकटीची गोष्ट म्हणजे आपण शटल काढतो तिथून ते अजिबात दिसत नाही आणि शटल दिसावं म्हणून मागे गेलो तर काठी पोचत नाही!
आत मुलं वॉल प्रॅक्टीस करताना टयूब लाइट मधे जाउन अडकतं पण ते सहजपणे काढता येत असल्याने कुणी फारसं मनावर घेत नाही. मीही बर्‍याचवेळा शटल टयूब लाइट मधे पाठवलं आहे! पण बाहेर मात्र झाडावर / छतावर शटल अडकलं कि मुलं मनावर घेतात.
मी बर्‍याच वेळा काठी इकडून तिकडे फिरवली पण शटल काही मिळेना. मागून आस्था व उमा बेंबीच्या देठापासून ओरडत होत्या " अगं थोडं राइटला घे " ( क्लासमधील बहुतेक मुली इंग्रजी माध्यमाच्या आहेत.) मी "राइट"ला काठी नेली कि लगेच " अगं लेफ्टला घे!" असं चालू होतं! मी थोडावेळ थांबायचं सुचवलं तर उमा लगेच म्हणाली "मी आतून खुर्ची आणते" मी हताश होउन पाहू लागले. एव्हाना ती अवजड काठी पकडून चवडयावर उभ राहिल्याने पाठ ठणकत होती पण खुर्ची आणून काही उपयोग झाला नाही. तेव्हड्यात ताईंनी मला गेम खेळायला बोलावले. मी निराश आस्था व उमाकडे पाठ करून , रॅकेट घेत पळाले.

घरी जाताना मी शटल आहे का ते बघीतलं, तर ते तिथं होतं! त्याला आता कोणीच तिथून कढणार नव्हतं. ते तिथंच पडून रहाणार होतं, कायम......

Thursday, March 4, 2010

नात्यातील गुंफण

नाती वेगवेगळ्या प्रकारची असतात. आपल्या आजूबाजूलाखूप नाती दिसतात. आपण स्वताःही ती अनुभवतो. मैत्रीचं नातं तर सर्वांचचं असतं. प्रत्येकाला कोणीतरी जिवाभावाचा दोस्त असतो. परवा पेपरमधे कुणाचा तरी प्रसंग आला होता. त्या माणसाला कुणीतरी ऎनवेळी पैंशांची मदत केली होती. ते होतं माणूसकीचं नातं. माझं नि माझ्या आईचं जिवाभावाचं नातं आहे. एके दिवशी मला तिचा राग आला म्हणून मी तिला रिक्षात बसल्यावर टाटा केला नाही. रिक्षा सुरू झाली मलाच खूप वाईट वाटले आणि मी हात हलवून टा टा केला. माझं नि सुहृदचं अतूट नातं आहे. आम्ही कायम एकमेकांना मारतो, कट्टी घेतो पण शेवटी एकमेकांना मिठी मारतो. माझं नि बाबाचं रक्ताचं नातं आहे, मी अगदी त्याच्यासारखीच आहे. आम्ही दोघेही आई जोरात ओरडून धमकी देई पर्यन्त वाचत बसतो. प्रत्येकाशी माझं नातं, मी जन्मल्यापासून जोडलेलं आहे. ही एक विविध नात्यांची गुंफण माझ्याभोवती आहे आणि असणार आहे.

