Thursday, September 3, 2009

त्या दिवशी मी खूप घाबरले...


माझा स्वभाव तसा भित्रा नाही. पण मी कधी घाबरतच नाही असेही नाही.
पण एकदा मात्र मी जाम घाबरले होते. याचे कारण हे की मिट्ट काळोख होता.
तुम्ही म्हणाल काळोख होता तर काय त्यात घाबरायची काय गोष्ट ? तो तर
कायमच असतो !
मी पण आता असेच म्हणते पण ३ रीत असताना मी अंधाराला फार घाबरायचे,
१०-११ नंतरच्या काळोखाला तर फारच! त्यादिवशी पण तसंच झालं होतं.
मला खूपच भीती वाटली होती. ऐका तर मग !
११-१२ ची वेळ होती. आईने मला सुहृदसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात
पाठवलं. मी पेला घेऊन पाणी भरत असताना माझं लक्ष स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेलं.
बहुधा अमावस्या असावी कारण चंद्राचा प्रकाश मुळीच नव्हता. अचानक मला संध्याकाळी, ’मस्त आहे!’ म्हणून दोनदा वाचलेली शेरलॉक होम्स ची सोनेरी चष्म्याचे रहस्य गोष्ट आठवली.
एक बाई रात्रीच्या सुमारास विलबी नावाच्या एका तरुणाच्या पाठीत चाकू घालून त्याला मारते अशी काहीतरी गोष्ट होती. पण तिचा परिणाम असा झाला की मी खिडकीकडे पाठ केली व मला अचानक कोणीतरी त्या बाईसारखी खिडकीतून उडी मारल्याचा भास झाला. मी जाम घाबरले. पेला तसाच खालीच टाकून भीतीने थरथरत मी झोपायची खोली गाठून आईला मिठी मारली.


आता तो प्रसंग आठवला की मनमुराद हसते.
पण तेव्हापासून मी संध्याकाळच्या नंतर रहस्यकथा वाचत नाही.

2 comments:

  1. मुक्ता,
    छान लिहिलेस,रात्री तू रहस्यकथा वाचत नाहीस,हे खरे की काय?

    ReplyDelete
  2. मुक्ता,छानच! तुझ्या अनुभवांचे शब्दांकन छान केले आहेस.
    तुझ्या आणि माझ्या लहानपणीच्या काही आवडी जुळताहेत असं दिसतय! मला पण लहानपणी (खरतरं अजून सुध्दा) रहस्यकथा वाचायला किंवा रहस्यमय चित्रपट पाहायला खूप आवडायचे! आणि रात्री ते आठवले की मी हळूच आईच्या जवळ सरकायचे. अशीच एक आठवण म्हणजे मी एकदा ’हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट पाहिला.आमच्या वाड्यात एक ’उंबराचे’ झाड होते. ते आमच्या खिड्कीतून बरोबर दिसायचे. त्या रात्री झोपल्यावर समोरच्या खिड्कीतून ते झाड आणि त्यावर पड्लेल्या चंद्रप्रकाशामुळे वेगवेगळ्या सावल्या दिसत होत्या. मी जामच घाबरले. सारखं त्या चित्रपटातील एक पात्र (नरसू) डोळ्यासमोर येत होते. मी डोळे गच्च मिटले आणि जी आईच्या कुशीत शिरले. मला अजूनही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो.

    -आशा मावशी.

    ReplyDelete