Thursday, March 10, 2011

पत्र

९ / ३ / ११, बुधवार
पान १
प्रिय आत्या, आजोबा, आजी,
सप्रेम नमस्कार! ( हे आपले उगाचच, दरवेळी काय विचारायचे कसे आहात? मला ठाऊक आहे तुम्ही कसे आहात!)पत्र लिहिणेस कारण की (पुढे सुचत नाही) आज कुठलेतरी रिकामे पाकीट सापडले आणि कितीतरी दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. खरे तर मी नीरजाला तिच्या सादरीकरणासाठी द्यायला कविता शोधत होते/ आहे. पण मधेच हे पाकिट दिसले आणि उचलले पेन लावले कागदाला! (उचलली जीभ लावली टाळयाला ) तुम्हांला एक विशेष ’ ता. क.’ सांगायचाय...... संस्थेची माहिती लिहायची होती, कविता लिहायची होती हे तुम्हांला ठाऊकच आहे. मी मयुरदादाच्या 'SPTM' ( save pune trafick (स्पेलिंग चूक) movment) बद्दल माहिती लिहिली होती. आधी ताईंची परवानगी घेऊन माझ्या ताज्या कविताही वाचायच्या ठरवल्या होत्या. शिवाय विंदांची ’घेता’ होतीच! मी सुरूवात केली आणि पहिली म्हणजे माझीच कविता वाचून संपवली, ती झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला! अशा बाबतीत चोखळदंड असणार्‍या वीणाताईंनीही कविता छान असल्याची पावती दिली., दुसरी कविता माझीच सुरू झाली, ती संपल्यावरही टाळ्या! मी चकीतच झाले! मग SPTM ची माहिती वाचायची होती (रमाने माहितीचे सुरूवातीचे वाक्य लिहिले होते, ’मी आज तुम्हांला फारश्या परीचित नसलेल्या संस्थेची माहिती सांगणार आहे!’ ) ती झाल्यावरही टाळ्या! (यावेळी टाळ्या का पडल्या ते मलाही ठाऊक नाही!) मग कोणीतरी ओरडले ” अरे, अजून एक कविता आहे” मग आमची घेता सुरू झाली. ती झाल्यावरही टाळ्या! या १० जणांमधे मला एकटीला एवढ्या टाळ्या मिळाल्या असतील! बर्‍याच जणांनी मला
पान २
सांगीतले की त्यांनी मला आधीच पूर्ण मार्क दिले होते! ( यावेळी विद्यार्थी मार्क देणार होते!)
आत्या, आलीच बघ १० तारीख, आता कितीसे दिवस उरलेत? ( गणित कच्चं) आज मोठीआई - आजोबा पनवेलला पोचलेत. ईशानची परीक्षा झाली सुद्धा! एकेकाचं नशीब असतं नाही का? (उत्तराची अपेक्षा नाही.) आमची उद्या चित्रकलेची परीक्षा आहे. आज आठवणीने खडू भरलेत. हल्ली गृहपाठाच्या बाबतीत माझ्या अंगात भयानक आळस भरलाय! उन्हाळा खुणावतोय दुसरं काय? आमचे वर्गमित्र-मैत्रिणी अभ्यासाला लागले सुद्धा! आमचं काय आदल्या दिवशी अभ्यास करूनही चांगलं चाललंय! मला आत्तापर्यंत बर्‍याच पेपरावर लिहून मिळालंय! ’अभ्यास केल्याचे जाणवते’ डोंबलाचा अभ्यास!
आता मला वाटतंय लवकरच मी दुसरा कागद घेणार. तशी माझी शैली ओघवतीच आहे, नाही का?
आईगं ss छे! डास चावला! उन्हाळ्यात डास कमी का होत नाहीत बरं?
माझे केस बर्‍यापैकी वाढलेत पण लोकांना मात्र तसं दिसत नाही. कारण ते खांद्यावर असल्याने खालून कुरूळे झाले आहेत. मी सारखे ते बोटे फिरवून सरळ करत राहते पण त्यामुळे ते आणखीनच कुरूळे होतात की काय अशी मला भीती वाटतीय! आजी, एखादा उपाय सुचवना? (तेल लावणे सोडून)