Friday, February 26, 2010

विदूषकी चाळे

बाबा कायम त्याची पॅंट काढून आमच्या बंकबेडच्या शिडीवर ठेवतो. त्या दिवशी देखील मला त्याची पॅंट दिसली. मला काय वाटले कुणास ठाउक! पण मी ती पॅंट घातली. खरं तर घातली पेक्षा चढवली म्हणणे योग्य ठरेल. मी ती घालताना ती दहावेळा तरी घसरली असेल !!! मग मी पॅंट खाली घसरू
नये म्हणून ती एका हातात धरून दुसर्‍या हाताने आईचा पट्टा शोधून काढला आणि कसाबसा त्या पॅंटला आधार दिला. पॅंट घसरायची थांबली. मला कोपर्‍यात बाबाचा शर्ट दिसला. मी तो शर्ट घातला. तो शर्ट मला पंजाबी-ड्रेसच्या टॉप एवढा होत होता! मग मी माझी टोपी शोधून काढली आणि ती डोक्यावर जरा तिरकी करून ठेवली. मी आरश्यासमोर जाउन जरा चेहर्‍याला रूज लावलं. नाकावर देखील रूजचा एक ठिपका दिला. पावडर शोधत असताना मला आईचे टिकलीचे पाकिट मिळाले. मग मी दोन्ही भुवयांवर त्या लावल्या, काजळ तर अगदी पाणी येइपर्यंत डोळ्यात घातले. सगळ्या मेकअप झाल्यावर मी आरशात स्वतःला न्याहाळले. मी छान दिसत होते. मजेशीर छान! मी जरा विदूषकासारखे इकडून तिकडे पळून पाहिले. काही फार अवघड नव्हतं पण फार सोपं होतं असं मुळीच नव्हतं! मुख्य म्हणजे बाबाची पॅंट ! ती दर वेळी घसरत घोट्यापर्यंत येइ आणि मग मला ती वर घ्यावी लागे!
थोडी कसरत केल्यावर मी आई जवळ गेले. तिने थोडावेळ माझ्याकडे निरखून पाहिले आणि म्हणाली "मुक्ता कपडे काढून ठेव, टिकल्या किती वाया घालवल्यास. छे!" मी सगळ्या टिकल्या काढल्या, कपडे कपाटात ठेवताना मला वाटलं जर वेळ आली तर मी देखील एक उत्तम विदूषक होउ शकेन!!

Monday, January 25, 2010

बोगनवेलाची गोष्ट

एक होता खलाशी. त्याचे नाव होते बोगनवाइल. तो हाउसबर्ग शहरात आपली बायको लिला हिच्यासोबत रहात असे. त्याने खलाशी धंदयातून पुष्कळ संपत्ती मिळवली होती. एक दिवस तो पुन्हा सफरीला निघाला. बोटीने किनारा सोडला व ती संथपणे दक्षिणेकडे जाउ लागली. बोगनवाइल डेकवर उभा राहून समुद्र पहात होता. सूर्योदयाचा तो सुंदर देखावा होता. बोगनवाइल त्याच्या जुन्या सफरींबद्दल विचार करत होता. एकदा तो मगरीशी झुंजला होता तर एकदा एका कासवाने त्याचा हात चावला होता, एकदा समुद्रात पडता-पडता वाचला होता तर एकदा प्रचंड आजारी पडला होता. आज मात्र तो खूप खूष होता कारण तो पुन्हा त्याच्या मित्राजवळ होता त्याच्या सागराजवळ! बोगनवाइलचे डोळे तर पाणावले.
पण दैवाचे डोहाळे काय होते?


एक काळा ढग सूर्यासमोर आला. सर्वत्र अंधार पसरला. फक्त बोटीवरील दिव्यांचा काय तो प्रकाश होता. बोगनवाइल ओरडला, ’वादळ, वादळ येतंय’. बोटीला हादरे बसू लागले, प्रवासी ओरडू लागले. सुदैवाने बोट सहीसलामत होती. पण एव्हाना ती निम्म्याहून अधिक ओली झाली होती. एक भली मोठ्ठी लाट आली व तिने एका झटक्यात सर्व दिवे मालवले. कुणालाच काहीच कळेना. सुमारे दीड-दोन तासांनी बोटा अचानक थांबली. बोगनवाइल आणि त्याचे सहकारी जरा दबकत डेकपाशी गेले. लिओनार्दो, बेसिल यांनी कुठुनतरी विजेर्‍या मिळवुन प्रकाशाची सोय केली. तरी आपण कुठल्यातरी जमिनीवर येऊन थांबलो आहोत एवढीच माहिती मिळाली. थोड्याच वेळात ढग दूर सरकला आणि सूर्याचा प्रकाश पडला. प्रवाश्यांमधे उत्साह पसरला. बोगनवाइल, लिओनार्दो, बेसिल, हेन्‍री आणि काही प्रवासी बोटीवरून उतरले. ते साधारण पंधरा मिनिटे चालले आणि अचानक थबकले. त्या जागी अनेक फुले होती. काही गुलाबी तर काही पांढरी. पण ती फुले जरा वेगळीच होती. ती एखाद्या कागदासारखी दिसत होती. त्या कागदाच्या आत रातराणीसारखी फुले होती. बोगनवाइलला ती फुले फार आवडली. त्याने दोन रोपे उचलली व एका कुंडीत लावली. ती कुंडी घेउन ते जहाजावर पोचले. ते येईपर्यंत प्रवाशांनी व इतरांनी जहाजाची डागडुजी केली होती. सर्व इंग्लंडला निघाले.

