Sunday, June 12, 2016

मलाव्य


मलाव्य म्हणजे "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व". एक अशी व्यक्ती जिने जनमानसाला अक्षरशः वेड लावले. प्रचंड लोकसमुदायाला कधी खळखळून हसवले, कधी कोपरखळ्या मारल्या, क्वचित कधी रडवले आणि अखंडपणे रिझवले. त्या व्यक्तीने अव्घ्या महाराष्ट्राच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले, तिच्या शब्दांची मोहिनी आजही आबालवृद्धांना भुरळ घालते व ते भारावलेपण आज झिरपत झिरपत आमच्या पिढीपर्यंत येऊन पोचलेलं आहे. ती व्यक्ती म्हणजे अर्थातच - पु.ल.देशपांडे.
  १२ जून २००० ला पुलं गेले तेव्हा मी बरोबर एका वर्षाची होते. ती हळहळ, कातरता, आक्रंदन, मळभ, एकटेपण-पोकळी आणि वातावरणात भरून आलेलं आषाढघनासारखं पुलंप्रेम हे समजण्याची, त्यात सामील होण्याची माझी क्षमताच नव्हती. पुढे मी पुलंचं साहित्य वाचू लागल्यावर एखाद्या भक्ताप्रमाणे त्यांच्या एका दर्शनासाठी गर्दीत घुसायला, त्यांची शक्य ती - शक्य तिथे जाऊन भाषणं ऐकायला, त्यांना पत्र पाठवून त्यांच्या पत्रोत्तराची चातकासारखी वाट पहायला, सध्याच्या घटनांवर त्यांची खुमासदार प्रतिक्रिया ऐकायला मला खूप आवडलं असतं, पण त्यासाठी पुलं इथे नव्हतेच. मग एक चाहती म्हणून माझा संवाद एकतर्फीच राहिला का? खरं तर नाही. त्यांची पुस्तकं, लेख, भाषणं, कथाकथनं या सर्वांतून तेच तर बोलत होते!
  मला वाटतं मी सर्वप्रथम पाहिलं ते ’चंद्रकांत काळेंनी’ केलेलं पुलंचं "वार्‍यावरची वरात". त्यातला माहौल, प्रासंगिक चटकदार विनोद, एकाहून एक नग अशी पात्रं आणि सतत खणखणणारा टेलिफोन हे सगळंच भुरळ पाडण्याजोगं होतं. " हा आत येण्याचा दरवाजा, म्हणजे आतुनही बाहेर जाता येतं!" हा म्हटलं तर साधाच संवाद पण कितीही वेळा ऐकला तरी खुदकन हसू येतं. पुढे प्रत्यक्ष पुलंचं "वार्‍यावरची वरात" पाहिलं आणि हसून हसून पुरेवाट झालीच पण अगदी ’भरून पावलो’ असं समाधान मिळालं ते त्यांना टीव्हीवर का होईना, पहायची संधी मिळाली म्हणून. मला तेव्हा काही वाचता येत नव्हतं, कदाचित त्यामुळेच मी आधी पाहिली ती पुलंची नाटकंच. "वार्‍यावरची वरात" नंतर लगेचच पाहिलेलं नाटक म्हणजे "ती फुलराणी" तेही नवीन नटसंचातीलच. ते मी पाहिलं तेव्हा काही कळायचं वयच नव्हतं पण कसल्यातरी जादूने ती सीडी पुन्हा पुन्हा पहावीशी वाटे. तेव्हा नकळत अनेक संवाद तोंडात बसले होते. एकदा ’अशोक जहागिरदार’चं पाहून पाहून मीपण कधीतरी "साला!" असं म्हणून आईकडून दटावूनही घेतलं होतं! ’तुला शिकवीन चांगलाच धडा!’, ’एक होता राजा’, ’मला फ्लोरिष्टाच्या शापामधल्या..’ इ. रचना आणि संवाद जवळपास पाठ झाले होते. ते सगळं किती आशयपूर्ण आहे हे आता पुन्हा त्या म्हणून पाहिल्या की जाणवतं.’बर्नार्ड शॉ’च्या "माय फेअर लेडी" ला अगदी मराठीतच उमलल्यासारखी वाटणारी अस्सल फुलराणी म्हणून रेखाटणार्‍या पुलंचा आदरही वाटतो.