आमचे पेनबुवा आता लवकरच शाईची मागणी करणार असं दिसतंय, बहुदा पुन्हा उठावं लागेल, काय कटकट आहे!
पान ३
माझ्याकडे रिटा स्किटर सारखी लेखणी हवी होती, पटापट लिहिणारी! (स्वत:चं स्वत:)
खूपच उशीर होऊ लागलाय असं दिसतंय. आई, बाबा, लंपू एव्हाना झोपी गेले असतील. बाबूजींच्या मोबाईलवर ”गेले द्यायचे राहून ss'' ऎकू येतंय. ज्या कोणी गातायत त्यामुळे प्रसन्न वाटण्याऎवजी उदासवाणंच वाटतंय. जाउदे नाहीतर मला ’गेले द्यायचे राहून तुझ्यासाठी लिहिलेले पत्र.....” असं म्हणावं लागेल!
काल आम्ही मनीषाताईंचा ’सोलो’ पहायला गेलो होतो. काय सुंदर होता म्हणून सांगू! पण त्याआधी आयोजित केलेला सत्कारसमारंभ बाळबोधच होता/वाटला. पतंगराव कदम आले होते. ऍड. मकरंद ही होते (आडनाव विस्मृतीत, हे म्हणे दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांचे माहेरघर!) दाजीसाहेबही होते. त्यांनी मनीषाताईंना ५ हजार रू. चा चेक पाकीटात घालून दिला. ते पाकीट दिल्यावर म्हणाले ’आत पाच हजार रू. चा चेक आहे, तो उघडून दाखवू काय?’ या वाक्यानंतर जो हशा पिकला त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. सर्वांनी आपले मनोगत (भाषण) व्यक्त करायचे होते. एक किर्ती.... नावाच्या बाईंनी आपल्या संथ आवाजात सुरूवात केली आणि ’स्त्रिया कधीच दीन नव्हत्या’ या एका वाक्यावर टाळ्या/ हशा मिळवून गेल्या ( वाक्य तिसरे होते का ते आठवत नाही, कदाचित त्या पुणेकर नसतीलही) तेवढ्यात जानकीबाई (मृण्मयी देशपांडे) आल्या आणि मकरंद टिल्लू तेव्हढ्यात ७.०० वाजताच्या कुंकूंवर विनोद करून गेले. पतंगराव तर काय बोलत होते ते
पान ४
त्यांनाच ठाऊक! आधीच ते ’पतंगरावांचे मत राज्यसरकारला खूप महत्त्वाचे असते/ आकाशात भरारी घेणारा पतंग’ इ. टिल्लूंच्या स्तुतीमुळे हरभर्‍याच्या झाडावर जाऊन बसले होते! त्यांचे ’मनोगत’ उरकल्यावर ऍड. मकरंद उभे राहिले. त्यांनी अशा थाटात सुरूवात केली जणू ते ’शास्त्रा’ चे वकील म्हणूनच आले होते. असं शास्त्र सांगतं, तसं शास्त्र सांगतं असं ते सारखं- सारखं म्हणत होते. आता शास्त्र सर्वांच्या आधी त्यांना सांगतं आणि मग ते आपल्याला सांगतात की ते आपल्याला वाट्टेल ते ’शास्त्र’या नावाखाली सांगतात यापैकी सत्य काय देव जाणे!/ शास्त्र जाणे! अजून एक भारदार गृहस्थ तिथे उपस्थित होते. अगदी झब्बा गांधीटोपी घालून ते मनोगत सांगायला उभे राहिले तेव्हा बाबा म्हणाला,’आता बघ, श्लोक म्हणतील’ आणि खरोखरच त्यांनी ’समुद्र’ पासून सुरू होणारा श्लोक म्हणायला सुरूवात केली. शेवटी दीपश्च दीपश्च असं दहावेळा म्हणाले आणि मग स्वत:च्या कार्याबद्दल सांगू लागले! एकूणच माझ्यामते निवडसमितीला महिलांचा सत्कार करण्यासाठी कोणी मिळाले नसावे. मला त्यांना सल्ला द्यायला आवडेल!
आजची मॅच छान झाली ना? तशी यशाबद्दल खात्री होती, तरीही!
अच्छा! आता झोप येतीये, पत्र मिळाल्यावर लगेच फोन करा.
-- तुमची लाडकी
एकुलती एक नात, एकुलती एक भाची,
मुक्ता!