लंडनला पोचल्यावर बोगनवाइल स्वतः राणीच्या दरबारात गेला व त्याने ती रोपे राणीला दिली. तिने ही फुले कधी पाहिली नव्हती. आता या निनावी सुंदर फुलांना काय नाव दयावे असा प्रश्न राणीला पडला. यावर सात दिवस चर्चा झाली व शेवटी बोगनवाइलच्या सन्मानार्थ त्या झाडाला बोगनवेल नाव देण्यात आले. राणी बोगनवाइलवर फार खूष झाली. तिने त्याला प्रमुख खलाशी म्हणून नियुक्त केलं व नौदल त्याच्या ताब्यात दिलं. बोगनवाइलने २० वर्षे काम केलं व पुढे तो निवृत्त होऊन आपली दोन मुलं, लिलासोबत हाउसबर्ग येथे राहू लागला.

Saturday, January 16, 2010

श्रुतलेखन असंच करतात ना?

आज वर्गात ताई २४ ताशी घडयाळाबद्दल बोलत होत्या. नंतर आम्हाला त्यांनी श्रुतलेखन घातलं आणि यातून ताईंनापण लिहायचा कंटाळा येतो हे सुरुवातीलाच समजले. ताई श्रुतलेखन बघत-बघत माझ्यापर्यंत आल्या, मी त्यांना वही दिली. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिले आणि ३ सेकंदानंतर मी वर्गाबाहेर होते.

मी तर सगळं व्यवस्थित लिहिलं होतं!
तुम्हीच बघा!


२४ ताशी घडयाळ
काही ठिकाणी कंस रेल्वे ऑब्लिक विमान वेळ कंस पूर्ण बारा-बारा, बारा-बारा दोनदा लिहा. तासांच्या ऐवजी चोवीस नीहार गप्प बस ताशी दिवस मानला जातो पूर्णविराम आता खालच्या ओळीवर लिहा रात्रीचा एक ते दुपारचे बारा एरवी प्रमाणे किंवा नेहमी प्रमाणे आता खालच्या ओळीवर लिहा दुपारचा एक म्हणजे दु. एक बरोबर तेरा विश्वभारती बोलू नकोस दु. दोन बरोबर चौदा स्वल्पविराम दु. तीन बरोबर पंधरा आता मधे डॉट डॉट दया मिहीर ते आत ठेव आणि नंतर लिहा रात्रीचे बारा बरोबर चोवीस चला वह्या मला दाखवा.


बरोबर आहे ना? आता यात काही चिडण्यासारखं होतं का? ताई जे बोलल्या तेच लिहायचं असतं ना?
श्रुतलेखन असंच करतात ना?

Friday, January 15, 2010

माझा अभ्यास

मला ना काही समजतच नाही. आज मराठीच्या तासाला ताई काहीतरी वाकचार का वाकप्रचाराबद्द्ल बोलत होत्या. ते वाकप्रचार का वाकचार सहा होते एव्हडं नक्की. आणि हो तेव्हा साडेदहा वाजले होते, ताईंनी निळा- पांढरा ड्रेस घातला होता. आणि आता गृहपाठ दिला आहे कि प्रत्येकी एक वाक्य बनवून आण. मी लिहून घेतले आहेत ते वाकचार पण अर्थ काही लागत नाही. कोंबडे झुंजवणे... म्हणजे काय? बहुतेक दोन कोंबडे आणून त्यांची मारामारी बघणे! हा! जमलं!
आता वाक्य काय सोप्प! मी आणि नीरजाने कोंबडे झुंजवले. दुसरं, कान फुंकणे म्हणजे कानात हवा सोडणे! मी रमाचे कान फुंकल्यावर तिला गुदगुल्या झाल्या!
आपलेच घोडे दामटणे...स्वतःचे घोडे घेऊन पळवणे वाक्यं - मला आपलेच घोडे दामटता येत नसल्याने मला त्याचा क्लास लावायचा आहे. आता चौथं काय आहे?
डोळेझाक करणे? सोप्पं! मी झोपल्यावर डोळे झाक करते. आता डोक्यावर बसवणे काय? मला बाबाच्या डोक्यावर बसून पंखा साफ करता येतो. वा! काय हुशार आहे मी! किती पटकन जमलं मला! आता लास्ट, नाक खुपसणे ......... छे! काहीच समजत नाही... हा! आत्ता ट्यूब पेटली! अर्थ लिहायचा नाही, तर वाक्य लिहायचं आहे! मला नाक खुपसणेचा अर्थच समजला नाही!
आई मी चालले खेळायला! बाय!