    त्यानंतर गूळपीठ जमलं ते चितळे मास्तर, म्हैस, सखाराम गटणे, अंतू बर्वा, हरीतात्या, असा मी असा मी, पाळीव प्राणी, मी आणि माझा शत्रूपक्ष, माझे पौष्टिक जीवन, अपूर्वाई या सगळ्यांशी. ह्यातली विनोदनिर्मिती उच्च दर्जाची आहेच पण आमच्या पिढीने कधीच न अनुभवलेले तत्कालिन सामाजिक संदर्भही त्यातून उलगडत जातात. आम्ही मुळात पोस्टातच जात नाही; गेलोच तरी तेव्हा ’चि. बाळकुशास आशीर्वाद’ छाप मजकूर सांगणारे व लिहून घेणारे दिसत नाहीत. ’ बाबूज गॅरेज मिक्स्ड विथ लेमन वॉटर’ ही तारांची गंमत संपलीच. "भरताने चौदा वर्षं सांभाळल्या..." म्हणणारे, घोकंपट्टी करून घेणारे शिक्षक आम्ही कधी पाहिले नाहीत. आजही म्हैस वगैरे बसला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, बसमधे सुबक ठेंगणीही असेल पण या धकाधकीत " चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना sss" ह्या वाक्याला मात्र वाली नसेल. शत्रूपक्षाशी मुकाबला बिकट होण्याची शक्यता अधिक कारण "ह्यांचा पोहतानाचा फोटो" लगेच डिजीटल अल्बममधे सापडेल आणि त्यासरशी चटकन सापडणारे अजून " चोरट्या अफूची आयात करणारी टोळी" म्हणून खपू शकतील असे ५० फोटोही पहावे लागतील! आजकाल किमान शुद्ध मराठी बोलणारेच विरळा त्यात प्राज्ञ मराठी बोलणारा गटणे सापडणं अशक्यच! हे असे स्थलकालाचे संदर्भ बदलले आहेत तरी आनंदाने, कदाचित जास्तच आनंदाने या सर्व लेखांचा व्यक्तीचित्रणांचा आस्वाद घेतला गेला. मॉंजिनीज मधे शिरतानाची धडधड नाही स्वतःशी जोडून घेता आली पण आजही आपल्या पाळीव प्राण्यांच्या ’अगदी परवाच्या’ गोष्टी ऐकवणारे, संत प्रवृत्तीने गिर्‍हाईकाला न कंटाळता शंभर साड्या दाखवणारे विक्रेते, लग्नातले नारायण, ’आतलं घड्याळ’ सांभाळत नव्या-जुन्यात अडकलेले धोंडोपंत आणि शुद्ध-अशुद्धतेच्या निष्कारण जाळ्यात फसलेल्या फुलराण्याही...हे सगळे भेटतातच! असे आजही दिसणारे असोत वा कालबाह्य झालेले असोत, पुलंच्या लिखाणातले संदर्भ त्यांच्या मिष्किल शैलीने जिवंत होऊन जातात.
  पुलंची शैली कोणालाही आवडावी अशीच मस्त गळ्यात हात टाकून गुदगुल्या करणारी आहे. त्यात बोचरेपणा नाही. पुलंच्या बर्‍याच (सर्वच नाही) लिखाणांत सुरुवात-मध्य हलकाफुलका-विनोदी असतो पण शेवट मात्र जाणूनबुजून थोडासा खाली येणारा/ अंतर्मुख करणारा असतो...मला अशा बांधणीचे लेख खूप आवडतात, ती आवड पुलंमुळेच लागली असावी. कितीतरीवेळ पोट धरून हसवणारी ’बटाट्याची चाळ’ जेव्हा ’माझ्या पोटात अजून खूप खूप माया होती..’ म्हणते तेव्हा गदगदूनच येतं... ’(चितळेमास्तरांखेरीज) कुठल्याच चपलांच्या टाचा एवढ्या झिजलेल्या नव्हत्या..’ हे वाक्यही असंच. पुलंच्या लिखाणांचे हे शेवट लक्षवेधी वाटतात. पुलं,सुनीताबाई यांनी ’कुठे थांबावं’ याचा विवेक कायम पाळला. पुलंचे लेख हे त्याचं एक उदाहरण म्हणता येईल. लेख एखादा प्रसंग रंगतोय म्हणून उगाच लांबवलेले, विनोदनिर्मितीच्या नादात भरकटलेले नसतात, ते अगदी योग्य वेळी शेवटाकडे येतात आणि त्यांचा शेवट बरोबर तेव्हा होतो जेव्हा वाचक रसानुभूतीच्या उच्चतम पातळीवर असतो. हे ही त्यांचं लिखाण इतकं भावण्याचं एक कारण असावं असं मला वाटतं.