Sunday, March 6, 2011

माझ्या मैत्रिणी

शाळेत मिळाल्या आहेत मला मैत्रिणी छान
मैत्री आहे टिकून तरीही असलो जरी लहान

पहिली मैत्रिण, तिचं नाव नीरजा
तिच्या संगतीत येते खूपखूप मजा
सुंदर चेहरा आणि इवलेसे डॊळे
दोस्ती कधी झाली ते त्यांनाही न कळे !
प्राणी पाळण्याचा छंद आहे तिला
मातेसम प्रेम देते तिच्या ’मोतिया’ला
हसतो कधी आम्ही देतो एकमेका टाळी
माझी पहिली मैत्रिण अशी साधी-भोळी !

रमा आहे माझी दुसरी मैत्रिण
खेळताना कधी होते माझीच बहिण
आहे थोडी खुजी, गोरी नी गोंडस
देवानं दिलं आहे तिला पुरेपुर बाळसं
काळेकाळे डोळे आणि टोकदार नाक
आवाजात असते तिच्या गमतीची झाक
गालावर पडती खळ्या जेव्हा ती हसते
तेव्हा माझी ही दुसरी मैत्रिण खूप छान दिसते !

माझी तिसरी मैत्रिण, नाव तिचं कल्याणी
रंग तिचा सावळा नि मधुर वाणी
तिचे केस आहेत दाट, काळे
काळ्याच रंगाचे आणि मग डोळे
कधी जर चिडली तर खूपच ओरडते
पण थोड्याच वेळात राग विसरुन खूप खूप हसते
कधी काही हितगुज करुन मला मिठी मारते
तेव्हा माझी ही तिसरी मैत्रिण मला भारीच आवडते !

माझ्या चौथ्या मैत्रिणीचं नाव आहे गौतमी
ही इतकी बोलते की म्हणावं लागतं "बोलणं कर कमी"
गौतमीचा आवाज आहे खणखणीत नी गोड
वस्तू असतात तिच्या नीटनेटक्या, कधी होत नाही त्यांची मोडतोड
शाब्दिक कोटया करण्यात ही आहे पटाईत
त्यांचे अर्थ कोणालाच पटकन कळत नाहीत
वाचनाचा आहे हिला छंद
सध्या ती वाचतीये पानिपत व तेव्हाचे हत्याकांड
तिचे माझे सूर चांगलेच जुळतात
तिच्या मनातले विचारही मला पटकन कळतात.
संकटाशी ही करते धैर्याने सामना
आमची मैत्री अशीच राहो हीच ईश्वरचरणी कामना

माझ्या पाचव्या मैत्रिणीचं नाव आहे सई
काहीना काही उद्योग ही करतच राही
"हॅरी पॉटर’ वरच्या आमच्या चर्चा भरपूर रंगतात
बाकीच्या मग येऊन आम्हाला थांबायला सांगतात.
सईचा स्वभाव आहे स्वच्छंदी, मुक्‍त
राग आटोक्यात ठेवणे तिला जमत नाही फक्‍त.
सई कायम करत रहाते विनोद छोटॆ छोटॆ
ती आहे प्रामाणिक, बोलत नाही खोटे
तिच्या संगतीत गप्पा खूप होतात मारुन
आम्हाला रोज खाउ आणून देते घरुन
सई कायम वापरते तिची कल्पनाशक्‍ती
माझी ही पाचवी मैत्रिण कायम शोधत असते युक्‍ती !

छोटी हसरी स्वप्ना आणि धडपडी मैथिली
सडेतोड उत्तरे देणारी वैष्णवी आणि
अवखळ स्पृहा, बडबडी विश्वभारती
आणि आनंदी नेहा, सध्याच्या प्रतिनिधी
प्रणोती आणि वैदेही, स्वत:तच दंग असणार्‍या
रेवा नि सायली

अजून किती सांगू गुण आणि नावे ?
आम्ही एकमेकींवर प्रेम करतो मनोभावे !

एकमेकींच्या सहवासात नाही होत कधी दु:ख
या अक्षरनंदनच्या शाळेतील ८ वर्षात आम्हाला
मिळाली आहेत सारी सुखं !