Monday, January 4, 2010

आजार

तशी माझी तब्येत अगदी तंदुरुस्त आहे. माझ्यामते माझे पेशीसैन्य रोगांशी लढण्यास सक्षम आहे. त्यांच्याबद्‍दल विचार केला की माझ्यासमोर लाल-पांढरे विचित्र लोक, हिरव्या विचित्र शत्रूशी सामना करत आहेत असे दृश्य उभे राहतो. अशा या लाल-पांढर्‍या विचित्र सैनिकमित्रांसाठी मी दररोज सर्व अन्नघटक घेण्याचा प्रयत्‍न करते.
माझ्याजवळ आजार सहसा फिरकत नाहीत. ज्याची साथ आली आहे व तो मला झालाय असा एकच रोग आहे, "कांजिण्या". कधी हिवाळ्यात सर्दी, खोकला येऊन अधूनमधून हजेरी लावतात. उन्हाळ्यात कधी ताप येऊन पलंगावरुन उठू देत नाही पण याचे वार्षिक प्रमाण कमीच. एकदा हिवाळ्यात आईस्क्रीम खाऊनही खोकला मला शिवला नाही हे पाहून आईने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. (अर्थात बोटांना लागलेले आईस्क्रीम चोखण्यासाठी नव्हे.)
गेल्या दोन-तीन वर्षात विचार करता यावा असा आजारच झालेला नाहीये मला. पण १ली-२री मध्ये असताना मला धम्माल यायची. माझ्यामते आजार ही पुन्हा लहान होण्याची संधी आहे. सगळे आपल्याजवळ येऊन बसतात. बाबाने तर हज्जारदा हॅरी पॉटरच्या १ल्या भागाच्या मराठी अनुवादाला बेक्कार म्हंटले असूनही तेच पुस्तक पुन्हा वाचून दाखवायला तयार!. आजारी पडली असं आईने सांगितलं की तिथे आज्या-मावश्यांची बॅग भरायला सुरुवात. एक दिवस आजी येऊन धडकते मग चिवडा काय, लाडू काय नुसती धम्माल!
तेव्हा मी पहिलीत होते. मी फ्रॉक घालून आईजवळ गेले. तिने चेन लावायला हात पुढे केला तर तिला हाताला काहीतरी लागले. तो होता एक फोड!
त्यादिवशी आईने तू शाळेत जाऊ नकोस असे सांगितले तेव्हापासून मी बाबाच्या फोनची वाट पाहत होते. कारण एकदा खूप पाऊस होता म्हणून आईने मला शाळेत पाठवायला बंदी केली होती तेव्हा बाबाने फोन करून सांगितले होते की शाळेत पाठव, फार पाऊस नाही. पण अपेक्षेप्रमाणे बाबाचा फोन आला नाही. आई एका दुष्ट राक्षसासारखी माझ्या शिक्षणाच्या मध्ये येतीय असा विचार माझ्या मनात आला. पण आई बाहेर जाऊन माझ्यासाठी पुस्तके घेऊन आली तेव्हा माझा राग पळून गेला. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर कळाले की मला कांजिण्या झाल्या आहेत. तेव्हा मला बिचारीला ’कांजिण्या’ असे म्हणताही येत नव्हते. मी त्याला ’कानिण्या’ म्हणायचे.
आजारपण एकदाचे गेले. पण दुसरीच भीती छळू लागली. ते म्हणजे माझी जवळजवळ महिन्याभराची रजा आणि तेव्हा दिलेले गृहपाठ ! मला एका पुस्तकांच्या ढिगार्‍यात मी अभ्यास करत असल्याची स्वप्ने पडू लागली. मी अभ्यासापासून दूर पळण्याच्या नादात झोपेत आईला लाथा मारायचे. आणि मी स्वप्नात लाथा मारल्या की सर्व पुस्तके माझ्या अंगावर पडायची आणि मी भोकाड पसरायचे. या प्रकाराला आई जाम वैतागली होती. पण शाळेत गेल्यावर सर्वांनी सांगितले की खूप मुले रजा असल्याने गृहपाठच दिला नव्हता.
मला एक भलामोठ्ठा दगड डोक्यावरुन उतरल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी फारशी कधी आजारी पडले नसल्याने तो दगड अजून पुन्हा चढलेला नाही. पण त्याचा मेल्याचा काही नेम नाही.