Tuesday, February 15, 2011

माझ्या आवडी - नावडी

आवडी-नावडी सर्वांनाच असतात. अगदी सगळ्यांना!
देवपण वाट्याला आलं तरी कुणाच्या वाटची दु:खं चुकली आहेत होय! पु.ल. तर एका भाषणात म्हणाले होते की ”तुम्ही उगाचच मला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे विशेषणे लावली आहेत! मला माणूस म्हणून राहू द्या की, ही विशेषणे लावली की थोरपणे वागायची जबाबदारी येते!” थोडक्यात काय? माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आवडी - नावडी या असतातच. [ बर्‍याच मोठ्यांना कारल्याची भाजी मुळीच आवडत नाही!] आता मोठ्यांचं जाऊ दे, आपण सामान्यांत येऊ, सामान्यांत म्हणजे नक्की कुठे? तर माझ्यापर्यंत हं, ऎका माझ्या आवडी-निवडी --
मला काय आवडतं? नक्कीच खूप काही आवडतं पण कशाबद्दल जवळीक वाटते? असं विचारलं की थोडं अस्वस्थ वाटतं , जवळीक हा शब्द खूपच हळवा नाजूक वाटतो.
मला गोष्टीतल्या पात्रांविषयी जवळीक वाटते. परवाच मी ’चौघीजणी’ झपाटल्यासारखं एका दिवसांत वाचून काढलं. तेव्हापासून सारखं वाटतं, मी कुणासारखी आहे? ज्यो, मेग, बेथ की ऍमी? हे पुस्तक वाचल्यापासून कधी नव्हे ते मला वाटतंय मला तीन सख्ख्या बहिणी हव्या होत्या. अगदी खरंच! दुसरं म्हणजे मला माझ्या दोन वेण्यांबद्दल जवळीक वाटते. एक कारण म्हणजे त्या कायम माझ्याजवळ असतात आणि दुसरं म्हणजे माझ्या बर्‍याच गोष्टीतल्या मैत्रिणी वेण्या घालतात. उदा. ज्यो, तोत्तोचान, हायडी. मला माझ्या या छोट्याशा विश्वाबद्दल खूप जवळीक वाटते, आत्मीयता वाटते. माझं कुटूंब, मित्र-मैत्रिणी, पुस्तके, शाळा, रिक्षाकाका अगदी माझं दप्तर, पांघरूण आणि माझं लाडकं ’पुणे’ सुद्धा! मला माझ्या घराबद्दल खूप जवळीक वाटते. आमचं घर कसंही असलं तरी! पुस्तकेतर इतकी पसरलेली असतात की नवी माणसे हबकूनच जातात! पण काही असलं तरी ते माझं घर आहे आणि त्याबद्दल मला खूप जिव्हाळा वाटतो.
ह्या आहेत माझ्या आवडी पण नावडींचं काय? थांबा त्याही सांगते--
मला कशाचा राग येतो? खूप गोष्टींचा. मुख्य म्हणजे पुस्तकाच्या दुकानातील दुकानदारांचा. जेव्हा आम्ही जातो तेव्हाच का पाथफाईंडर बंद करून माणसे निघालेली असतात! कायम आम्ही जातो तेंव्हा ’उज्वल ग्रंथ भांडार’ वर बंद दार व ’बुधवार बंद’ पाटी असते. छे ! असल्या गोष्टींचा मला भलताच राग येतो! मला खूप राग येतो जेव्हा मला कोणी म्हणते की मला पुस्तके वाचायला आवडत नाहीत किंवा म्हणते मला ’हॅरी पॉटर’ मुळीच आवडत नाही. तेव्हा मला त्या व्यक्तीला सोडून जावं वाटतं पण शिष्टाचारांमुळे तसं करता येत नाही! त्यावरून आठवलं! या असल्या शिष्टाचारांचाही मला खूप राग येतो. आपण कसे वागावे हे सांगणारे हे कोण तिर्‍हाईत? छे! मला नाही आवडत. कोणी जर म्हणाले की तुमच्या वर्गाला / तुम्हांला ’मॅनर्स’ नाहीत तरीही मला त्यांचा राग येतो. कोणी ( विशेषत: आमच्या सोसायटीतील इंग्रजी माध्यमातील मुली) म्हणाल्या की मला मराठी मुळीच आवडत नाही. श, ज्ञ, स्त्र, त्र इ. अक्षरे माझ्या डोक्यात जातात. आता मराठीचा काय उपयोग आहे? असे म्हंटले की मला त्यांचा राग येतो. अशा वेळी मी मुद्दाम मराठीत बोलते व तेव्हाचे त्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून मला खुनशी आनंद होतो! मला अजून एका गोष्टीचा राग येतो, तो म्हणजे एकटेपणा! मला कायम कुणाबरोबरतरी राहायला आवडतं. एकटेपणाला काहींचा नाईलाज असतो, त्यांच्या दृष्टीने मी चुकत असले तरी मला राग येतो हे खरे! कुणीतरी एकटे राहिले की मला लगेच त्याच्याशी जाऊन बोलावे वाटते. शाळेत कायम मैत्रिणींबरोबर राहावे वाटते. कधी कधी मन ताळ्यावर आणायला हा एकटेपणा उपयोगी पडतो तरी पण!
थोडक्यात ( थोडक्यात काय चांगल्याच सविस्तर!) काय? अशी आहे मी व माझ्या आवडी-नावडी! :)

--मुक्ता

( चाचणी परीक्षेत लिहिलेला निबंध )


*******

9 comments:

  1. फारच छान जमले आहे.वाचून आनंद वाटला.कौतुकही वाटले.आणि सहावीच्या मुलीचे हे लिखाण असल्याने पाठीवर शाबासकी द्यावी की पाय धरावे? असा प्रश्नही पडला.

    ReplyDelete
  2. मुक्ता, छान!
    तुझं लिखाण वाचणं ही माझ्या आवडीची गोष्ट आहे!
    - अश्विनीमावशी

    ReplyDelete
  3. मुक्ता, मस्त! तुमचा चाचणीचा भाषेचा पेपर किती दिवसांचा असतो गं?

    - सचिन

    ReplyDelete
  4. मुक्ता, मनापासून अभिनंदन. तुझी भन्नाट विचारशक्ती पाहून खरच भारावून गेले. बरेच वर्ष माझ्या सुद्धा दोन वेण्या होत्या पण वेण्यांची जवळीक हि कल्पना मला कधीच सुचली नाही ग. ते फक्त आणि फक्त मुक्ताच लिहू शकते.

    सरोज

    ReplyDelete
  5. भारी! पाथफाइंडर बंद असले की राग येतो, हे मला देखील पटले. तुला एकटे रहायला अजिबात आवडत नाही. हे तर मनोमन पटले!
    निबंध अजून थोडा मोठा असलता तर चालले असते नाही का? ( हे आपले उपरोधक बोलणे;)
    एकूण निबंध चांगला.
    - गौतमी.

    ReplyDelete
  6. मुक्ता आवडी निवडी ठरवताना किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आहेस गं. खूप छान मांड्ले आहेस. मस्त.

    वैशाली

    ReplyDelete
  7. हुश्श! मी Harry Potter वाचले आहे. आणि ते मला आवडते. नाही तर ----

    ReplyDelete
  8. गोळीबंद विचार आहेत तुझे....प्रतिभेचे घोडे फार आधीपासून फुरफुरायला लागले होते एकुणात ! भले शाब्बास !

    ReplyDelete