  अशाप्रकारे ’पायाभूत’ म्हणता येईल एवढं वाचन झाल्यावर पुलंचे काही गंभीर लेख, ज्यांचं कधीच पुलंनी प्रकटवाचन केलं नाही असे काही पुस्तकांतील लेख हेही थोडं थोडं वाचलं. त्याच काळात समांतरपणे सुनीताबाईंची कवितांजली, चित्रमय स्वगत ह्यांची पारायणं झाली. मंगला गोडबोलेंचं ’सुनीताबाई’ वाचलं; ते खूप आवडलं, मग ’आहे मनोहर तरी..’ वाचलं आणि ते अगदीच जवळचं पुस्तक होऊन गेलं. या सर्वांतून पुलंची वैयक्तिक माहिती कळू लागली आणि ते व सुनीताबाई कधी न भेटता, कधी प्रत्यक्ष न बघताही माझी खूप आवडीची माणसं होऊन गेली. खरं तर मी घरातल्या कोणाला समोर बसवून सगळे प्रश्न एकदमच का विचारून टाकले नाहीत, माहित नाही....कधी करावंसं वाटलंच नाही. ते माझ्यापरीने हळू हळू शोधत जाणच मला आवडणार होतं, कारण माझा पुलंप्रति प्रवास काहीसा तसाच तर होता!
  पुलंनी लिहिलं आहे की ’ लेखक एकदा परिक्षेला लागला की संपला!’! गंमत म्हणजे पुलंचं कसलंही लिखाण आम्हाला कधीच पाठ्यपुस्तकात नव्हतं. याचा जसा खेद आहे तसाच "पंतांना कुशाभाऊंनंतर कोण भेटायला आले?", " वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जातो - संदर्भासहित स्पष्टीकरण करा" असे प्रश्न सोडवावे लागले नाहित याचा आनंदही आहे.
  पुलंनी निखळपणे हसण्याचा आनंद दिला, क्रिकेट म्हटल्यावर जसा गट एक होऊन जातो तसाच पुलंचा विषय निघताच एक होण्यातला मस्त अनुभव दिला, मराठीतले म्हणी-वाक्‍प्रचार, विरामचिन्हे वापरत केवढी धमाल करता येते हे दाखवलं आणि या भाषेची कायमची गोडी लावली, शाळेतून घरी येताना "कोण’सखाराम गटणे’ तोंडपाठ म्हणून दाखवतो" सारख्या स्पर्धांची मजा घेण्याची संधी दिली, सुनीताबाईंसोबत कित्येक कवींशी पहिली ओळखही करून दिली...

   प्रत्येक लेखक त्याच्या वाचकासाठी वेगळा असला पाहिजे...खरं तर मी त्यांना पुलं आजोबा म्हटलं पाहिजे पण त्यांच्या लेखनातून जे पुलं भेटले ते काळाची कसलीही खूण न उमटलेले, चिरतरूण असे! आमच्या मागच्या, त्यामागच्या पिढीने पुलंचा सगळा प्रवास पाहिला, त्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाचे, दर्शनाचे अमृतकण त्यांनी अनुभवले...त्याला मुकल्याबद्दल मी स्वतःला दोष देण्याखेरीज काहीच करू शकत नाही. मात्र त्या सर्व प्रवासातल्या शेवटच्या एका छोट्या तुकड्यात कुठेतरी अजाणतेपणी माझं अस्तित्व होतं याचं मला मुग्ध समाधान आहे...