Sunday, April 3, 2011

// क्रिकेटप्रेमींना पत्र //

लोक हो,

अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या. क्रिकेट पहाण्यासाठी या. आपापले उद्योग टाळून या. भारताच्या जर्सी घालून या. ८ तासांची सवड काढून या.
हे क्रिकेट म्हणजे काही कबड्डी - खो, खो नाही. नुसतं बसून रहाणं आहे. मधूनच ओरडणं आहे. क्रिकेटचं प्रेम मनात ठेवत दिवस भर एका जागी बसायचं असतं. या खेळात असते हार - जीत, चुकीचे निर्णय , २ - ३ पॉवर प्ले. पण हे आव्हान असतं जिद्दिला, क्रिकेटप्रेमाला!
ध्यानात घ्या, तिथे आपले जुने खेळाडू काही इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला, कित्येकदा पराभवही!
कधी कधी प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्यावर मात केली असेल, तो भलामोठा विश्वचषक मुकाट्याने प्रतिस्पर्ध्यांना द्यावा लागला असेल त्यांना!
त्या प्राचिन क्रिकेटचं स्मरण, हा आहे क्रिकेट पहाण्याचा उद्देश!
आपल्या पुर्वजांनी क्रिकेटवर जिवापाड प्रेम केलं होतं. ते वेळ घालवून पाहिलं होतं!
गावसकरांची मते तुम्हाला ठाउकच आहेत, ते म्हणतात,
जनतेच्या एकतेचं कारण म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा विश्वचषक हातातून जाताच समाज दुःखी होतो. समाज दुःखी झाल्यावर, त्याच्या पाठिंब्या शिवाय क्रिकेट कसे खेळावे? म्हणूनच याआधीच्या क्रिकेट्वीरांनी (१९८३ मधे) विश्वचषक जिंकून क्रिकेटप्रेम वाढते ठेवले आणि मगच पुढिल स्पर्धांमधे उतरले. आत्ताचे क्रिकेटप्रेम तर कपिलदेवने १९८३ मधेच निर्माण केलेले होते!
गावसकर पुढे म्हणतात,
क्रिकेट विरहीत समाज म्हणजे आनंदापासून वंचित राहिलेला समाज. म्हणूनच ज्या व्यक्तींस प्रसिध्दी ह्वी अशांसाठी ( नेते, अभिनेते ) क्रिकेट हेच प्रसिध्दीचे साधन, क्रिकेट हेच त्यांच्या लोकप्रियतेचे मूळ, क्रिकेट म्हणजेच पैसा, क्रिकेट हेच त्यांचे बळ, क्रिकेट हिच धनलक्ष्मी, क्रिकेट हेच आपले क्षेत्र, हक्काचे ठिकाण ! म्हणूनच प्रसिध्दीसाठी आपले प्राण ओतून स्वतःच्या क्रिकेटप्रेमाचा प्रसार करणे ही अशांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट!
क्रिकेट हा तर इंग्रजाचा खेळ, मग त्याला एवढा मान कशाला द्यायचा हा एक प्रश्न तुमच्या मनात येउ शकेल, पण त्याचं एकच उत्तर आहे, आज क्रिकेट ऐवजी कार्टून्स पाहिली जातात, बेब्लेडस फिवली जातात! फूटबॉल खेळला जातो! क्रिकेट हा एक संथ खेळ आहे असं म्हणून त्याची उपेक्षा केली जाते! म्हणून क्रिकेट, जे एके काळी तीर्थ होतं त्याचा निदान अनादर तरी करू नये!
आजपर्यंत २२ विश्वचषक झाले आहेत असा पुस्तकांत उल्लेख आहे! त्यातले मी ४ पाहिले आहेत. अगदी निवांतपणे पाहिलेत.
क्रिकेट कसं पहावं याचं एक तंत्र आहे. ते धावत-पळत पाहून उपयोग नाही. खेळपट्टीची संपूर्ण माहिती, तिचा इतिहास, त्या सामन्याचं महत्व, मैदानाचा आकार, दोन्ही संघांची माहिती , त्यांच्या अपेक्षा या सार्‍याची कशी नीट माहिती पाहिजे, तरच त्याचं महत्व लक्षात येतं.
धावता- पळता सामना पहायला क्रिकेट म्हणजे काही सिरियल / घड्याळ नाही! मधेच स्कोर पाहून जाणं हा त्याचा अपमान व आपलाही! असं करू नये.
क्रिकेट हा प्रकाशदिप आहे. उणं- दुणं स्वच्छ दाखवणारा. काय सोडायचं व काय घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं.
ज्याचं स्मरण होताच मस्तक नम्र होतं, बाहू स्फुरण पावतात, शरिरावर रोमावळी उभ्या ठाकतात त्या विजयी सचिन तेंडूलकरने या मैदानावर एक तरी चौकार मारला आहे. तेव्हा....
सचिनचे बोलणे, चालणे, सल्ला देणे सगळं त्या मैदानाने अनुभवलेलं आहे!
जर त्या मैदानाला वाचा फुटली तर, ते आपल्याला म्हणेल "होय, तो पवित्रात्मा आम्ही आमच्या अंगाखांद्यावर खेळवला आहे!"

