Saturday, October 30, 2010

स्पर्श

स्पर्श म्हणजे काय असतं ? माझ्यामते ती एक हवीहवीशी आठवण असते; आपल्यापासून कोणी दूर गेलं की येणारी.
परतीच्या गाडीत बसलं कीच कशी आजीच्या मऊ हातांच्या स्पर्शाची आठवण होते ? बाहेरगावी गेलं की कशी आपल्या पांघरुणाची आठवण येते ? कधीकधी या स्पर्शामुळे त्या अनोळखी व्यक्तीचं/वस्तूचंही आपल्याशी खूप जुनं नातं आहे असं वाटतं. खूप गोष्टींना आपण स्पर्श करतो, करुन पाहतो; त्यावेळी लक्षात येत नाही, कधीकधी आठवतही नाही. पण कधीतरी त्या स्पर्शामुळेच आपल्याला त्या व्यक्‍तीची, निसर्गाची खूप प्रकर्षाने आठवण येते. कारण ? स्पर्श माणसं जोडण्याचं काम करतो ! आपण एखाद्या व्यक्‍तीशी पटकन दोस्ती करतो, याला कारणही कधीकधी स्पर्शच असतो ! एखाद्या व्यक्तीची पिशवी आपल्याला आपल्या मैत्रिणीसारखीच वाटली, तिचा स्पर्श तसाच जाणवला तर आपण पटकन काय म्हणतो ? "तुमच्यासारखीच पिशवी माझ्या मैत्रिणीकडे आहे बरं का!" समोरची व्यक्तीही खुलते आणि संभाषणाला / गप्पांना सुरुवात होते.
आपल्या आप्तांच्या, जिवलगांच्या स्पर्शात मायेची उब जाणवते, प्रेम जाणवतं. माझ्या मोठीआईचा (माझ्या आईची आई) हात खरखरीतच पण तिने पाठीवरुन फिरवलेला हाताचा स्पर्शही उबदार, मऊसूत वाटतो, भातासारखा ! काही स्पर्श लोभावणारे असतात. पुस्तकांचा स्पर्श आणि त्यांचा वास यांनी मला वेड लागायची पाळी येते. काही स्पर्श अदृश्य असतात, पण तेच जवळचे वाटतात !
अमुक अमुक गोष्ट मनाला जाऊन स्पर्श करते असं आपण म्हणतो ते का उगाच ? असे अनेक स्पर्श आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतात. त्यावेळी त्यांची किंमत समजत नसली तरी नंतर समजते, आणि मग आपण पुन्हा भूतकाळात जातो; आठवणींच्या पलिकडे........... !

-- मुक्‍ता


(सहावी सहामाही परीक्षेत मराठीच्या उत्तरपत्रिकेत केलेले स्फुटलेखन)

10 comments:

  1. मला वाटतं याच्यावर खरी प्रतिक्रिया स्पर्श करूनच द्यायला हवी, नाही का? त्यासाठी उद्या भेटूच!

    ReplyDelete
  2. मुक्ता,
    खूप छान लिहीले आहेस!
    तुझ्या "स्पर्श माणसाला जोडायचे काम करतो" ह्या वाक्यावरून मला खूप पुर्वी पाहिलेल्या ’स्पर्श’ ह्या चित्रपटाची आठवण झाली. नसुरुद्दीन शाह आणि शबाना आजमी ह्यांनी ह्या अंध लोकांच्या जीवनावर आधारित चित्रपटात खूप सुंदर काम केले आहे. स्पर्श आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे; पण स्पर्शाचे खरे महत्त्व ह्या अंध लोकांइतके दुसऱ्या कोणालाच समजत नसेल! थोडे मोठे झालात की हा चित्रपट तुम्ही मुलांनी जरूर बघा.

    जाता जाता: परिक्षेत असलेल्या थोड्याश्या वेळात तुला इतके छान विचार सुचू शकतात ह्याचे मनापासून कौतुक वाटते! असेच लिहीत रहा.

    - सचिन

    ReplyDelete
  3. खूपच खूपच छान!
    सारखं सारखं गळ्यात पडायला आवडतं, ते नाही आलं?
    मग बाईसाहेबांना राग येतो, त्या रूसून बसतात.
    त्या रूसव्याला कसा बरं स्पर्श करायचा?
    ( थोडा रूसवा असू द्यावाच, त्यावेळी छोट्या बाईसाहेब किती गोsड दिसतात!)

    ---आई

    ReplyDelete
  4. मुक्ता,
    किती छान लिहिले आहेस!! तुझा लेख मनाला स्पर्शून गेला.

    ReplyDelete
  5. किती सुंदर लिहिलं आहेस!

    ReplyDelete
  6. वा!वा! अप्रतिम...लाजवाब..
    (८ पैकी ८ गूण!)
    ---गौतमी

    ReplyDelete
  7. " Looking at her age , it is excellent !!! Please convey my compliments & blessings to her . She surely has a potential to be a great writer . (JK Rowling in the making !!!!)"

    RG Deshpande

    ReplyDelete
  8. मस्त !! आपलं वय काय.. आपण लिहिता काय..! खरच कमाल आहे.

    ReplyDelete