पण त्या वेळेचं महत्व आपण लक्षात घेत नाही. जिथे आपले क्रिकेटवीर निकाराने लढत असतात , ते पहायचं सोडून आपण पत्त्यांचे डाव मांडतो!
अविस्मरणिय सामना बघण्याऐवजी, आपण वेगळ्याच विषयांवर गप्पा ठोकतो!
हे असं करता कामा नये...
क्रिकेट ध्यानात येत नाही तोपर्यंत तो एक खेळ असतो
पण ते ध्यानात आल्यावर तो एक जीवन-मरणाचा प्रश्न असतो! हा खेळ खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान तिथे दिलेलं असतं,
ते जाणवायला हवं! मग क्रिकेट पहाणे सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसतेच वेळ घालवणे होते.
यावेळी मनस्वास्थ्यासाठी जर क्रिकेटकडे पहायचं ठरवलं तर अशी रोमहर्षक, चैतन्यमय, वय विसरून टाकणारी, तरूणाईस हाक घालणारी गोष्ट शोधूनही सापडणार नाही!
क्रिकेट पहाताना मनाची होणारी चलबिचल, कितीही सुधारलेले असलो तरी त्या क्षणी मनात येणार्‍या अंधश्रध्दा याची कशाशीच तुलना करता येणार नाही
सांसारिक व्यापांपासून मन मुक्त होतं, केबलवाले, टिव्ही दुरूस्त करणारे लोक यांच्याशी मैत्र जुळतं, थोडावेळ आरामात बसल्याने आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं, वाढ्तं वय तिथेच थांबतं.
नाना समस्यांनी खच्चून भरलेल्या या जीवनातून काही क्षण तरी बाजूस काढून जे क्रिकेट पहातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. साक्षात्कार म्हणजे तरी यावेगळं काय
असतं?
इति!

- मुक्ता


[ "गोनिदांचे दुर्गप्रेमिंना पत्र" वरून प्रेरणा घेउन. ]

11 comments:

  1. मूळ पत्रात हे फारच चपखल बसले आहे.हे असे लिहावे हे तुला कसे सुचले?
    आम्हाला सर्वांना वाचून मजा वाटली

    ReplyDelete
  2. मुक्ता,
    बापरे, तुझे धमकी वजा पत्र वाचून मी मला तपासून बाघितले काल मी सगळी match नक्की पाहिली ना ? पाणी प्यायला, खायला करायला आणि काही शंकांसाठीच उठले होते. पण बाकी सर्व चेंडू पाहीले आहेत. हुश्श.
    अविस्मरणिय सामना बघण्याऐवजी, पत्त्यांचे डाव, वेगळ्याच विषयांवर गप्पा..... हं ... कालचा अनुभव दिसतोय. एकदम चूक आहे हे. मी पत्रातील गोष्टींशी पूर्णपणे सहमत आहे. क्रिकेट विरहीत समाज म्हणजे आनंदापासून वंचित राहिलेला समाज. येस.
    ग्रेट.

    - वैशाली

    ReplyDelete
  3. लोक हो,
    ऎन परीक्षेच्या दिवसांत नसते उद्योग!!!!!!!

    ReplyDelete
  4. मुक्ताबाई,

    आपण धन्य आहात.
    क्रिकेटप्रेमाच्या बाबतीत बाबाची आणि आवेशाच्या बाबतीत आईची लेक शोभते आहेस.

    - नीरज काका

    ReplyDelete
  5. हे चांगलंय! परीक्षेच्या दिवसात फक्त अभ्यासच करायचा असतो असं कधी निदान सांगितलंय का तरी?
    आई-वडिलांनी किंवा शाळेनी?

    ReplyDelete
  6. मुक्ता खूप छान.न उठता क्रीकेट बघण्याचे माझे दिवस आठवले.लहान असताना क्रीकेट सुरु व्हायच्या आधी पोटभर जेवण करुन एक सतरंजी हंतरुन उशी-पांघरुण घालून,शेजारी चाऊम्याऊ खाण्याचे डबे,पाण्याची बाटली असा थाट करुन मी टी.व्ही. पुढून तासनतास हलायची नाही.तिकदे आग लागो जगाला मला त्याची पर्वा नसायची.अभ्यास वैगरे तर खूप दुरची बात होती माझ्या त्यावेळी...........

    ReplyDelete
  7. विद्या मी तुझ्याशी असहमत आहे :)
    अशा धमाल पत्राला नसते उद्योग म्हणणे चूक किंवा निव्वळ ’आईगिरी’ आहे.

    ReplyDelete
  8. मस्त !
    क्रिकेट खेळण्यापेक्षा ऐकण्या-बोलण्या-पाहण्या-वाचण्या-लिहिण्यात जास्त मजा आहे.

    ReplyDelete
  9. मुक्ता,भारताची क्रिकेट टीम तुला अभिवादन करेल.

    ReplyDelete
  10. हे पत्र वाचायला गोनीदा असते तर !

    मला तरी ही भारताच्या अतिरेकी क्रिकेट प्रेमावरची उपरोधिक प्रतिक्रिया वाटते.

    ReplyDelete
  11. वा! आता मला नीट समजले की क्रिकेटच्या मॅचेस कशा पहाव्यात.
    बाकी, आपका तो कोई जवाब नहीं!!
    - गौतमी

    ReplyDelete